बॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जी सध्या तिच्या ‘मर्दानी ३’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. राणी मुखर्जीचे कुटुंब फिल्म इंडस्ट्रीतले होते. त्यामुळे तीही अभिनेत्री झाली. राणीने आजवर अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. तिच्या करिअरबद्दल व वैयक्तिक आयुष्याबद्दल बऱ्याच जणांना माहित आहे, आपण तिच्या शिक्षणाबद्दल जाणून घेऊयात.

राणी मुखर्जीचा जन्म २१ मार्च १९७८ रोजी मुंबईत झाला. तिचे शालेय शिक्षण जुहू येथील माणेकजी कूपर हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी एसएनडीटी महिला विद्यापीठातून गृहविज्ञान (Home Science) विषयात पदवी पूर्ण केली. राणी मुखर्जीने दहावीत असताना ओडिसी या शास्त्रीय नृत्यप्रकाराचे प्रशिक्षण घेतले.

सावळ्या रंगामुळे आणि वेगळ्या आवाजामुळे सुरुवातीला टीका सहन करावी लागली असली तरी, आज राणी बॉलीवूडमधील सर्वात प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे.

राणी मुखर्जीचे करिअर

राणी मुखर्जीच्या कुटुंबाचा चित्रपट क्षेत्राशी जवळचा संबंध होता. तिचे वडील राम मुखर्जी हे चित्रपट दिग्दर्शक होते. राणीने १९९६ मध्ये ‘बियेर फूल’ या बंगाली चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली. नंतर हिंदी चित्रपटसृष्टीत राणीने ‘राजा की आयेगी बरात’ (१९९७) या चित्रपटातून पदार्पण केलं. सुरुवातीला यश मिळाले नसले तरी, १९९८ मध्ये आलेल्या ‘गुलाम’ आणि ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटांनी राणी मुखर्जीला रातोरात सुपरस्टार बनवले.

राणी मुखर्जीचे गाजलेले चित्रपट

‘साथिया’, ‘हम तुम’, ‘वीर-झारा’, ‘चलते चलते’ आणि ‘कभी अलविदा ना कहना’ या रोमँटिक आणि ड्रामा चित्रपटात राणीने काम केलं. ‘ब्लॅक’ चित्रपटातील अंध-मूक मुलीची भूमिका तिच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरली. ‘मर्दानी’ मधील कणखर पोलीस अधिकारी, ‘हिचकी’ मधील टॉरेट सिंड्रोम असलेली शिक्षिका आणि ‘नो वन किल्ड जेसिका’ मधील निर्भीड पत्रकार या भूमिकांमध्ये राणीने आपल्या अभिनयाची छाप सोडली. २०२३ मधील ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ सिनेमातील तिच्या कामाचे खूप कौतुक झाले.

राणी मुखर्जी पुरस्कार आणि वैयक्तिक आयुष्य

राणी मुखर्जीने तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत ७ फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत. २०१४ मध्ये तिने प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता आदित्य चोप्रा यांच्याशी लग्न केलं. त्यांना आदिरा नावाची मुलगी आहे.