नेहा जोशीने आजवर मराठी, हिंदी चित्रपट, मालिकांमध्ये काम करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. नेहाने ‘पोश्टर बॉईज’, ‘फर्जंद’, ‘नशिबवान’, ‘हवा हवाई’ अशा अनेक चित्रपटांत काम केले आहे.
‘बघतोस काय मुजरा कर’, ‘न्यूड’, ‘झेंडा’, ‘लागबागची राणी’ तसेच ‘दृश्यम २’ या चित्रपटांत काम करत नेहाने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता नुकत्याच एका मुलाखतीत अभिनेत्रीने दृश्यम २ मध्ये अजय देवगण व तब्बू यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. ते त्यांच्या सहकलाकारांशी कसे वागतात, याबद्दल तिने वक्तव्य केले आहे.
“तो माझ्या कामाबद्दलचा…”
नेहा जोशीने नुकतीच ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला विचारले की मराठी इंडस्ट्रीमध्ये राजकारणामुळे चांगले कलाकार मागे पडलेत असं वाटतं का? यावर नेहा म्हणाली, “मराठी इंडस्ट्रीमध्ये नाही, बऱ्याच ठिकाणी मागे पडले आहेत. पण, हिंदीमध्ये मला असा अनुभव आला की तिथे खूप लोकांनी माझ्या कामाचा आदर केला. मी पहिली मालिका केली, तोपर्यंत ही कोण मुलगी आहे, हे त्यांना माहितही नव्हतं. त्यानंतर त्याच चॅनेलबरोबर मी चार-पाच वर्षे काम केले. तीन शो केले. त्यांनी मला आदराने वागवलं. तो माझ्या कामाबद्दलचा आदर होता.”
मराठी इंडस्ट्रीमध्ये कलाकारांना आदर दिला जात नाही, असं तुला वाटतं का? यावर नेहा म्हणाली, “मला वाटतं की आपण माणसं अशी आहोत की आपण गोष्टींना गृहीत धरतो. आदर नाही, असं नाही. तो असेलही. पण कशाला दाखवायचा आहे? समोरची व्यक्ती चांगलीच आहे, आपलीच आहे, असा विचार केला जातो. पण, असेही काही कलाकार आहेत, जे हे सगळं सांभाळूनही खूप चांगल्या पद्धतीने काम करतात.”
“जेव्हा मी दृश्यमचं शूटिंग जेव्हा केलं, तेव्हासुद्धा…”
‘दृश्यम २’ च्या शूटिंगचा अनुभव सांगत नेहा म्हणाली, “जेव्हा मी दृश्यमचं शूटिंग जेव्हा केलं, तेव्हासुद्धा माझ्या हे लक्षात आलं की इतके मोठे-मोठे कलाकार आहेत. अक्षय खन्ना, अजय देवगण, तब्बू हे कलाकार त्यामध्ये काम करत होते. पण, जेव्हा मी त्यांच्याबरोबर सीन करत होते, त्यावेळी ते माझ्याबरोबर सहकलाकार म्हणून काम करत होते. “
पुढे ती म्हणाली, “सीनचं लाईटिंग सुरू होतं आणि मी मार्कवर उभी होते. त्यावेळी अजय देवगण मला म्हणाले की एकदा सीन वाचूया का? तर मी हो म्हणाले. त्यानंतर मी त्यांच्याकडे जायला लागले. तर ते मला म्हणाले की तुम्ही लाईटिंग मार्क उभ्या आहात ना? तुम्ही तिथेच उभ्या राहा. ते उठले. त्यांची खुर्ची घेऊन माझ्याजवळ आले. मग आम्ही वाचन केलं. अजय देवगणने केलेली ही गोष्ट खूप मोठी आहे, असं नाही. उलट, ही सामान्य गोष्ट आहे. पण, ते हे करतात आणि म्हणून कदाचित इतकी वर्षे त्या उंचीवर टिकून आहेत. कारण- तसं बघायला गेलं तर त्यांनी माझ्याबरोबर सीन वाचला नसता, तर त्यांना काही फरक पडला नसता.”
“माझं त्यांच्याबरोबर थोडं…”
तब्बूबद्दल नेहा जोशी म्हणाली, “मी काहीतरी प्रश्न विचारत होते आणि तब्बू तिथे जवळच बसलेल्या होत्या. मला असं वाटलं की आपण बोलायला नाही पाहिजे, म्हणून मी गप्प बसले. त्यावर त्या म्हणाल्या की तुम्ही काहीतरी बोलत होता, तो प्रश्न माझ्याही मनात होता. तुम्ही काय विचारत होता? असं त्यांनी विचारलं. माझं त्यांच्याबरोबर थोडं काम होतं. एखादा सीन होता.पण, कामाला आदर मिळाला आणि सहकलाकार म्हणून त्या माझ्याकडे बघत होत्या. यामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे की आपण त्यांच्यासमोर कसे वागतो, हेही महत्वाचे आहे.”
नेहा म्हणाली, “हिंदीमध्ये काम करताना आपण स्वत:वर विश्वास ठेवला. मी उगाचच वाकणार नाही. मी आगाऊपणा करणार नाही. पण, बॉलीवूड कलाकारांच्या प्रत्येक गोष्टीला होकारही देणार नाही. मी शांत बसेन. मला जितकं कळलं आहे, तितकं मी बोलेन, असं आपण वागलं पाहिजे. हिंदीमध्ये कामाला आदर आहे”, असे म्हणत नेहाने हिंदी चित्रपटात काम करण्याचा अनुभव सांगितला. तसेच, अजय देवगण आणि तब्बू यांच्याकडून कशी वागणूक मिळाली होती, हेही सांगितले.
