राम गोपाल वर्मा यांनी दिग्दर्शित केलेला ‘सत्या’ हा चित्रपट १९९८ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात मनोज बाजपेयी यांनी मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट त्यांच्या करिअरला कलाटणी देणारा ठरला. या चित्रपटाने त्यांना रातोरात स्टार बनवलं. इतकी वर्षे होऊनही या चित्रपटाबद्दल फार चर्चा होत असते. प्रेक्षक आजही गँगस्टर ‘भिकू म्हात्रे’ या त्यांच्या अजरामर भूमिकेसाठी हा चित्रपट आवडीने पाहतात. नुकताच मनोज बाजपेयी यांनी एक रंजक खुलासा केला. ‘सत्या’ हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांना वाटलं की ते मराठी आहेत. अगदी बाळासाहेब ठाकरे यांचाही असाच समज झाला होता.

मनोज बाजपेयी मराठी नाहीयेत हे समजल्यावर बाळासाहेब ठाकरे…

‘हिंदुस्तान टाइम्स’शी बोलताना मनोज बाजपेयी म्हणाले, “इतरांचं सोडा, स्वतः माननीय बाळासाहेब ठाकरे यांनाही मी मराठीच वाटलो होतो. त्यांनी मला त्यांच्या घरी बोलावलं होतं. त्यांनी माझा खूप आदर-सत्कार केला होता. पण जेव्हा त्यांना समजलं की मी महाराष्ट्रीय नाही, तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर त्यांनी मला मराठी शिकायला सांगितलं. त्यांची थोडी निराशा झाली, पण माझी त्यांच्याबरोबरची भेट खूप छान झाली होती. त्यांनी मला खूप आशीर्वाद दिले होते.”

‘सत्या’ चित्रपट ठरला मनोज बाजपेयींच्या करिअरसाठी ‘गेम चेंजर’

‘पीटीआय’शी बोलताना मनोज बाजपेयी यांनी ‘सत्या’ चित्रपट करिअरचा खरा ‘गेम चेंजर’ असल्याचं म्हटलं होतं. ते म्हणाले, “मी या चित्रपटाकडे एक गेम चेंजर म्हणून पाहतो. या चित्रपटाने फक्त माझं करिअरच नाही तर इंडस्ट्री बदलून टाकली. कथा सांगण्याची पद्धत ते तांत्रिक गोष्टींपर्यंत, किंवा लोक ज्या प्रकारे चित्रपट निर्मिती आणि अभिनयाकडे पाहतात, त्या प्रत्येक गोष्टी इंडस्ट्री आणि प्रेक्षक या दोघांसाठीही नव्या होत्या. ‘सत्या’च्या यशानंतर मला चित्रपटांमध्ये भूमिका मिळाल्या. इंडस्ट्रीत आदर मिळाला आणि मोठ्या प्रॉडक्शन हाऊसेसमध्ये प्रवेश मिळाला.”

भिकू म्हात्रेच्या लूक दिलेले २५,००० रुपये

‘गॅलाट्टा इंडिया’ला दिलेल्या एका मुलाखतीत मनोज बाजपेयी यांनी ‘सत्या’ चित्रपटातील त्यांच्या कपड्यांबद्दल सांगितलं होतं. भिकू म्हात्रे या पात्राचा लूक तयार करण्यासाठी त्यांना २५,००० रुपयांचं बजेट देण्यात आलं होतं, असा खुलासा त्यांनी केला. “मला माझ्या कपड्यांच्या खरेदीसाठी २५,००० रुपये देण्यात आले होते. त्या काळी जर तुम्ही मोठे स्टार नसाल, तर तुम्हाला कपडे स्वतःच खरेदी करावे लागायचे किंवा मग दिग्दर्शकाच्या सांगण्यावरून सेटवरील ‘कॉस्च्युम दादा’ तुमच्यासाठी कपडे निवडायचे. ते कसेतरी कपडे शिवून घ्यायचे किंवा तुमच्यासाठी कपडे घ्यावे लागायचे. पण ‘सत्या’ चित्रपटात मला हे काम स्वतः करायचं होतं. भिकू म्हात्रे नेमके कसले कपडे घालेल, हे माझ्या डोक्यात फिक्स होतं. म्हणूनच भिकूच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे कापड आणि प्रिंट्स शोधण्यासाठी मी अनेकदा वांद्रे येथील हिल रोडला जायचो. चित्रपटात तुम्ही जे शर्ट, डेनिम आणि बनियन पाहिलेत, ते सर्व तिथूनच विकत घेतले होते. एकेक वस्तू मी स्वतः निवडली होती,” असं मनोज बाजपेयी म्हणाले.

सत्या चित्रपटाची कथा व त्यातील कलाकार

‘सत्या’ हा बॉलीवूडमधील एक ब्लॉकबस्टर चित्रपट आहे. या चित्रपटाने हिंदी सिनेमातील ‘गँगस्टर’ किंवा ‘अंडरवर्ल्ड’ या जॉनरला एक नवी आणि वास्तववादी दिशा दिली. या चित्रपटाचे दिग्दर्शन राम गोपाल वर्मा यांनी केले होते. त्यांच्या कारकिर्दीतील हा सर्वोत्कृष्ट चित्रपट मानला जातो. हा चित्रपट ‘सत्या’ नावाच्या एका साध्या तरुणाची कथा सांगतो, जो नोकरीच्या शोधात मुंबईत येतो. पण परिस्थितीच्या चक्रात अडकून तो मुंबईतील अंडरवर्ल्डमध्ये कसा ओढला जातो, याचे अतिशय वास्तववादी चित्रण यात केले आहे. या चित्रपटात जे. डी. चक्रवर्ती, मनोज बाजपेयी, उर्मिला मातोंडकर, शेफाली शाह, सौरभ शुक्ला, परेश रावल आणि गोविंद नामदेव हे कलाकार होते.