बॉलिवूड अभिनेत्री मनीषा कोईरालाने १९९१ मध्ये 'सौदागर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ९० च्या दशकातील ही अभिनेत्री आजही कित्येकांच्या मनावर राज्य करत आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर मनीषाने साऱ्या बॉलिवूडवर राज्य केलं आहे. १९९५ मध्ये आलेल्या 'बॉम्बे' या चित्रपटातील मनीषाच्या कामाची खूप प्रशंसा झाली. २० व्या वर्षीच एका आईची भूमिका साकारणाऱ्या मनीषाचं काम लोकांना खूप आवडलं. एका मुलाखतीदरम्यान या चित्रपटाशी संबंधीत एक किस्सा मनीषाने सांगितला. 'बॉम्बे' हा चित्रपट न करण्याचा सल्ला बऱ्याच लोकांनी मनीषाला दिल्याचा खुलासा अभिनेत्रीने केला आहे. यूट्यूब चॅनल 'इंडिया ओ२'शी संवाद साधताना मनीषा म्हणाली, "मला बॉम्बे या चित्रपटात काम करायचं नव्हतं, एका आईची भूमिका करू नकोस असं बऱ्याच लोकांनी मला सांगितलं होतं. नंतर चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर अशोक मेहता यांनी माझं मन वळवलं. मणीरत्नम यांच्या चित्रपटाला नकार दिलं तर माझ्यासारखी मूर्ख मीच असेन असं अशोक मेहता यांनी मला सांगितलं." आणखी वाचा : "प्रेक्षकच आम्हाला वाईट…" सेन्सॉरशीप आणि बॉयकॉट ट्रेंडबद्दल सुधीर मिश्रा यांची प्रतिक्रिया पुढे मनीषा म्हणाली. "अशोक मेहता यांनी सांगितलेली ही गोष्ट ऐकून मला धक्काच बसला. मग मी माझ्या आईसह चेन्नईला लूक टेस्टसाठी गेले. मला अभिमान आहे की मी 'बॉम्बे' या चित्रपटाचा हिस्सा आहे." 'बॉम्बे' हा बॉक्स ऑफिसवर सुपरहीट ठरला. या चित्रपटाला फिल्मफेअर ते राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. बाबरी मशीद पाडल्यावर मुंबईमध्ये झालेल्या दंगलींच्या पार्श्वभूमीवर 'बॉम्बे' बेतलेला आहे. या चित्रपटात मनीषाबरोबर अभिनेता अरविंद स्वामीही मुख्य भूमिकेत दिसला होता. मध्यंतरी मनीषाने चित्रपटातून मोठा ब्रेक घेतला होता. त्यानंतर ती रणबीर कपूरच्या 'संजू' या चित्रपटात झळकली. याबरोबरच नुकत्याच आलेल्या कार्तिक आर्यनच्या 'शहजादा'मध्येही तिची महत्त्वाची भूमिका होती.