Bollywood Actor Amitabh Bachchan : आपल्या आवडत्या कलाकारांबरोबर काम करण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते. दिग्दर्शक म्हणूनही अनुभवी आणि प्रतिभासंपन्न कलाकारांबरोबर काम करण्याची इच्छा अनेकांच्या मनात असते. त्यात जर अमिताभ बच्चन यांच्याबरोबर सिनेमा करण्याची संधी मिळाली, तर प्रत्येकालाच त्याचं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटेल यात शंका नाही. पण, एका मराठी दिग्दर्शकाचं त्यांच्याबरोबर काम करण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं.
अमिताभ बच्चन हे हिंदी सिनेविश्वातलं एक लोकप्रिय नाव आहे. गेली दोन दशकं त्यांनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. आजवर अनेक सिनेमांमधील त्यांच्या भूमिका संस्मरणीय आहेत. अशा या अनुभवी कलाकाराबरोबर काम करता यावं अशी लोकप्रिय मराठी दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांची इच्छा होती. पण काही कारणास्तव चंद्रकांत कुलकर्णी यांची अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करण्याची ती इच्छा पूर्ण झाली नाही.
“दुर्दैवानं तेव्हा असं झालं की, लेखन प्रक्रिया खूप लांबली आणि…”
अमोल परचुरे यांच्या कॅचअप या मुलाखतीच्या कार्यक्रमात चंद्रकांत कुलकर्णी यांनी ही आठवण सांगितली. त्याबद्दल ते म्हणाले, “तेव्हा वाटत होतं की, अमिताभ बच्चन यांच्याबरोबर सिनेमा करावा. एक विषय होता, ‘साकी बार अँड रेस्टॉरंट’ पुस्तकावर आधारित एक गोष्ट होती. त्यावर हिंदी सिनेमा करावा असं ठरलं. त्यासाठी आम्ही विजय तेंडुलकरांना भेटायला गेलो. त्यांच्याबरोबर अनेक ठिकाणी फिरलो. दुर्दैवानं तेव्हा असं झालं की, लेखन प्रक्रिया खूप लांबली. तोपर्यंत ‘चाँदनी बार’ सिनेमा आला होता. त्या सिनेमाची पार्श्वभूमी तशीच काहीशी होती. त्यामुळे या सिनेमातला माझा इंटरेस्ट कमी झाला होता.”
“अमिताभ बच्चन यांची बिचारी भूमिका कोणी सहनच नाही करणार”
त्यानंतर ते म्हणाले, “तेव्हा बच्चन यांना भेटायचं ठरवलं होतं. कमल हासन यांना तर भेटलोदेखील होतो. सिस्टीमला प्रश्न विचारणारा, असा त्या सिनेमाचा विषय होता; पण त्यातील भूमिकेसाठी बच्चन फिट बसणार नव्हते. कारण, ते एक अँग्री यंग मॅन म्हणून आपल्याला माहिती होते. त्यांची बिचारी भूमिका कोणी सहनच नाही करणार. अर्थात नंतर त्यांनी तशा भूमिका केल्या; पण तो सिनेमा झाला असता, तर वेगळी गंमत झाली असती.”
दरम्यान, चंद्रकांत कुलकर्णी यांच्याबद्दल सांगायचं झाल्यास मराठी कलाविश्वातील ते एक लोकप्रिय दिग्दर्शक आहेत. आजवर अनेक मराठी नाटक आणि सिनेमांमधून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्यांचा १९९९ मध्ये आलेला ‘बिंदास्त’ हा चित्रपट खूप गाजला होता. त्यानंतर त्यांनी ‘कायद्याचा बोला’, ‘तुकाराम’, ‘मीराबाई नॉट आउट’, ‘आजचा दिवस माझा’ यासारख्या सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.
