Manoj Bajpayee Ranveer Allahbadia Podcast: बॉलिवूडमधील एक कसलेले आणि प्रतिभावान अभिनेते म्हणून मनोज बाजपेयी यांचे नाव आदराने घेतले जाते. ‘सत्या’ चित्रपटातील ‘भिकू म्हात्रे’ असो, ‘शूल’, ‘झुबेदा’ असो किंवा ‘गँग्स ऑफ वासेपूर’मधील ‘सरदार खान’, मनोज बाजपेयी यांनी आपल्या अष्टपैलू अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. मात्र, पडद्यावर कोट्यवधी रसिकांना खिळवून ठेवणाऱ्या या अभिनेत्याच्या मनात उलथापालथ सुरू आहे. गेल्या १० वर्षांपासून आपण अभिनय क्षेत्रातून संन्यास घेण्याचा विचार करत असल्याचा धक्कादायक खुलासा खुद्द मनोज बाजपेयी यांनी केला आहे.

प्रसिद्ध युट्युबर रणवीर अलाहाबादिया याच्या पॉडकास्टमध्ये मनोज बाजपेयी यांनी आपल्या मनातील ही खंत बोलून दाखवली. अभिनयाच्या प्रवासात आपण पालकांपासून कसे दुरावलो आणि चित्रपटांतील गंभीर भूमिकांमुळे मानसिक आरोग्यावर कसा परिणाम झाला, यावर त्यांनी मोकळेपणाने भाष्य केले.

“गेल्या १० वर्षांपासून अभिनय सोडायचा विचार करतोय…”

आपल्या अभिनयातील या प्रवासाबद्दल बोलताना मनोज बाजपेयी म्हणाले, “जेव्हा तुम्ही वर्षांनुवर्षे अतिशय गंभीर आणि मानसिक दृष्ट्या थकवणाऱ्या भूमिका साकारता, तेव्हा तुमच्या स्वभावात कमालीचा चिडचिडपणा येतो. तुमचे मूड स्विंग्स खूप वाढतात. गेल्या दहा वर्षांत माझ्या मनात अनेकदा अभिनय सोडण्याचा विचार आला. पण प्रत्येक वेळी एखादी उत्तम भूमिका माझ्यासमोर येते आणि मी पुन्हा कॅमेऱ्यासमोर उभा राहतो.”

अभिनय ही आपली नोकरी किंवा उपजीविकेचे साधन बनू नये, अशी त्यांची इच्छा आहे. “मला अभिनयाला केवळ एक कौटुंबिक जबाबदारी किंवा सक्तीचे काम बनवायचे नाही. मला ते आवडीने करायचे आहे, पैशांसाठी किंवा नाईलाज म्हणून नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

गंभीर भूमिकांचा कंटाळा; आता करायचाय हलकाफुलका चित्रपट!

‘गली गुलियाँ’, ‘भोसले’ आणि ‘जोराम’ यांसारख्या चित्रपटांनी मनोज यांच्या मानसिकतेवर खोल परिणाम केला. यावर बोलताना ते म्हणाले, “या भूमिका साकारणे सोपे नव्हते. मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मी त्या पात्रांमध्ये पूर्णपणे गढून गेलो होतो. अशा डार्क (गंभीर) भूमिका तुमच्यातील आत्माच जणू पिळून काढतात. आता मला या चक्रातून बाहेर पडायचे आहे. मला आता एखादा बिनधास्त, हलकाफुलका कमर्शियल चित्रपट करायचा आहे. ज्यामध्ये कोणतीही तयारी करावी लागणार नाही, फक्त गाणी, डान्स आणि धमाल असेल.”

“भिकू म्हात्रेमुळे माझा रागावरचा ताबा सुटला होता”

आपल्या काही गाजलेल्या भूमिकांची आपल्याला आता नीट आठवणही नसल्याचे त्यांनी सांगितले. “अनेकदा मला मी साकारलेल्या पात्रांची आठवणही राहत नाही. ‘अलिगढ’ किंवा ‘भोसले’ चित्रपटात मी कसा अभिनय केला, हे मला आठवत नाही. ‘भिकू म्हात्रे’ साकारताना मी त्यात इतका हरवलो होतो की, माझ्या खऱ्या आयुष्यातील रागावरचा ताबा सुटला होता. तर ‘शूल’ चित्रपटानंतर मला कित्येक रात्री भयानक स्वप्ने पडायची, मी झोपू शकत नव्हतो,” अशी अत्यंत प्रांजळ कबुली त्यांनी दिली.

भौतिक सुखाच्या मागे धावताना पालकांना गमावले

आपल्या संघर्षाच्या दिवसांची आठवण काढताना मनोज भावुक झाले. ते म्हणाले, “माझ्या संघर्षाचे फळ मला मिळाले, पण त्यासाठी मी खूप मोठी किंमत चुकवली. मी माझ्या आई-वडिलांना पुरेसा वेळ देऊ शकलो नाही. जेव्हा त्यांचे निधन झाले, तोपर्यंत आम्ही एकमेकांना पूर्णपणे समजून घेण्याचा प्रयत्नच करत होतो.”

‘भौतिक महत्त्वाकांक्षा’ म्हणजे गाडी, बंगला किंवा महागडी घड्याळे नव्हती, तर आपल्या आवडीच्या भूमिका निवडण्याचे स्वातंत्र्य मिळवणे हीच आपली एकमेव महत्त्वाकांक्षा होती, असे त्यांनी स्पष्ट केले. गावाकडून शिक्षणासाठी बोर्डिंग स्कूलमध्ये जाणे, त्यानंतर दिल्ली आणि मुंबईत राहिल्यामुळे कुटुंबासोबतचे अंतर वाढतच गेले आणि हीच खंत आज त्यांना सतावत आहे.

जेव्हा नैराश्याने घेरले होते आणि सेटवरून हाकलून दिले जायचे…

आज यशाच्या शिखरावर असलेल्या मनोज बाजपेयी यांना सुरुवातीच्या काळात प्रचंड नकाराचा सामना करावा लागला होता. “तो माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ होता. मी खरंच चांगला अभिनय करू शकतो का? अशी शंका मला स्वतःबद्दल वाटू लागली होती. पैशांची चणचण होती, मी सतत आजारी पडायचो. अनेकदा प्रॉडक्शन हाऊसच्या सेटवर गेलो की तिथे शिवीगाळ करून हाकलून दिले जायचे. मी एक आउटसाइडर (इंडस्ट्रीबाहेरील) होतो. पण प्रचंड संघर्ष आणि जिद्दीच्या जोरावर अखेर मी माझे स्थान निर्माण केले,” अशा शब्दांत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.