ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे २४ नोव्हेंबर २०२५ रोजी निधन झाले. धर्मेंद्र यांच्या दोन्ही कुटुंबांनी त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रार्थना सभेचं आयोजन केलं होतं. मराठा मंदिर सिनेमाचे कार्यकारी संचालक मनोज देसाई यांनी धर्मेंद्र यांच्या प्रार्थना सभेबद्दल वक्तव्य केलं आहे. देओल कुटुंबियांनी आयोजित केलेल्या प्रार्थना सभेला हेमा मालिनी आल्या नाहीत, हे बरं झालं, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामागचं कारणही त्यांनी सांगितलं आहे.

धर्मेंद्र यांची पहिली पत्नी, प्रकाश कौर आणि त्यांची मुले, सनी देओल आणि बॉबी देओल यांनी आयोजित केलेल्या प्रार्थना सभेत प्रचंड गर्दी झाली होती. त्याच दिवशी धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी हेमा मालिनी यांनी मुंबईत त्यांच्या घरी प्रार्थना सभेचे आयोजन केले होते. विक्की लालवानीशी बोलताना मनोज देसाईंनी सांगितलं की त्यादिवशी सनी देओलला भेटण्यासाठी शेकडो लोक आले होते आणि रांग बरीच मोठी होती. देसाई स्वतःही त्या रांगेत होते.

धर्मेंद्र यांच्या प्रार्थना सभेला खूप गर्दी होती – मनोज देसाई

“तिथे गाड्यांची मोठी रांग लागली होती. माझी कार ८६ व्या क्रमांकावर उभी होती. माझ्या आधी आणि माझ्या मागे मोठमोठ्या गाड्या होत्या. प्रार्थना सभेत खूप लोक आले होते. मी सनी देओलला भेटलो आणि त्याला सांगितलं की आणखी बरेच लोक येणार आहेत, म्हणून मी समोरच्या गेटमधून बाहेर पडतोय. मी जवळपास ४५ मिनिटं माझ्या गाडीची वाट पाहत थांबलो होतो, कारण बाहेर खूप गर्दी होती,” असं मनोज देसाई म्हणाले.

अशी प्रार्थना सभा पाहिली नाही – मनोज देसाई

मनोज देसाईंच्या मते धर्मेंद्र यांच्या प्रार्थना सभेला जेवढी गर्दी झाली, तेवढी इतर कोणत्याही कलाकाराच्या प्रार्थना सभेत पाहिली नाही. “मी राजेश खन्नासह अनेक कलाकारांच्या प्रार्थना सभेला गेलो आहे, तिथे मी अमिताभ बच्चन यांच्या शेजारी बसलो होतो. मी यश चोप्रा यांच्या प्रार्थना सभेलाही गेलो होतो, पण धरमजींच्या प्रार्थना सभेला जेवढी गर्दी होती तेवढी मी कधीच पाहिली नव्हती. जणू संपूर्ण देश तिथे आलाय, असं वाटत होतं.”

Hema Malini with her daughter Esha and Ahana
नवी दिल्लीत धर्मेंद्र प्रार्थना सभेतील हेमा मालिनी त्यांची मुलगी ईशा आणि आहाना यांचा फोटो. (Express photo: Anil Sharma. 11.12.2025)

बरं झालं हेमा मालिनी आल्या नाहीत – मनोज देसाई

धर्मेंद्र यांच्या पत्नी हेमा मालिनींनी घरीच प्रार्थना सभेचं आयोजन केलं आणि सनी देओल व कुटुंबाने आयोजित केलेल्या प्रार्थना सभेला येणं टाळलं, त्याबद्दल मनोज देसाईंनी मत व्यक्त केलं. “हेमाजी आल्या नाहीत याचं मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही. अशा कोणत्याही कॉन्ट्रोव्हर्सीपूर्वीच त्यांनी धर्मेंद्र यांच्यासाठी वेगळी प्रार्थना सभा आयोजित केली होती. हेमा मालिनी आल्या नाहीत हे बरं झालं. कारण हेमा आणि धर्मेंद्रजी एकमेकांच्या खूप जवळ होते, त्यामुळे तिथे त्यांना कोणी काही बोललं असतं तर संपूर्ण प्रार्थना सभेत गोंधळ झाला असता. हेमा मालिनींनी वेगळी प्रार्थना सभा आयोजित केली हे बरं झालं,” असं मनोज देसाई म्हणाले.

धर्मेंद्र व हेमा मालिनी एकत्र यांची केमिस्ट्री खूप उत्तम होती. तसेच धर्मेंद्र यांची मुमताज व मीना कुमारी यांच्याबरोबरही चांगली केमिस्ट्री होती, असं मनोज देसाई यांनी नमूद केलं.

दरम्यान, धर्मेंद्र यांना पहिल्या पत्नी प्रकाश कौरपासून सनी देओल, बॉबी देओल, अजिता व विजेता ही चार अपत्ये आहेत. त्यांनी हेमा मालिनींशी १९८० साली दुसरं लग्न केलं. या लग्नापासून त्यांना ईशा व अहाना या दोन मुली झाल्या. धर्मेंद्र यांचं त्यांच्या ९० व्या वाढदिवसाच्या काही दिवसांपूर्वी मुंबईत निधन झालं.