अनेक मराठी कलाकार हिंदी सिनेमांमध्ये उत्तमोत्तम काम करत आहेत. मराठी नाटक, मालिका, चित्रपटांबरोबरच कलाकार हिंदी सिनेसृष्टीतही त्यांची वेगळी ओळख निर्माण करताना दिसतात. यावेळी त्यांना बॉलीवूड कलाकारांबरोबर काम करताना काय अनुभव आले, काय शिकायला मिळालं, हिंदी कलाकार इतरांना कशी वागणूक देतात याबद्दल अनेक कलाकार वेळोवेळी बोलताना दिसतात.
अभिनेत्री रीना मधुकरने बॉलीवूड अभिनेता राजकुमार रावबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला. नुकतीच तिने राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने ‘तलाश’ चित्रपटात राजकुमार रावबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला.
अभिनेत्री म्हणाली, “आम्ही दोघांनी ‘तलाश’मध्ये जेव्हा एकत्र काम केलं, तेव्हा तो नवीन होता. तो आणि मी दोघं बसून गप्पा मारायचो. आम्ही सगळे जेव्हा आमिर खान सरांबरोबर बसायचो, तेव्हा तो त्यांना विचारायचा की तुम्ही अमुक एका सीनचे कसे शूटिंग केले होते; तर त्यावेळी आमची अभिनय क्षेत्रातील सुरुवात होती.”
“त्याने जेव्हा मला पाहिलं…”
रीना पुढे म्हणाली, “‘तलाश’नंतर आम्ही ‘बहन होगी तेरी’ या चित्रपटात एकत्र काम केलं. त्या सेटवर त्याने जेव्हा मला पाहिलं त्यावेळी त्याला आनंद झाला होता. पुन्हा आम्ही एकमेकांशी जोडले गेलो. तो खूप चांगला व्यक्ती आहे. त्याच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे. तो कमालीचा कलाकार आहे. तो एखादा सीन करताना ज्या छोट्या छोट्या गोष्टी करतो, ते बघण्यासारखं आहे. रात्री-अपरात्री जेव्हा त्याचा पॅकअप व्हायचा आणि समजा जर माझं शूटिंग सुरू असेल तर तो क्यू देऊन जात असे”, असे म्हणत अभिनेत्रीने राजकुमार राव हा उत्तम माणूस व कलाकार असल्याचे सांगितले.
‘तलाश’ या सिनेमाबद्दल बोलायचे तर हा सिनेमा २०१२ ला प्रदर्शित झाला होता. यामध्ये आमिर खान, करिना कपूर खान, राणी मुखर्जी, नवाजुद्दीन सिद्दीकी, राजकुमार राव असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. याबरोबरच, ‘बहन होगी तेरी’ हा सिनेमा २०१७ मध्ये प्रदर्शित झाला होता.
राजकुमार राव आज बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने ‘क्वीन’, ‘काय पो चे’, ‘जजमेंटल है क्या’, ‘स्त्री’, ‘स्त्री २’, ‘हम दो हमारे दो’ अशा अनेक चित्रपटांत काम केले आहे.
दरम्यान, रीना मधुकरला ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेतून मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. आता आगामी काळात ती कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
