मराठी मालिका, सिनेमांसह हिंदी कलाविश्वात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री म्हणजेच प्राजक्ता कुलकर्णी. गोविंदा, शिल्पा शेट्टी, जॅकी श्रॉफ अशा बऱ्याच बॉलीवूड सेलिब्रिटींबरोबर त्यांनी काम केलेलं आहे. प्राजक्ता कुलकर्णी १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या गोविंदाच्या ‘आग’ सिनेमात झळकल्या होत्या. यामध्ये दमदार कलाकारांची मांदियाळी होती. शिल्पा शेट्टी आणि प्राजक्ता यांच्यात याच सेटवर खूप छान मैत्री झाली होती. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचा किस्सा अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितला आहे.
प्राजक्ता कुलकर्णी ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या, “मी जेव्हा ‘आग’ सिनेमात काम केलं होतं…तेव्हा सुद्धा शिल्पा शेट्टी बॉलीवूडमध्ये खूप प्रचलित होती. मला त्या सिनेमात शिल्पाला थोबाडीत मारायचं होतं…आणि तिला तो सीन परफेक्ट तिथेच मिस करता येत नव्हता. त्यामुळे आम्हा दोघींचे अनेक रिटेक झाले. शेवटी तिने मला समोरून सांगितलं की, तुम्ही मला खरंच एक कानाखाली मारा…त्या सीनसाठी तिने मला स्वत:हून परवानगी दिली होती. तिने स्वत:हून पुढाकार घेतला म्हणून, तो सीन चांगला होऊ शकला.”
“तुमच्याबरोबर जर असा सहकलाकार असेल तर काम करणं फार सोपं जातं. मी म्हणूनच म्हणते की, मराठीपेक्षा मला हिंदीत जास्त चांगले सहकलाकार भेटले…” असं स्पष्ट मत प्राजक्ता कुलकर्णींनी मांडलं आहे.
प्राजक्ता कुलकर्णी शिल्पाबद्दल ‘अभिजात मराठी फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या होत्या, “आग’ सिनेमाच्या सेटवर मी आणि शिल्पा शेट्टी आम्ही दोघी फावल्या वेळात कादर खान यांच्याकडून उर्दू शिकायचो. शिल्पाचा स्वभाव सुद्धा खूपच गोड आहे. तिला मराठी समजतं आणि बोलायला सुद्धा आवडतं. एकदम खरं सांगायचं झालं तर, इंडस्ट्रीत काम करताना मला मराठी अभिनेत्रींचा वाईट अनुभव आलाय पण, याउलट मला हिंदी अभिनेत्रींचा खरंच खूप चांगला अनुभव आलाय. मध्यंतरी एका शूटिंगदरम्यान ती ( शिल्पा ) व्हॅनिटीमध्ये होती आणि मी मेकअप रूममध्ये होते. मला जेव्हा समजलं की शिल्पाचं शूटिंग आहे…तेव्हा मी तिला व्हॅनिटीमध्ये भेटायला गेले होते. त्यावेळी आम्ही दोघी बऱ्याच वर्षांनी भेटलो. तिने मला मिठी वगैरे मारली…इतकी छान आमची भेट झाली. मला विश्वास आहे की, आजही ती भेटली तरी ती तेवढीच छान मला ओळख दाखवेल. तिच्यात जराही अॅटिट्यूड नाहीये.”
प्राजक्ता कुलकर्णी यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, ‘ठरलं तर मग’ मालिकेत त्या कल्पना ही भूमिका साकारत आहेत. ही मालिका गेली साडेतीन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. यामध्ये प्राजक्ता यांनी साकारलेली सायलीची प्रेमळ सासू प्रत्येकालाच भावते.
