गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडमधील कलाकारांच्या वाढत्या मानधनाबद्दल मोठी चर्चा होताना दिसत आहे. अनेक दिग्दर्शक आणि निर्माते यांनी कलाकार आकारात असलेल्या मानधनाबद्दल वक्तव्य केले होते. आता एका मुलाखतीदरम्यान अभिनेते मनोज बाजपेयी यांनी निर्माते आणि दिग्दर्शकांच्या वक्तव्यांतील विरोधाभासावर आश्चर्य व्यक्त केले आहे. काय म्हणाले मनोज बाजपेयी? ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत, मनोज बाजपेयी यांनी बॉलीवूडचे कलाकार चित्रपटात काम करण्यासाठी जे पैसे आकारतात ते कमी करावे, अशी मागणी दिग्दर्शक करत आहेत, त्यावर आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यांना कलाकारांच्या वाढत्या मानधनाबद्दल विचारलेल्या प्रश्नावर बोलताना ते म्हणतात, "पण या कलाकारांना पैसे कोण देतं? आत्तापर्यंत त्यांना कोण पैसे देत आलेलं आहे? माझ्यासारखे कलाकार तर पैसे देत नाही ना? कलाकार हे चित्रपटाचा चेहरा असतात. जे कोणी लोकप्रिय चेहऱ्यांना आपल्या चित्रपटात घेतात, ते त्यांच्या खांद्यावर बसलेले असतात. जर हे कलाकार काही सुविधांची मागणी करत आहेत, तर मला वाटत नाही की त्यात काही चुकीचे आहे. जोपर्यंत त्यामध्ये विवेकशून्यता नाही, त्यात काही गैर आहे, असे मला वाटत नाही." हेही वाचा: शशांक केतकर वाहतूक कोंडीमुळे संतापला! मुंबई पोलिसांसह BMC ला टॅग करत म्हणाला, “रस्त्यात खड्डे, नियमभंग…” पुढे बोलताना त्यांनी कोणाचेही नाव न घेता निर्मात्यांवर निशाणा साधला आहे. निर्माते-दिग्दर्शक आधी कलाकारांचे लाड करतात. त्यांना हव्या त्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या जातात, ज्यामध्ये वाढत्या मानधनाचादेखील समावेश असतो आणि नंतर त्यांनी पैसे कमी करावेत अशी मागणी करतात, हा खूप मोठा विरोधाभास आहे. हे तर असे झाले की, तुम्ही मला आधी रसगुल्ला आणि प्रथिने खाऊ घातली, त्यामुळे मी मॅरेथॉन धावू शकेन. कारण तुम्ही विचार करता की, मी एकटाच असा आहे जो शर्यत जिंकू शकतो आणि त्यानंतर तुम्ही मी खाल्लेल्या रसगुल्ल्यामुळे रडत आहात. मनोज बाजपेयींनी म्हटले आहे, "मला कोणीही इतके पैसे दिले नाहीत. आम्ही आमच्या मर्यादित स्टाफबरोबर जातो, अनेकदा आम्ही आमच्या प्राथमिक गरजांचादेखील त्याग केला आहे, पण मला कोणी चित्रपटात घेणार नाही, काम देणार नाही. तरीदेखील तुम्ही लोकप्रिय चेहऱ्यांनाच चित्रपटात घ्याल, कारण तुम्हाला माहीत आहे, बॉक्स ऑफिसवरच्या आकड्यांची ते हमी देतात. दिवसाच्या शेवटी सगळा जुगारच आहे", अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच करण जोहर, फराह खान यांनी कलाकारांच्या वाढत्या फीबद्दल वक्तव्य केले होते. कलाकारांच्या वाढत्या मानधनामुळे दिग्दर्शक-निर्माते यांना समस्यांचा सामना करावा लागतो. फराह खानने कलाकारांच्या वाढत्या मानधनामुळे संसाधनाचा अपव्यय होत असल्याचे म्हटले होते. मनोज बाजपेयींच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास नुकतेच ते 'भैय्या जी' या चित्रपटात दिसून आले होते.