अभिनेता मनोज बाजपेयी यांची प्रमुख भूमिका असलेला नेटफ्लिक्सवरील आगामी चित्रपट ‘घुसखोर पंडत’ वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर अवघ्या एका दिवसातच दिल्ली उच्च न्यायालयात या चित्रपटाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. नेमकं काय घडलंय?

मनोज बाजपेयी यांच्या प्रमुख भूमिकेतील ‘घुसखोर पंडत’ या चित्रपटाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. चित्रपटाचे शीर्षक हे ब्राह्मण समाजाची बदनामी करणारे आणि आक्षेपार्ह असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, महेंद्र चतुर्वेदी यांनी वकील विनीत जिंदाल यांच्या मदतीने दाखल केलेल्या याचिकेत ‘घुसखोर पंडत’ या चित्रपटाचे ओटीटी प्लॅटफॉर्मवरील प्रदर्शन थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे. ‘पंडत’ हा शब्द चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आल्याचेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

यावर आता दिग्दर्शक नीरज पांडे यांनी इन्स्टाग्रामसह पोस्ट शेअर करीत स्पष्टीकरण दिलं आहे. या पोस्टमधून त्यांनी सिनेमाची कथा पूर्णपणे काल्पनिक असल्याचं सांगितलं आहे. तसंच लोकांच्या भावना दुखावल्याने त्यांनी चित्रपटासंबंधित प्रमोशनलं कंटेंट काढून टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचंसुद्धा या पोस्टमधून सांगितलं आहे.

दिग्दर्शक नीरज पांडेंचं स्पष्टीकरण

सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये ते म्हणतात, “या चित्रपटाची कथा काल्पनिक आहे. ‘पंडत’ हा शब्द फक्त एका काल्पनिक पात्राचे नाव म्हणून वापरला गेला आहे. ही कथा एका व्यक्तीच्या कृती आणि निर्णयांवर आधारित आहे. ती कोणत्याही जात, धर्म किंवा समाजावर टिप्पणी करत नाही. मेकर म्हणून कथा पूर्णपणे विचारपूर्वक सांगणे हाच माझा उद्देश आहे. आधीच्या चित्रपटांप्रमाणेच मी या चित्रपटातदेखील प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठीच बनवला आहे. बाकी माझा कुठलाच वेगळा उद्देश नाही. दरम्यान, चित्रपटाच्या शीर्षकामुळे काही प्रेक्षक दुखावले असतील आणि आम्ही त्यांच्या भावनांचा आदर करतो. याचमुळे आम्ही चित्रपटासंबंधित जाहिराती आणि आणि इतर प्रमोशनल कंटेंट काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.आम्ही हा चित्रपट प्रेक्षकांसमोर सादर करण्यास उत्सुक आहोत.”

‘घुसखोर पंडत’बाबत थोडक्यात

‘घुसखोर पंडत’ या चित्रपटात मनोज बाजपेयी यांच्यासह नुसरत भरुचा, साकिब सलीम, अक्षय ओबेरॉय, श्रद्धा दास, दिव्या दत्ता आणि किकू शारदा हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.