अजय देवगणच्या ‘दृश्यम’ सिनेमात लोकप्रिय मराठी अभिनेते कमलेश सावंत यांनी पोलीस अधिकारी गायतोंडेची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे घराघरांत त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली. २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘खाकी’ या मल्टीस्टारर बॉलीवूड सिनेमात सुद्धा कमलेश सावंत झळकले होते. यावेळी त्यांना पहिल्यांदाच महानायक अमिताभ बच्चन यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली होती.

याबद्दल कमलेश सावंत ‘मित्र म्हणे’ला दिलेल्या मुलाखतीत सांगतात, “बच्चन साहेबांकडून खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. ते नेहमी सेटवर अर्धा तास आधी येतात. जर, त्यांचा कॉलटाइम ७ वाजताचा असेल तर ते साडेसहाच्या आधी सेटवर येतात आणि सातच्या कॉलटाइमला मेकअप वगैरे करून एकदम रेडी असतात. मग, तुम्ही शॉट घ्या किंवा नका घेऊ…जोपर्यंत त्यांना दिग्दर्शक सांगत नाही की, तुम्ही व्हॅनिटीमध्ये जाऊ शकता…तोपर्यंत बच्चन साहेब ऊन असेल तरी बाहेर बसून राहतात.”

कमलेश सावंत पुढे म्हणाले, “खाकी सिनेमाच्या शूटिंगदरम्यान त्यांना एका सीनसाठी पँट बदलायची होती आणि व्हॅनिटी व्हॅन दूर होती…त्यांच्या टीमने सर्कल करून घेतला, तेव्हा त्यांनी रस्त्यात पँट बदलली होती. खाकी सिनेमासाठी मी जवळपास ७५ दिवस काम केलं. पहाटे साडेचारचा वेकअपकॉल असायचा विथ वेकअप टी… त्यानंतर सहा वाजता आम्ही व्हॅनिटीमध्ये असायचो. त्या सिनेमासाठी मला ७५ दिवसांचे फक्त ४५ हजार रुपये मिळाले होते. बच्चन साहेब, अक्षय सर, तुषार कपूर, ऐश्वर्या राय हे कलाकार सिनेमात आहेत म्हणून मी होकार अजिबातच दिला नव्हता. मला कमर्शिअल सिनेमात काम करायचं होतं म्हणून मी खाकीसाठी तयार झालो.”

“माझ्या घरात बच्चन साहेब म्हणजे सुपरस्टार…आणि त्यांच्याबरोबर मला काम करायला मिळणं ही सुद्धा मोठी संधीच होती. पण, मला असं काही वेगळं वाटत नव्हतं. अमिताभ बच्चन यांच्याबरोबरचा पहिला सीन वन टेक ओके झाल्यावर सगळे मला विचारत होते कसं वाटलं? पण, माझी प्रतिक्रिया अशी होती, अरे त्याच्यात काय…मी आमच्या मराठीतले सुपरस्टार विक्रम गोखले यांच्याबरोबर काम करून मला जे फील होतं…तेच फील आताही झालं.” हा अनुभव कमलेश सावंत यांनी शेअर केला आहे.

दरम्यान, आता कमलेश सावंत ‘दृश्यम ३’ सिनेमात पुन्हा एकदा गायतोंडेच्या भूमिकेत झळकताना दिसणार आहेत. हा चित्रपट २ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रदर्शित होईल.