Manoj Bajpayee Love Story : बॉलीवूड अभिनेते मनोज बाजपेयी हे एक प्रभावी आणि दमदार कलाकार म्हणून ओळखले जातात. त्यांच्या अभिनयामुळे तीन दशके ते प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. बिहारमधील एका छोट्या गावातून आलेल्या मनोज बाजपेयी यांनी मेहनतीच्या जोरावर बॉलीवूडमध्ये स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. १९९८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सत्या’ चित्रपटातील भीकू म्हात्रे या भूमिकेमुळे त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली. मनोज बाजपेयी हे त्यांच्या चित्रपटांमुळे चर्चित असले तरी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसे लोकांना माहीत नाही. मनोज यांना त्यांच्या पत्नी शबाना या एका नजरेत आवडल्या होत्या, असा खुसाला त्यांनी केला आहे. तसेच शबाना या कधीच चित्रपटाच्या सेटवर आलेल्या नसल्याचे मनोज बाजपेयी यांनी सांगितले आहे.
‘स्क्रीन’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मनोज बाजपेयींनी त्यांची लव्ह स्टोरी सांगितली आहे. त्यांना शबाना पहिल्या नजरेत आवडल्याची कबुली त्यांनी दिली आहे. मनोज बाजपेयी म्हणाले, “आमची भेट एका पार्टीत झाली होती. यावेळी शबाना यांना भेटल्यानंतर ‘लव्ह ॲट फर्स्ट साईट’ (पाहताक्षणीच प्रेम) झाले होते. त्या काळात ‘करीब’ चित्रपटाची खूप चर्चा झाली होती आणि शबाना या त्या वर्षातील चर्चेतील अभिनेत्री होत्या. त्यांना पाहिल्यावर आणि त्यांच्याशी बोलल्यानंतर लगेचच त्यांच्या प्रेमातच पडलो. आम्ही दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडलो आणि खरं तर पहिल्या दिवसापासूनच आम्ही एकमेकांना डेट करायला सुरुवात केली,”
मनोज बायपेयींची पत्नी सेटवर का येत नाही?
मनोज बाजपेयी यांची पत्नी शबाना स्वतः एक अभिनेत्री असल्याने व्यावसायिकदृष्ट्याही त्याचा फायदा होत असल्याचे सांगितले. मनोज म्हणाले, “माझी पत्नी सिनेमाच्या गोष्टींबाबत खूप समजूतदार आणि संवेदनशील आहे. ती कधीही माझ्या शूटिंगच्या सेटवर येणार नाही, असे तिने ठरवले होते. तिच्या या निर्णयावरून हे दिसून येते. कारण सुरुवातीच्या काळातच तिच्या हे लक्षात आले की, मनोजचे व्यक्तिमत्त्व इतरांपेक्षा वेगळे आहे. जिथे तिला प्रेम व आपलेपणा दिसणार नाही, असा मनोज पाहणे अवघड होते, म्हणूनच तिने सेटवर न येण्याचा निर्णय घेतला होता.”
तिच्याकडे वेगळ्या प्रकारची समज आहे – मनोज बाजपेयी
ते पुढे म्हणाले, काही वेळा पत्नीने ‘सेट’वर यावे असे वाटते, पण तरीही ती येत नाही. खरं तर हे एका अर्थी चांगलेच आहे, कारण एक अभिनेत्री असल्याने तिला हे चांगले माहीत आहे की कामाच्या वेळी पत्नीकडे लक्ष देण्याचा आग्रह धरणे मूर्खपणाचे ठरेल. आपण जे खऱ्या आयुष्यात असतो आणि ज्या प्रकारचे काम करत असतो, हे पूर्णपणे वेगळे असते; त्यामुळे ती कधीच सेटवर येत नाही आणि सहभाग घेत नाही. ही एक वेगळ्या प्रकारची समज तिच्याकडे आहे.”
मनोज बाजपेयी व शबाना रझा लव्ह स्टोरी
शबाना रझा आणि मनोज बाजपेयी यांनी काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २००६ मध्ये लग्न केले. २०११ मध्ये या जोडप्याला ‘अवा नायला’ नावाची मुलगी झाली. शबाना रझा यांनी विधू विनोद चोप्रा यांच्या १९९८ साली प्रदर्शित झालेल्या ‘करीब’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. यानंतर त्यांनी ‘होगी प्यार की जीत’, ‘फिझा’, ‘राहुल’, ‘कोई मेरे दिल में है’, आणि ‘ॲसिड फॅक्टरी’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, नंतर त्यांनी कुटुंबाला प्राधान्य देत सिनेविश्वातील काम थांबवले. शबाना रझा या अभिनेत्री नेहा म्हणून ओळखल्या जातात. शबाना यांनी मनोज यांना कठीण परिस्थितीमध्येही भक्कम साथ दिली असून ‘सत्या’पासून ते ‘द फॅमिली मॅन’पर्यंतचा बाजपेयींचा जवळपास तीन दशकांचा प्रवास त्यांनी जवळून पाहिला आहे.
