मुंबईतील वाढती जनसंख्या पाहता आणि येथील गर्दीला वैतागून अनेक सेलिब्रिटी शांत ठिकाणी आपलं दुसरं घर खरेदी करणं, एखादी जागा विकत घेणं पसंत करतात. अलीकडे अनेकांनी अशा गुंतवणूका केल्या. आता यामध्ये अजून एका कलाकाराची भर पडली आहे. हे अभिनेते म्हणजे मनोज बाजपेयी. आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखले जाणारे मनोज बाजपेयी अनेकदा त्यांच्या कामामुळे इतरांचं लक्ष वेधतात मात्र आता त्यांनी एका वेगळ्याच गोष्टीमुळे अनेकांचं लक्ष वेधलंय. कारण त्यांनी लाखो रूपये नाही तर कोट्यवधी रूपयांची गुंतवणूक केली आहे.

मुंबईच्या गजबजाटापासून दूर, बॉलिवूड अभिनेते मनोज बाजपेयी यांनी निसर्गरम्य ग्रामीण भागात जमीन खरेदी केली आहे. रॉक क्लायंबिंग आणि रॅपलिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील गावात त्यांनी ही जमीन खरेदी केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार त्यांनी १.८० हेक्टर म्हणजेच जवळपास ४.४५ एकर जमीन कोट्यावधी रूपयांना खरेदी केली आहे.

मनोज बाजपेयींनी केली कोट्यवधींची गुणतवणूक

इंडियन एक्स्प्रेसच्या माहितीनुसार मालमत्ता नोंदणी कागदपत्रांनुसार, मनोज बाजपेयी यांनी १.८० हेक्टर म्हणजेच जवळपास ४.४५ एकर जमीन १.३७ कोटी रुपयांना खरेदी केली आहे. CRE Matrix ने मिळवलेल्या मालमत्ता नोंदणीच्या कागदपत्रांमधून ही माहिती समोर आली आहे. मंगळवार, २५ ऑगस्ट रोजी ह्या जमिनीचा व्यवहार झाला. या व्यवहारासाठी मनोज बाजपेयी यांनी ६.८७ लाख रुपये मुद्रांक शुल्क भरलं. त्यानुसार, या जमिनीची व्यवहारातील किंमत प्रति एकर सुमारे ३०.९ लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. मनोज बाजपेयी यांनी विमलचंद खिमराज जैनयांच्याकडून ही जमीन खरेदी केली आहे.

मनोज बाजपेयी यांनी जमीन खरेदी केलेलं मुळशीतील तैल बैला मुंबईपासून ११९ किमी (सुमारे २ तास ३८ मिनिटे) आणि पुण्यापासून १०१ किमी (सुमारे २ तास २७ मिनिटे) अंतरावर आहे. हे गाव लोणावळ्याजवळ वसलेलं आहे.

तैल बैला गाव कशासाठी प्रसिद्ध आहे?

महाराष्ट्र गडकिल्ले या ट्रॅव्हल ग्रुपच्या अधिकृत वेबसाइटनुसार, तैल बैला गाव २०० ते २५० फूट उंच असलेल्या दोन भव्य खडकाच्या भिंतींसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी ३,३२२ फूट उंचीवर असलेला तैल बैला किल्लाही आहे.