Manoj Bajpayee says no actor happy to see other succeed in Bollywood: आपल्या सशक्त अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते मनोज बाजपेयी यांनी बॉलीवूडबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. गेली अनेक वर्षे चित्रपटसृष्टीत काम करूनही मी या क्षेत्राचा भाग आहे असं मला कधीच वाटलं नाही, अशी स्पष्ट कबुली त्यांनी दिली. “बॉलीवूड हे एक कुटुंब आहे किंवा इथे एकता-बंधुता आहे, हा खूप मोठा भ्रम आहे. तसेच असं म्हणणं म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे,” अशा कडक शब्दांत त्यांनी मत मांडलं.
बॉलीवूड एका कुटुंबासारखं असल्याचा लोकांना समज आहे, तो त्यांनी खोडून काढला. स्वतःचंच उदाहरण देत मनोज बाजपेयी म्हणाले, “मी बॉलीवूडचाच एक भाग आहे, असं मला कधीच वाटत नाही. तुम्ही कुठे राहता, वांद्रेत तुम्ही राहता का किंवा मालाडमध्येच राहून तुमचं काम करता हे गरजेचं नाही, तुम्ही किती चांगलं काम करता हे महत्त्वाचं आहे.”
सिनेसृष्टीतील एकता-बंधुता हा सर्वात मोठा भ्रम – मनोज बाजपेयी
मनोज बाजपेयी पुढे म्हणाले, “सिनेसृष्टीत एकता, बंधुता आहे, हा खूप मोठा भ्रम आहे. हे क्षेत्र कुटुंबासारखं नाही. कारण प्रत्येकाचं ऑफिस वेगळं, कोणीही एकत्र नसतं. एखाद्या कलाकाराने चांगलं काम केलं तर त्याचं कौतुक करायला कोणीही फोन करत नाही. त्याबद्दल आनंद व्यक्त करत नाही. इतकंच नाही तर कोणताही दिग्दर्शक स्वतःला इतर दिग्दर्शकापेक्षा कमी मानत नाही. कोणत्याही प्रॉडक्शन हाऊसला इतर प्रॉडक्शन हाऊसला जास्त नफा झालेला पाहवत नाही.”
बॉलीवूडला कुटुंबासारखं म्हणणं हा मूर्खपणा आहे- मनोज बाजपेयी
“मी कोणाचाही फारसा विचार करत नाही. मी माझे काम करतो, माझे मानधन घेतो आणि घरी निघून जातो. जर कोणी माझ्यावर टीका करत असेल, तर त्यांनी आपापल्या घरीच राहावे. आणि जर कोणी माझ्याबद्दल काही चांगलं बोलत असेल, तर ते ऐकू न येईल इतक्या लांब मी असतो. त्यामुळे, माझा कशाशीही काहीही संबंध नाही. माझ्याबद्दल तर सोडाच, पण या चित्रपटसृष्टीतील कोणाबद्दलही बोलायचं झाल्यास, लोक कितीही म्हणत असले की ‘हे एक मोठं कुटुंब आहे’, तर ते साफ खोटं आहे. बॉलीवूड कुटुंब आहे असं म्हणणं हा मूर्खपणा आहे. आपण सर्वजण आपापली लढाई लढतोय आणि ती लढण्यासाठी आपण तयार असायला हवं. आपल्याला मदत करायला कोणीही येणार नाही. जर कोणी मदतीला आलेच, तर तो तुमचा एक चांगला दिवस समजायचा, इतकंच” असं मनोज बाजपेयी म्हणाले.
