Chinmay Mandlekar on Manoj Bajpayee: चिन्मय मांडलेकर एक उत्तम अभिनेता, लेखक म्हणून लोकप्रिय आहे. इन्स्पेक्टर झेंडे या चित्रपटानंतर उत्तम दिग्दर्शक म्हणूनही त्याची ओळख निर्माण झाली आहे. त्याने मालिका, सिनेमांमध्ये काम करीत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत चिन्मय मांडलेकरने मनोज वाजपेयींबद्दल वक्तव्य केले आहे. अमोल परचुरेंच्या कॅचअप या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत चिन्मय मांडलेकरने त्याच्या अभिनयाच्या कारकि‍र्दीमधील अनेक गोष्टी सांगितल्या. काही अनुभव सांगितले. तसेच मराठी सिनेमांवर वक्तव्य केले.

चिन्मय मांडलेकरने दिग्दर्शित केलेला इन्स्पेक्टर झेंडे हा चित्रपट २०२५ ला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात मनोज वाजपेयी प्रमुख भूमिकेत दिसले होते. या चित्रपटातील प्रमुख भूमिकेसाठी त्यांची निवड का केली, मनोज वाजपेयींबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता, याबद्दल वक्तव्य केले.

Award Banner

चिन्मय मांडलेकरने या मुलाखतीत असेही सांगितले की, मनोज वाजपेयींची या भूमिकेसाठी निवड होण्यासाठी अजय देवगणला विचारले होते. मात्र, अजय देवगण आधी सिंघम या भूमिकेमुळे लोकप्रिय असल्याने त्यानं ही भूमिका करू शकत नाही, असे सांगितले. त्यानंतर अनेक कलाकारांना याबद्दल विचारणा झाली. सैफ अली खान, जॉन अब्राहम, अभिषेक बच्चन, आयुष्मान खुराना या सगळ्या कलाकारांना मी गोष्ट ऐकवली होती. जेव्हा नेटफ्लिक्सबरोबर या चित्रपटाची चर्चा झाली, त्यावेळी ओमने अचानक मनोज वाजपेयी यांचं नाव सांगितलं.

“मनोज वाजपेयी हा माझ्यासाठी असा पहिला अभिनेता होता, ज्याला…”

मनोज वाजपेयी यांच्याबद्दल चिन्मय म्हणाला, “१९९८ ला सत्या हा चित्रपट आला. ‘सत्या’मुळे मनोज वाजपेयी यांचं नाव चर्चेत आलं. ९८ साली मी एस.वाय. बी.कॉम.ला होतो. त्यावेळी मी नाटकात काम करीत होतो. त्यावेळी एनएसडीला जायचं आहे, हे माझं आधीच ठरलं होतं. माझ्याबरोबर अनेक लोक होते, जे नाटक करीत होते, ज्यांना अभिनयात करिअर करायचं होतं. पण, यामध्ये करिअर करावं की नाही, याबद्दल खात्री नव्हती.”

“आम्ही त्यावेळी द्विधा मनस्थितीत होतो की यामध्ये करिअर करावं की वडील सांगताहेत तशी एक नोकरी करावी आणि हौशी रंगभूमी करावी. अभिनय कसा करावा यासाठी नसिरुद्धीन शहा, ओम पुरी हे प्रेरणा होते. अमिताभ बच्चन हे आमचे स्टार होते. त्यांना बघून आम्ही भारावून जायचो.”

“मनोज वाजपेयी हा माझ्यासाठी असा पहिला अभिनेता होता, ज्याला बघून वाटलं की जर हा माणूस बिहारच्या एका गावातून येऊन हे करू शकतो. तर आपण हे करू शकतो. तर माझ्या पिढीतील अनेकांसाठी अभिनयात करिअर करावं यासाठी मनोज वाजपेयी हे प्रेरणा ठरले”, असे सांगत ही गोष्ट मी मनोज वाजपेयींना जेव्हा भेटलो तेव्हा त्यांना सांगितली आहे, असे चिन्मयने सांगितले.

“समोरच्याला वाटतच नाही की, एका मोठ्या…”

पुढे इन्स्पेक्टर झेंडेदरम्यान जेव्हा त्यांच्याबरोबर काम केले, या चित्रपटात त्यांना दिग्दर्शित केले, त्याचा अनुभव चिन्मयने सांगितला. चिन्मयने, “मी जेव्हा त्यांना गोष्ट ऐकवण्यासाठी गेलो, तेव्हा मला खूप टेन्शन आलं होतं. पण, त्या माणसाइतका सहज माणूस मी बघितला नाही. ते समोरच्याला सहज करून टाकतात. म्हणजे समोरच्याला वाटतच नाही की, एका मोठ्या स्टारबरोबर बोलत असल्याची जाणीव होत नाही. ते अजूनही बिहारमधून आलेला मुलगा वाटतात. त्यांचा ऑरा जाणवत राहतो; पण ते तो जाणवू देत नाहीत. त्यांनी स्क्रिप्ट ऐकल्यानंतर या चित्रपटासाठी होकार दिला. त्यांनी मला एकच विचारलं की, तू या चित्रपटाकडे कसं पाहतोस? मी त्यांना सांगितलं की, फन फिल्म असणार आहे. त्यावर ते म्हणाले की ठीक आहे, मजा करूया. त्यानंतर आमचे सूर जुळले. मग ती सगळी प्रोसेस सुरू झाली”, असे म्हणत मनोज वाजपेयींबद्दल भावना व्यक्त केल्या.

चित्रपट दिग्दर्शित करण्याबद्दल चिन्मय म्हणाला की, मी हा पहिलाच चित्रपट दिग्दर्शित केला, तोही थेट हिंदी चित्रपट. हे इतकं सोप नाहीये. कारण- तुमच्यावर लोकांचा विश्वास बसायला वेळ लागतो. पण, याचे श्रेय ओम राऊतला जाते. त्याला असे वाटत होते की, इन्स्पेक्टर झेंडे चित्रपट मीच दिग्दर्शित करावा.

दरम्यान, २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. मनोज वाजपेयींसह या चित्रपटात भाऊ कदम, सचिन खेडेकर आणि इतर कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत दिसले आहेत.