scorecardresearch

“तो खिलजीसारखा दिसला तर गैर काय?” मनोज मुंतशीर यांचं ‘आदिपुरुष’मधील रावणाला समर्थन

‘आदिपुरुष’मध्ये सैफ अली खानने साकारलेल्या रावणाला सोशल मीडियावर तीव्र विरोध होतोय.

“तो खिलजीसारखा दिसला तर गैर काय?” मनोज मुंतशीर यांचं ‘आदिपुरुष’मधील रावणाला समर्थन
अनेकांनी सैफने साकारलेल्या रावणाला विरोधा केला आहे

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘आदिपुरष’ चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. यात कलाकारांची पहिली झलक पाहायला मिळाली. ‘रामायण’वर आधारित असलेल्या या चित्रपटात सैफ अली खानने साकारलेला रावण पाहून अनेकांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. या चित्रपटात हनुमान आणि रावण यांना ज्याप्रकारे आधुनिक रुपात दाखवलं गेलं आहे. ते लोकांना अजिबात आवडलेलं नाही. अनेकांनी सैफने साकारलेल्या रावणाला विरोधा केला आहे, पण अशात प्रसिद्ध गीतकार आणि चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांनी मात्र याचं समर्थन केलं आहे.

‘आदिपुरुष’चा टीझर पाहिल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना चित्रपटातील पात्राचं इस्लामीकरण झाल्याचा दावा केला आहे. हळूहळू चित्रपटाला होणारा विरोध वाढताना दिसतोय. अनेक शहरांध्ये या चित्रपटाच्या विरोधात प्रदर्शन सुरू आहे. रामायणातील व्यक्तिरेखांशी छेडछाड केल्याचा आरोप करत काही ठिकाणी कलाकरांचे पुतळेही जाळण्यात आले आहेत. आता चित्रपटाचे संवाद लिहिणारे लेखक आणि गीतकार मनोज मुंतशीर यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर एका मुलाखतीचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात ते रावणाची खिलजीशी तुलना होण्यावर आपले विचार मांडताना दिसत आहेत.

आणखी वाचा- भाजपाने विरोध केलेल्या ‘आदिपुरुष’ सिनेमाला मनसेचा जाहीर पाठिंबा, म्हणाले “हे राम कदम आणि हिंदुत्ववादी म्हणवून घेणारे…”

मनोज मुंतशीर म्हणाले, “मी १ मिनिट ३५ सेकंदांचा टीझर पाहिला, त्यात रावणाने त्रिपुंडी लावली आहे. जे मी पाहिलं त्यावर मी बोलत आहे. तसं पाहिलं तर दाखवायला बरंच काही आहे माझ्याकडे जे लोकांनी अद्याप पाहिलेलं नाही. मी हे विनम्रपणे सांगतोय, जेव्हा चित्रपट प्रदर्शित होईल तेव्हा सर्वजण पाहतील. कोणता खिलजी त्रिपुंडी लावतो, कोणता खिलजी टिळा लावतो, कोणता खिलजी जानवं घालतो आणि कोणता खिलजी रुद्राक्ष धारण करतो. आमच्या रावणाने या टीझरमध्ये हे सर्व केलं आहे.”

आणखी वाचा- “‘आदिपुरुष’मधील रावण तालिबानी…” ‘महाभारता’त दुर्योधन साकारणाऱ्या अभिनेत्याची संतप्त प्रतिक्रिया

मनोज मुंतशीर पुढे म्हणाले, “दुसरी गोष्ट अशी की, प्रत्येक युगात वाईटाचा किंवा खलनायकाचा वेगळा चेहरा असतो. रावण माझ्यासाठी तसाच एक वाईट चेहरा आहे. अलाउद्दीन खिलजी त्या काळातला वाईट चेहरा होता आणि जर दोन्ही चेहरे मिळते- जुळते असतील तरीही आम्ही हे जाणून- बुजून केलेलं नाही. जर तो खिलजीसारखा दिसत असेल तर मला वाटत नाही यात काही गैर आहे. खिलजी काही नायक नव्हता. तो वाईट होता. जर रावणाचा चेहरा त्याच्यासारखा दिसत असेल तर त्यात चुकीचं काहीच नाही.”

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या