Manoj Muntshir react on CJP Jantar Mantar Protest : दिल्लीतील जंतर-मंतरवर नीट पेपरफुटी प्रकरण आणि शिक्षण व्यवस्थेतील कथित गैरव्यवहारांविरोधात विद्यार्थी आणि कॉक्रोच जनता पार्टीचं तीव्र आंदोलन सुरू आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलकांनी जोरदार निदर्शनं केली जात आहेत. या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आल्यानं संपूर्ण देशातून नाराजी व्यक्त केली जात आहे. या आंदोलनाला राजकीय वर्तुळातून आणि सिनेविश्वातील कलाकारांकडून पूर्ण पाठिंबा मिळताना दिसत आहे. काही कलाकार हे आंदोलनामध्ये सहभागीदेखील झाले आहेत. मात्र, गीतकार मनोज मुंतशीर यांनी या आंदोलनापासून स्वतःला दूर ठेवत वेगळी भूमिका मांडली आहे. आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या लोकांबरोबर उभे राहण्याची इच्छा नसल्याचं मत मनोज मुंतशीर यांनी व्यक्त केलं आहे.

मागील अनेक दिवसांपासून ‘नीट’ पेपरफुटी व गैरव्यवहाराविरोधात दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे. मात्र, त्यानंतर दिल्ली पोलिसांनी सोनम वागंचुक यांना उपोषणस्थळावरून उचलून नेले आणि तरुण आंदोलकांवर लाठीचार्ज करीत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतर संपूर्ण देशातून संतप्त प्रतिक्रिया येत असताना मनोज मुंतशीर यांनी मात्र आंदोलनाला पाठिंबा नसल्याचं सांगितलं. नीट पेपरफुटी प्रकरण चुकीचं असून, त्याचं समर्थन करीत नाही; पण या आंदोलनाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकांना पाठिंबा देणार नसल्याचं मत मनोज मुंतशीर यांनी व्यक्त केलं.

तरुणांना कॉक्रोच जनता पार्टीपेक्षा चांगलं नेतृत्व पाहिजे – मुंतशीर

‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मनोज मुंतशीर म्हणाले, “मला जंतरमंतरवर जायचं नाही, कारण या आंदोलनाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकांबरोबर उभं राहणं मला योग्य वाटत नाही. या देशातील तरुणांना कॉक्रोच जनता पार्टीपेक्षा चांगलं नेतृत्व मिळायला हवं. या जगात नीट पेपरफुटीचं समर्थन कोणीही करू शकत नाही. जे घडलं, ते चुकीचंच होतं. या प्रकरणामुळं विद्यार्थ्यांचंही आयुष्य उद्ध्वस्त झालं असेल, तर त्याची जबाबदारी संपूर्ण व्यवस्थेला घ्यावी लागेल.”

मनोज मुंतशीर यांनी दिल्लीतील हे आंदोलन आता मूळ मुद्द्यापासून बाजूला झाल्याचं मत व्यक्त केलं. ते म्हणाले, “हे आंदोलन आता मूळ मुद्द्यापासून भरकटलं आहे. जंतर-मंतरवर खरंच नीट पेपरफुटीबद्दल चर्चा होत आहे का? तिथे दिली जाणारी भाषणं आणि आंदोलनात सहभागी होणाऱ्या लोकांकडे मी पाहत आहे. यापूर्वी ‘भारत तेरे तुकडे होंगे’ अशा घोषणा देणारे आणि काश्मीर हा भारताचा भाग नाही, असं मानणारे लोक या आंदोलनात सहभागी झाले आहेत. पूर्ण जबाबदारीनं मी अशा लोकांना देशविरोधी म्हणतो,”

याचबरोबर या आंदोलनावर स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराने केलेल्या वक्तव्यावर मनोज मुंतशीर यांनी आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले, “भगवान श्रीरामांचा उल्लेख करीत केलेला विनोद अत्यंत आक्षेपार्ह आहे. हे वक्तव्य अत्यंत अपमानास्पद आहे.”