Mansoor Khan reveals why he quit Bollywood and Mumbai: मन्सूर खान हे बॉलीवूडमधील उत्तम दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. दिग्दर्शक म्हणून त्यांची कारकीर्द कमी काळाची आहे. गेल्या २५ वर्षांत त्यांनी एकाही प्रोजेक्टचे दिग्दर्शन केले नाही. मात्र, तरीही त्यांनी जितक्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले, त्या चित्रपटांची चर्चा आजही होताना दिसते. या निमित्ताने मन्सूर खान यांचीही चर्चा होताना दिसते. मन्सूर खान यांचे वडील नासिर हुसेन हे लोकप्रिय दिग्दर्शक-निर्माते आहेत. १९८८ ला प्रदर्शित झालेल्या ‘कयामत से कयामत तक’ या सिनेमातून त्यांनी दिग्दर्शनात पाऊल ठेवले होते. या सिनेमात मन्सूर खान यांचा चुलत भाऊ आमिर खान व जुही चावला प्रमुख भूमिकेत होते.

त्यानंतर मन्सूर खान यांनी १९९२ ला प्रदर्शित झालेला ‘जो जीता वोही सिकंदर’ आणि १९९५ ला प्रदर्शित झालेला ‘अकेले हम अकेले तुम’ या चित्रपटांमध्ये आमिर खानबरोबर दोनदा काम केले. याबरोबरच त्यांनी २००० साली प्रदर्शित झालेल्या ‘जोश’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. या सिनेमात शाहरुख खान व ऐश्वर्या राय प्रमुख भूमिकेत होते.

मन्सूर खान यांनी दिग्दर्शित केलेले सर्व सिनेमे लोकप्रिय ठरले. तरीही त्यांनी पुढे अभिनय क्षेत्रातून, दिग्दर्शनातून ब्रेक घेतला. इतकेच नाही तर ते मुंबईतही रहात नाहीत. त्यांनी मुंबई सोडली आणि ते आता तामिळनाडू येथील कुन्नूरमध्ये राहत आहेत. तिथे त्यांची शेती आहे.

मन्सूर खान यांनी का सोडलं बॉलीवूड?

आता नुकत्याच एका मुलाखतीत बॉलीवूड व मुंबई सोडण्यामागील कारण त्यांनी सांगितले आहे. त्यांनी व्हरायटी इंडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीत ते म्हणाले की, चित्रपटातील नायक कसे स्व‍च्छंदी दाखवले जातात, मला तसेच जगायचे होते. मला भटक्यासारखे जगायचे होते, म्हणून माझ्या सिनेमातील नायकही तसेच आहेत.

पुढे ते असेही म्हणाले, “एमआयटीमध्ये विद्यार्थी म्हणून शिक्षण घेत असतानाच माझ्या मनात मुंबई सोडून इतर ठिकाणी स्थायिक होण्याची इच्छा होती. १९९१ मध्ये आम्ही महाराष्ट्रातील मांडवा येथे जमिनीचा तुकडा विकत घेतला. मी भविष्यात चित्रपटसृष्टी सोडेन याची मला खात्री होती. मी तिथे राहण्याचा आनंद घेतला. पण, १९९७ मध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी ती जमीन सरकारने ताब्यात घेतली. मांडवा येथे राहणे जमले नाही, म्हणून मी २००३ ला कुन्नुर येथे स्थलांतरित झालो.”

शेतीबद्दल ते म्हणाले, “आमच्या शेतात अनेक प्राणी येतात. हत्ती, बिबटे, बदके, कोंबड्या आणि हंसही येतात. हत्ती मैदानी प्रदेशात जातात, पण परत येतात. बिबट्या हा खरं तर एक भित्रा प्राणी आहे. हत्ती बिबट्यापेक्षा खूप जास्त धोकादायक आहे. आमच्याकडे राहायला आलेल्या पाहुण्यांनी बिबट्याला रात्री त्यांच्यासाठी ठेवलेल्या भांड्यातून पाणी पिताना पाहिले आहे.”

पत्नी टीनाला मुंबईत राहणे आवडते की कुन्नुरमध्ये, याबद्दलही मन्सूर खान यांनी वक्तव्य केले. ते म्हणाले, “माझ्या पत्नीला कुन्नुरमध्येच राहायला आवडते. आर्थिक अडचणी आल्यानंतर काही काळ मुंबईत राहूया, असे मी सुचवले होते. पण, तिने त्याला नकार दिला.” या जोडप्याला दोन मुले आहेत. त्यांची मुलगी झैन मेरी खान ही अभिनय क्षेत्रात काम करत आहे.

काही दिवसांपूर्वीच जुनैद खान व साई पल्लवी यांचा ‘एक दिन’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. मन्सूर खान यांनी आमिर खान यांच्यासह सिनेमाची सहनिर्मिती केली आहे.