२०२३ मध्ये प्रदर्शित झालेला ‘आदिपुरुष’ हा चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक होता. मोठं बजेट असलेल्या या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता प्रभास, कृती सेनॉन आणि सैफ अली खान यांसारखे कलाकार झळकले होते. रामायणावर आधारित असल्याने हा चित्रपट अनेक रेकॉर्ड ब्रेक करेल, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाच्या व्हिज्युअल इफेक्ट्स (VFX) आणि संवादांवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. त्यावेळी चित्रपटाचे संवादलेखक मनोज मुंतशिर यांनी ‘आदिपुरुष’चं समर्थन केलं होतं. मात्र, आता त्यांनीच या चित्रपटासाठी संवाद लिहिणं आणि त्याचं समर्थन करणं ही आयुष्यातील सर्वात मोठी चूक असल्याचं वक्तव्य केलं आहे.
Times Nowशी बोलताना मनोज मुंतशिर यांनी सांगितलं की, चित्रपटाचं सार्वजनिकरित्या समर्थन करू नकोस, असा सल्ला त्यांच्या पत्नीने दिला होता. ‘आदिपुरुष’ प्रदर्शित होण्याच्या जवळपास सहा महिने आधीपासूनच चित्रपटावर प्रश्न उपस्थित केले जात होते आणि सोशल मीडियावर ट्रोलिंग सुरू झालं होतं. या वादाचं मुख्य लक्ष्य तेच ठरतील, अशी भीती त्यांच्या पत्नीला होती. मागे वळून पाहताना पत्नीचा सल्ला न ऐकल्याचाही त्यांना पश्चात्ताप होत असल्याचं त्यांनी मान्य केलं.
चित्रपटावर झालेल्या टीकेबाबत मनोज यांचं वक्तव्य
‘आदिपुरुष’बद्दल मनोज म्हणाले, “सुरुवातीला मी या टीकेकडे फारसं गांभीर्याने पाहिलं नाही, पण दोन दिवसांत मला सगळं समजलं. आदिपुरुष हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा चुकीचा निर्णय होता आणि त्या चित्रपटाचं समर्थन करणं ही त्याहूनही मोठी चूक होती. या चित्रपटाभोवती जे काही घडलं, त्याची मला खूप लाज वाटते. जे घडलं त्यासाठी मी या देशाची मनापासून माफी मागतो.”
गीतकार आणि लेखक मनोज मुंतशिर यांनी पुढे कबूल केलं की, प्रभू श्रीराम आणि हनुमान यांच्या व्यक्तिरेखेला न्याय देता आला नाही, याची त्यांना खंत वाटते. तसेच, हनुमान यांच्याबाबत केलेल्या त्यांच्या अनेक वक्तव्यांचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले, “आज जेव्हा मी मागे वळून पाहतो, तेव्हा ते संवाद लिहिल्याची मला लाज वाटते. ते लिहिताना माझ्या मनात नेमकं काय चाललं होतं, हेच मला आता कळत नाही.”
