Kshitee Jog Reaction On Dharmendraज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते धर्मेंद्र यांचं वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झालं आहे. वयाशी संबंधित आजारांमुळे गेल्या काही दिवसांपासून ते मुंबईत उपचार घेत होते. अखेर आज त्यांनी जगाचा निरोप घेतला. धर्मेंद्र यांच्या निधनानं भारतीय चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत झाला आहे.

बॉलीवूडसह मराठी कलाविश्वातीलही अनेक कलाकार मंडळी त्यांच्या निधनानं भावूक झाले आहेत. अशातच मराठी अभिनेत्री क्षिती जोगनं धर्मेंद्र यांच्या निधनानंतर भावूक प्रतिक्रिया दिली आहे. क्षितीनं धर्मेंद्र यांच्याबरोबर ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या बॉलीवूड सिनेमात एकत्र काम केलं आहे. याच सिनेमानिमित्तच्या धर्मेंद्र यांच्या जुन्या आठवणींना क्षितीनं उजाळा दिला.

सकाळ प्रीमियरला दिलेल्या मुलाखतीत क्षिती म्हणाली, “धर्मेंद्र यांच्या निधनाची दु:खद बातमी कळल्यानंतर खूपच वाईट वाटलं. माझं नशीब चांगलं म्हणून मला त्यांच्याबरोबर काम करता आलं. अत्यंत प्रेमळ व्यक्तिमत्त्व. अत्यंत साधं व्यक्तिमत्त्व. आम्हा सगळ्यांना सेटवर ते कायम सांभाळून घ्यायचे. मलासुद्धा खूप सांभाळून घेतलं. अशातच त्यांची ही बातमी येणं खूपच वाईट आणि दु:खद आहे. माझी आई ज्यांच्याकडे बघून म्हणायची की, ‘काय हिरो आहे…’ आणि आम्हीही ते करत राहिलो. पुढच्या पिढीलाही ते तितकेच आवडत राहिले. त्यांच्या निधनाचं कळताच खूप वाईट वाटलं.”

Award Banner

“धर्मेंद्र कायमच आपल्या स्मरणात राहतील”

यानंतर क्षितीनं ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’च्या सेटवरील आठवण शेअर करीत म्हटलं, “धर्मेंद्र अनेकदा सेटवर कविता म्हणायचे. त्यांनी अनेक कविता वाचलेल्या असायच्या, त्या त्यांच्या लक्षात असायच्या आणि त्या आम्हाला ते सेटवर वाचून दाखवायचे. सेटवर ते कधीच त्यांच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये बसलेत असं झालं नाही. ते सेटवर कायम आमच्याबरोबरच एकत्र बसायचे. आम्ही त्यांच्यापेक्षा इतके लहान असूनही आमच्याबरोबर तितकाच वेळ घालवायचे, गप्पा मारायचे. जुने किस्से, आठवणी शेअर करायचे. त्यांच्याबरोबर काम करताना फार मजा आली. पण, आता ते आपल्यात नाहीत हे ऐकून भरून आलं आहे. ते कायमच आपल्या स्मरणात राहतील, देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो.”

क्षिती जोग इन्स्टाग्राम स्टोरी
क्षिती जोग इन्स्टाग्राम स्टोरी

दरम्यान, धर्मेंद्र यांच्या निधनानंतर मनोरंजन सृष्टीत एक पोकळी निर्माण झाली आहे. धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल कळताच अनेक कलाकार आणि चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे.