‘जाने तू… या जाने ना’ या चित्रपटातील भूमिकेसाठी ओळखली जाणारी मराठमोळी अभिनेत्री मंजरी फडणीस हिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या सोसायटीत ‘मायकी’ नावाच्या एका भटक्या श्वानावर अत्यंत क्रूरपणे हल्ला करून त्याची हत्या करण्यात आली, असा आरोप मंजरीने या व्हिडीओत केला आहे. व्हिडीओत मंजरीला अश्रू अनावर झाले आहेत. तिने या मुक्या प्राण्याला न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे.

सोमवारी मंजरीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला. यामध्ये ती रडत रडत तिच्या सोसायटीमधील श्वानाबद्दल बोलताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये तिने सांगितलं की, ‘मायकी’ला त्याच्या कुटुंबाने सोडून दिलं होतं आणि तो २०१९-२०२० पासून त्यांच्याच सोसायटीत राहत होता.

मंजरी पुढे म्हणाली, काही दिवसांपूर्वी मायकी अचानक बेपत्ता झाला आणि सोसायटीत राहणारे सर्वजण त्याला शोधत होते. त्याला शोधण्यासाठी लोकांनी पोस्टर्स तयार करून संपूर्ण परिसरात लावले होते, तसेच तो कुठे गेला आणि त्याच्याबरोबर काय घडलं, हे जाणून घेण्यासाठी सुरक्षा रक्षक आणि इतर लोकांकडे सतत चौकशी करत होते.

सोसायटीतल्या व्यक्तीनेच दिली कबुली

व्हिडीओमध्ये मंजरी म्हणाली, “हा व्हिडीओ बनवण्याची वेळ माझ्यावर कधीच येऊ नये, असं मला मनापासून वाटत होतं. पण आता मात्र व्हिडीओ करणं खूप गरजेचं झालंय.” मायकी हा एक अत्यंत प्रेमळ कुत्रा होता. सोसायटीतील रहिवासी त्याला शोधत होते, पण सोसायटीमधीलच एका व्यक्तीने कबुल केलं की मायकी जेव्हा बेसमेंटमध्ये शांतपणे झोपला होता, तेव्हा त्याच्या डोक्यावर काठीने किंवा लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला.

मंजरी म्हणाली की, मायकीबरोबर काय घडलं, हे माहित असलेल्या एका व्यक्तीने त्याच्यावर झालेल्या भयंकर हल्ल्याबद्दल सांगितलं. “त्याने आमच्यासमोर कबुल केलं की मायकी आमच्या इमारतीच्या बेसमेंटमध्ये शांतपणे झोपला होता आणि त्याच्या डोक्यावर हल्ला करण्यात आला. यानंतर मायकी बेशुद्ध झाला, नंतर त्यांनी त्याला फरफटत जिन्याकडे नेलं आणि तिथे त्याला इतकी अमानुष मारहाण केली की त्याच्या तोंडातून रक्त येऊ लागलं. नंतर त्यांनी मायकीला अर्धमेल्या अवस्थेत एका गोणीत पोत्यात भरून पाठीमागे असलेल्या खाडीत फेकून दिलं,” असं मंजरी फडणीसने रडत सांगितलं.

पाहा मंजरी फडणीसचा व्हिडीओ

तो श्वान वाचला की नाही, याबद्दल काहीच कल्पना नसल्याचं मंजरीने सांगितलं. “आम्ही त्याचा मृतदेह शोधतोय. तो आम्हाला सोडून गेला,” असं ती रडत म्हणाली. या व्हिडीओत तिने सर्वोच्च न्यायालयाला प्राण्यांवरील क्रूरतेविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आवाहन केले. सध्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना त्यांना न आवडणाऱ्या कुत्र्यांना मारण्यासाठी असे कृत्य करणे सोईचे वाटते, असं म्हणत तिने संताप व्यक्त केला.

व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये मंजरीने लिहिलं, “आमच्या मायकीची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली… आणि आम्ही त्याला न्याय मिळावा, यासाठी लढणार आहोत… कोणत्याही सोसायटीमध्ये, कुठेही, कोणत्याही कुत्र्याबरोबर पुन्हा असं कधीच घडायला नको. प्राण्यांना त्रास देणाऱ्या लोकांच्या मनात भीती असायला हवी! आपल्याला प्राण्यांवरील क्रूरतेविरोधात अधिक कडक कायद्यांची गरज आहे!”

मंजरीच्या या पोस्टवर भूमी पेडणेकर, धनश्री वर्मा, रिद्धिमा पंडीत, मीनाक्षी शेशाद्रीसह अनेकांनी कमेंट करून मायकीला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.