Shubha Khote suffered a horrific accident: अभिनय क्षेत्राची निवड करताना अनेकजण प्रमुख भूमिका साकारण्याची, हिरो-हिरोईन बनण्याचे स्वप्न बघतात. मात्र, ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांची महत्त्वाकांक्षा वेगळी होती. त्यांना नायिका बनायचे नव्हते, तर लोकांना हसवायचे होते. आज त्या ८८ वर्षांच्या आहेत. त्या भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय विनोदी अभिनेत्रींपैकी एक मानल्या जातात.
त्यांचे वडील नंदू खोटे यांनी अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते म्हणून काम केले आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत शुभा यांनीदेखील अभिनय क्षेत्रात काम केले. त्यांनी वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी रंगमंचावर पदार्पण केले.
शुभा खोटे यांना कशी मिळाली पहिली संधी?
रेड एफएम पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत शुभा खोटे म्हणाल्या, “मला कधीच अभिनय क्षेत्रात यायचे नव्हते. आमचे कुटुंब चित्रपटसृष्टीशी संबंधित होते, पण माझा गायनाकडे जास्त कल होता.”
प्रसिद्ध दिग्दर्शक अमिया चक्रवर्ती यांच्या नजरेस शुभा यांचा एक फोटो पडला आणि त्यांनी त्यांना चित्रपटात भूमिका दिली. योगायोगाने मिळालेली ही संधी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात ठरली. पण, त्यांची ही वाटचाल सुरू होण्याआधीच त्यांचा १९५५ मध्ये मोठा अपघात झाला.
त्यांच्या ‘सीमा’ या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान सायकल चालवण्याच्या एका सीनमध्ये त्यांचा भीषण अपघात झाला. त्या काळी मुंबईतील लिंकिंग रोडचे बांधकाम सुरू होते. त्या दगड आणि खडीवर पडल्या आणि त्यांच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली.
या अपघाताबद्दल त्या म्हणाल्या, “एक काळ असा होता की मला वाटले मी पुन्हा कधीच चित्रपटात काम करू शकणार नाही, माझ्या चेहऱ्यावर मोठी जखम झाली होती, चेहरा विद्रूप झाला होता, सर्व काही संपल्यासारखे वाटत होते.”
‘या’ नाटकांचे केले दिग्दर्शन
उपचार सुरू असताना कॅमेऱ्यासमोर उभे राहणे शक्य नव्हते. मात्र, त्यांनी खचून न जाता चेहऱ्यावर स्कार्फ बांधला आणि पुन्हा सेटवर परतल्या. अभिनयाऐवजी त्यांनी दिग्दर्शन आणि एडिटिंगचे धडे घेण्यास सुरुवात केली. त्यांनी गमावलेल्या गोष्टींचा विचार न करता नव्याने काय शिकता येईल यावर लक्ष केंद्रित केले.
पुढे या अनुभवाचा उपयोग करून त्यांनी ‘हेरा फेरी’, ‘हम दोनो’, ‘बॅचलर्स वाइफ’ आणि ‘लेट्स डू इट’ यांसारख्या गाजलेल्या विनोदी नाटकांचे यशस्वीपणे दिग्दर्शन केले.
अमिया चक्रवर्ती यांनी शुभा खोटेंना काय दिलेला सल्ला
ज्या काळात प्रत्येक अभिनेत्रीला ग्लॅमरस हिरोईन बनण्याची इच्छा होती, त्या काळात शुभा खोटे यांनी विनोदी भूमिका साकारण्याचा निर्णय घेतला. याबद्दल त्या म्हणाल्या, “अमिया चक्रवर्ती यांनी मला हिरोईन बनण्याचा प्रयत्न करू नकोस असे सांगितले. त्यांना वाटत होते की विनोदी भूमिका करणाऱ्या महिला खूप कमी आहेत आणि माझे विनोदाचे टायमिंग चांगले आहे; त्यांनी मला कॉमेडीकडे वळण्याचा सल्ला दिला.”
स्टारडमच्या मागे धावण्याऐवजी त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचे विनोदाचे अचूक टायमिंग, उत्तम अभिनय आणि मेहमूद यांच्याबरोबरची त्यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली. खोडकर आत्या, प्रेमळ आई किंवा विनोदी सहाय्यक पात्र अशा कोणत्याही भूमिकेत त्यांनी अनेकदा प्रमुख भूमिकेतील कलाकारांपेक्षा अधिक लक्ष वेधून घेतले.
अभिनय क्षेत्रात काम करण्यापूर्वी त्या राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू आणि सायकलपटू होत्या. १९६० मध्ये त्यांनी डी. एम. बालसावर यांच्याशी विवाह केला. २०२४ मध्ये त्यांच्या पतीचे निधन झाले.
शुभा खोटे यांचे वडील मराठी होते तर आई मंगळुरूची होती. तरीही त्यांना हिंदी सिनेसृष्टीत मोठ्या प्रमाणात यश मिळाले. मुलाखतीत त्या असेही म्हणालेल्या की, मला लता मंगशेकर यांची गाणी खूप आवडायची. मी रेडिओवर त्यांची गाणी ऐकत असे आणि त्यातूनच मी हिंदी शिकले.
शुभा खोटे यांनी सिनेमांबरोबरच टेलिव्हिजन व मराठी नाटकातही काम केले आहे, त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे.
