Manoj Joshi Devdas Shooting Brain Stroke Incident: पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी यांनी ‘देवदास’ सिनेमामध्ये शाहरुख खानच्या भावाची भूमिका साकारली होती. ‘देवदास’ सिनेमाच्या सेटवर त्यांना ब्रेन स्ट्रोक आला होता. यावेळी मनोज जोशी हे २० दिवस कोमामध्ये होते. सेटवर दोन दिवस त्यांचे डोके दुखत होते आणि डोळे पूर्णपणे बाहेर आल्याप्रमाणे सुजल्यासारखे झाले होते, असे मनोज जोशी यांनी सांगितले.
मनोज जोशी यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये ‘देवदास’च्या सिनेमाच्या सेटवर त्यांना आलेल्या ब्रेन स्ट्रोकबद्दल सांगितले. ते म्हणाले, “२००१ साली मी ‘देवदास’ सिनेमाचे शूटिंग करत होतो. ट्विन टॉवरचा जो हल्ला झाला होता, त्याच्या आठ दिवस आधी मला ब्रेक स्ट्रोक झाला होता. सिनेमाच्या सेटवर माझे डोळे सुजायला लागले होते. पूर्णपणे डोळे बाहेर येतील असे माझे डोळे सुजले होते आणि चेहरा सुजला होता.”
डोळे बाहेर पडतील एवढे सुजले होते – मनोज जोशी
पुढे ते म्हणाले, “सकाळपासून सेटवर होतो आणि माझा शॉट येण्याची वाट बघत होतो. माझे खूप डोके दुखत होते. मी शाहरुख खानच्या मोठ्या भावाची भूमिका केली होती. मला संध्याकाळी ४ च्या सुमारास शूटिंगसाठी बोलावण्यात आलं. माझे डोळे बाहेर पडतील का काय एवढे ते सुजले होते. मी तसाच शूटिंगसाठी गेलो. दोन दिवसांपासून माझं असं भयंकर डोकं दुखतच होतं.”
पुढे मनोज जोशी म्हणाले, “मला फॅमिली डॉक्टरने दोन दिवसांमध्ये चार इंजेक्शन दिली होती. नाईट शिफ्ट असल्यामुळे माझे डोके दुखत असल्याचे मला वाटत होते. डोकं दुखायला लागले तर एक गोळी खाण्यासाठी मला दिली होती. मी त्या दिवशी दर चार तासांनी एक-एक गोळी घेतली होती. एकाच दिवशी दोन-तीन गोळ्या घेऊनही माझे डोके दुखायचे थांबत नव्हते. पहाटे ३.३० ते ४ वाजण्याच्या सुमारास मी चेकिंगसाठी गेलो आणि त्यांनी माझ्या पत्नीला मला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. हे खूपच धोकादायक असून माझ्या डोक्यातील दोन रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक असून त्यात रक्ताच्या गाठी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते.”
मनोज जोशी यांनी सांगितले की ते सव्वा महिना लीलावती हॉस्पिटलमध्ये होते. पुढे ते म्हणाले, “काही वर्षे आधीच माझ्या लहान भावाचे अपघाती निधन झाले होते, त्यामुळे माझ्या पत्नीने आई-वडिलांना याबद्दल काहीही सांगितले नव्हते. तिने फक्त त्यांना सगळं नीट होईल असे सांगितले होते. मी २० व्या दिवशी भानावर आलो होतो आणि मी काहीही हालचाल करू शकत नव्हतो. तेव्हा माझे बँकेतील पूर्ण पैसे संपले होते. त्या काळामध्ये माझ्या बायकोने मला पूर्ण पाठिंबा दिला, तिने ट्युशन घेतले आणि पैसे जमा केले.”
