Manoj Bajpayee Praises Tukaram Mundhe Honesty: अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे त्यांच्या धडक कारवायांमुळे चर्चेत आहेत. कठोर प्रशासकीय निर्णय आणि कारवाईंसाठी ओळखल्या जाणाऱ्या तुकाराम मुंढेंना सिनेविश्वातून पाठिंबा दिला जातोय. आता लोकप्रिय अभिनेते मनोज बाजपेयी यांनी तुकाराम मुंढे यांच्या कामाचे आणि प्रामाणिकपणाचे कौतुक केले आहे.

तुकाराम मुंढेंबाबत काय म्हणाले मनोज बाजपेयी?

एएनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये मनोज बाजपेयी यांनी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन व मानसिकता यावर भाष्य केले. यावेळी मनोज यांनी तुकाराम मुंढे यांच्या कामाचा उल्लेख केला. मनोज बाजपेयी म्हणाले, “आपण सध्या अशा काळात जगतोय, जिथे एखाद्या व्यक्तीने त्याचे काम पूर्ण प्रामाणिकपणाने आणि समर्पणाने केले तर लोकांना फारच आश्चर्य वाटते.”

प्रामाणिकपणे काम केले की व्हायरल होतात – मनोज बाजपेयी

पुढे मनोज बाजपेयी म्हणाले, “एखाद्या पोलिस अधिकाऱ्याला किंवा समजा, तुकाराम मुंढे यांची एखाद्या कामासाठी नियुक्ती केली आहे. जर त्यांनी त्यांची जबाबदारी पूर्ण प्रामाणिकपणे व समर्पणाने पार पाडली तर ते व्हायरल होऊ लागतात आणि लोकांना याचेच आश्चर्य वाटत आहे, तुम्ही याचा कधी विचार केला आहे का?”

पुढे ते म्हणाले, “याचा सरळ अर्थ असा आहे की, एखादी व्यक्ती जेव्हा तिचे कर्तव्य पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडते, तेव्हा ती सेलिब्रिटी बनते आणि यावरूनच आपण समाज म्हणून सध्या कुठे पोहोचलो आहोत हे लक्षात येते.”

सलमान खानने केला तुकाराम मुंढेंचा उल्लेख

तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्तपद स्वीकारल्यापासून हॉटेल्स व रेस्टॉरंटवर धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे अन्नसुरक्षेला प्राधान्य दिले जात असून भेसळयुक्त पदार्थांवर कारवाई होत आहे. तुकाराम मुंढे यांच्या कामाला बॉलीवूडमधून पूर्ण पाठिंबा मिळत आहे. यापूर्वी रवीना टंडन, ट्विंकल खन्ना आणि सलमान खान यांनी तुकाराम मुंढेंच्या कामाचा उल्लेख केला असून आता मनोज बाजपेयी यांनीसुद्धा त्यांच्या प्रामाणिकपणाचा दाखला दिला आहे.

मनोज बाजपेयींचा ‘लास्ट मॅन इन टॉवर’ कधी होणार रिलीज?

दरम्यान, मनोज बाजपेयी हे लवकरच ‘लास्ट मॅन इन टॉवर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. बेन रेखी दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती राणा दग्गुबाती यांच्या स्पिरिट मीडिया या संस्थेने केली आहे. अरविंद अडिगा यांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित या चित्रपटात दिव्या दत्ता आणि बोमन इराणी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपटात मनोज यांनी मास्टरजी या निवृत्त शिक्षकाची भूमिका साकारली आहे. ‘लास्ट मॅन इन टॉवर’ हा चित्रपट ११ सप्टेंबर रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.