Drishyam Inspector Gaitonde Kamlesh Sawant : ‘दृश्यम’ या क्राईम थ्रिलर फ्रँचायझीचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात ‘दृश्यम’चा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या दोन्ही भागात मराठी कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली होती. यापैकी चित्रपटातील एक असं पात्र ज्याला पाहून लोकांच्या तळपायाची आग मस्तकात जाते ते म्हणजे पोलिस अधिकारी गायतोंडेचं. हे पात्र साकारलंय मराठी अभिनेते कमलेश सावंत यांनी!

कमलेश सावंत यांनी हे पात्र इतकं उत्तमरित्या साकारलंय की, सिनेमा प्रदर्शित झाल्यावर त्यांची भूमिका पाहून प्रेक्षक त्यांच्यावर खरंच भडकले होते. त्यांच्याबरोबर फोटो काढण्यासही तयार नव्हते. याबाबत कमलेश सावंत यांनी ‘मित्र म्हणे’ला दिलेल्या मुलाखतीत भन्नाट किस्से सांगितले आहेत.

कमलेश सावंत म्हणाले, “दृश्यम’ प्रदर्शित होण्याआधीच मला इंडस्ट्रीतल्या खूप जणांनी फोन केले होते. कारण, त्यांनी सिनेमाची ट्रायल पाहिली होती. सर्वांनी परफॉर्मन्सचं कौतुक केलं. मी तोपर्यंत ट्रायल पाहायला एकदाही गेलो नव्हतो. मग, तेव्हा मला निशिकांत सरांचा रात्री फोन आला. ते म्हणाले, “चुकून चांगलं काम केलंय…आता स्वत:च्या सिनेमाचा ट्रायल पाहायला एकदा तरी या!” खरंतर, मी थिएटरमध्ये झोपतो म्हणून मी गेलो नव्हतो. पण, सरांचा फोन आल्यावर शेवटच्या दिवशी गेलो. मध्यांतर होईपर्यंत मी झोपलो होतो पण, दुसरा अंक नीट पाहिला.”

कमलेश सावंत पुढे सांगतात, “सिनेमा पाहिल्यावर मी बाहेर आलो आणि तेव्हा मला आमचे एडिटर दिसले. ते मला म्हणाले, “कमलेशजी तिथे त्या बायका उभ्या आहेत…त्यांनी सांगितलंय या नीच माणसासमोर आम्ही अजिबात येणार नाहीये पण, त्यांना सांगा परफॉर्मन्स चांगला होता.” माझं असं झालं…ही कोणती अजब प्रतिक्रिया आहे.”

“तेवढ्यात एक बाई हिंमत करून माझ्याजवळ आली आणि ती म्हणाली, ‘आपके मुंह पर थूकना चाहती हूँ….तुम्ही चांगलं काम केलंय.’ मग, दुसरी बाई आली ती म्हणाली, ‘तुम्हाला चपलाने मारवंसं वाटतंय पण, तुम्ही काम चांगलं केलंय.’ मी तेव्हा विचार केला जातो बाबा घरी…आता माझं खरं नाही.”

“मी लगेच गाडीने कळव्याला माझ्या घरी पोहोचलो आणि बायकोला सगळं सांगितलं. तिला विचारलं म्हटलं मी इतकं काय वाईट केलंय की, त्या बायका मला असं काय-काय बोलल्या. कारण, माझा तो पहिला अनुभव होता. पण, नंतर माझ्याबरोबर लोक फोटोही काढत नव्हते. हे गोष्ट जरूर मान्य करेन… नशिबाने मला ‘दृश्यम’ मिळाला आणि पुढे सगळं चांगलं झालं.” असं मत कमलेश सावंत यांनी व्यक्त केलं.