Actress reveals why she is still single: कलाकार जितके त्यांच्या अभिनयामुळे चर्चेत येतात तितकेच ते त्यांच्या खासगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत असतात. ते कसे राहतात, त्यांचा मित्र परिवार कोण आहे, त्यांची आवडती ठिकाणे कोणती, त्यांच्या कुटुंबात कोण-कोण आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. काही वेळा रिलेशनशिप, लग्न, घटस्फोट अशा कारणांमुळेही कलाकार चर्चेत असतात. याबरोबरच अनेकजण अविवाहितही राहतात, अशा अनेक कारणांमुळे कलाकार कायमच चर्चांचा भाग असतात.

‘वेलकम’ या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसलेली मराठमोळी अभिनेत्री सुप्रिया कर्णिक गेल्या अनेक वर्षांपासून सिनेसृष्टीत काम करत आहे. तिने अनेक सिनेमांत काम केले आहे. अभिनेत्रीने अनेक टीव्ही शोमध्येदेखील काम केले आहे. अभिनेत्री तिच्या कामासाठी जितकी ओळखली जाते, तितकीच ती तिच्या खासगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत असते.

सुप्रिया कर्णिक ५१ वर्षांची आहे. मात्र, तिने अद्याप लग्न केलेले नाही. आता एका मुलाखतीत अभिनेत्रीने लग्न न करण्याबद्दल वक्तव्य केले आहे. अविवाहित राहण्याचा निर्णय तिने का घेतला, याबद्दल अभिनेत्रीने खुलासा केला आहे.

सुप्रिया कर्णिकने नुकतीच सिद्धार्थ कननच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या पॉडकास्टमध्ये ती म्हणाली की, आपण जसे ठरवतो तशाच पद्धतीने गोष्टी होतील याची शाश्वती नाही. तसेच, आपण ठरवल्याप्रमाणेच गोष्टी व्हाव्यात हेही गरजेचे नाही.

“लग्न करावेसे वाटते, पण ते…”

लग्न न कऱण्याचे कारण सांगत ती म्हणाली, “त्याचे काही असे ठराविक कारण नाही. मी कधी योग्य किंवा अयोग्य व्यक्तीच्या शोधात असत नाही, कारण योग्य किंवा अयोग्य व्यक्तीची काही व्याख्या नाही. एकतर तुमचे लग्न होत नाही किंवा तुम्हाला लग्न करायचे नसते. कधी कधी तुम्हाला लग्न करावेसे वाटते, पण ते होऊ शकत नाही; ही काही फार मोठी गोष्ट नाही.”

सुप्रिया पुढे म्हणाली, “मी जेव्हा २५-२६ वर्षांची होते तेव्हा मला लग्न करायचे होते, मात्र आता मला तसे वाटत नाही. मला कोणी बॉयफ्रेंड नाही किंवा मला कोणी भेटले नाही म्हणून मी उदास आहे असेही नाही, जर कोणी माझ्या आयुष्यात नसेल तरीही ते ठीक आहे.”

सुप्रियाचे अनेकदा मन दुखावले गेले आहे, अशा अनेकदा चर्चा झाल्या. यावर अभिनेत्री म्हणाली, “रोमँटिक नात्यातच मन दुखावले जाते असे नाही. आजही अनेकदा माझे मन दुखावते. पण, माझ्या जोडीदारामुळेच मला वाईट वाटते किंवा दु:ख होते असे नाही. बहीण, भाऊ, मित्र यांच्यामुळेदेखील मला वाईट वाटू शकते. माझ्या मनात सर्वांविषयी प्रेम आहे, पण त्यांनी जे माझ्याबरोबर केले ते मी विसरू शकत नाही.”

पुढे तिला विचारले की, प्रेमात कधी धोका मिळाला आहे का? यावर ती म्हणाली, “असे झाले असते तर त्या व्यक्तीला मी जमिनीत पुरले असते. मला कोणाची तरी साथ हवी आहे, म्हणून मी रिलेशनशिपमध्ये जात नाही. कुटुंबीय, मित्र हेदेखील तुम्हाला साथ देऊ शकतात”, असे म्हणत अभिनेत्रीने भावना व्यक्त केल्या.

अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी अभिनेत्रीने मॉडेल, फ्लाइट अटेडंट म्हणूनही काम केले आहे. १९९२ मध्ये तिने अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.