समीर जावळे
शिकार करायची असेल तर त्याला आधी खेळवलं जातं. मांजर असो किंवा मार्जार जातीतले सगळे प्राणी वाघ, सिंह, बिबट्या यांचीही शिकार करायची पद्धत अशीच. हे आठवण्याचं कारण मर्दानी 3 हा राणी मुखर्जीचा नवा सिनेमा. सिनेमा एका गंभीर प्रश्नावर भाष्य करतो. राणी मुखर्जी पुन्हा एकदा शिवानी शिवाजी रॉय बनून आपल्या भेटीला आली आहे. दमदार आणि उत्तम भूमिका तिने पुन्हा एकदा साकारली आहे. अनेकदा चित्रपटांचे सिक्वल फसतात असा एक बॉलिवूडचा अनुभव आहे. मात्र मर्दानीची सीरिज याला अपवाद ठरली आहे. मर्दानी, मर्दानी 2 आणि आता मर्दानी 3 या तिन्ही चित्रपटांचा आलेख उंचावतच जातो.
कथानक अगदी थोडक्यात..
मासिक पाळी न आलेल्या मुलींचं एका मागोमाग एक अपहरण होत असतं. अशातच एक अशी गोष्ट घडते ज्यामुळे या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी शिवानी शिवाजी रॉयवर येते. यानंतर ती तपासाला लागते आणि तिला कळतं की आत्तापर्यंत ९३ मुली गायब झाल्या आहेत. त्यांचा शोध घेताना उंदीर आणि मांजराचा खेळ रंगतो. शिवानी सगळा शोध कसा लावते? तिला काय काय अनुभव येतात? या सगळ्यावर सिनेमा भाष्य करतो.

अभिनयाच्या बाबतीत कोण सरस?
अभिनयाच्या बाबतीत कमाल केली आहे ती म्हणजे शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेतल्या राणी मुखर्जीने आणि विशेष उल्लेख करावा लागेल तो अम्मा साकारणाऱ्या मल्लिका प्रसादचं. ज्या ताकदीने तिने अम्मा साकारली आहे ते पाहणं ही खरंच सिनेमातली पर्वणी ठरते. मर्दानी, मर्दानी 2 या दोन्ही चित्रपटांमध्ये खलनायक होते. या चित्रपटाचा खलपात्र साकारणारी ही स्त्री आहे. शिवानी रॉयच्या भूमिकेत राणी मुखर्जीने तिच्या अभिनयाचे रंग भरले आहेत. तसंच मल्लिका प्रसादने अम्मा अतिशय ताकदीने साकारली आहे. मल्लिका प्रसादने कनूनु हेगगदिती, देवी अहिल्याबाई, दूसरा अशा चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मल्लिका प्रसादला अभिनयासाठी दोन राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत. आता मर्दानी 3 ची चित्रपटातली तिची खलनायिका मनाला भिडते. तिचं क्रौर्य भयंकर आहे, तिचा राग येतो. मला वाटतं हीच तिच्या अभिनयाची पावती आहे. अभिनयाच्या बाबतीत तोडीस तोड दोघीही ठरल्या आहेत. राणीचं कौतुक अशासाठी की ती खंडाला गर्ल म्हणून आली. पण धाकड गर्लची तिची इमेज तिने सेट केली आहे. त्यात ती उत्तम वावरली आहे.
कथा, पटकथा दोन्ही उत्तम
आयुष गुप्ताने संवाद लिहिले आहेत आणि पटकथा, तसंच मूळ कथाही त्याचीच आहे. तर अभिराज मिनावालाने चित्रपट दिग्दर्शित केला आहे. कॅमेरा टेकिंगही उत्तम आहे. काही फ्रेम्स उत्तम जमल्या आहेत. खासकरुन राणी मुखर्जी आणि मल्लिका प्रसाद यांचे क्लोज शॉट्स पाहणं ही व्हिज्युअल ट्रीट आहे. तसंच राणी मुखर्जी ओपनिंग सीनला खूप छान दिसली आहे.
मध्यंतरापूर्वीचा आणि नंतरचा भाग दोन्ही उत्तम
पहिल्या भागात चित्रपट अतिशय वेगवान आहे. तसंच मध्यंतरापर्यंच्या वेळी जो ट्विस्ट दिला आहे तो देखील आपल्याला चकित करतो. त्यानंतर पुढे काय घडतं? चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचा प्रवासही आपण शिवानीसह करतो. एक ट्विस्ट पुढेही दिला आहे. तो पण रंजक ठरला आहे. चित्रपट जे सत्य समोर आणतो आणि समाजाला आरसा दाखवतो. शिवानीच्या घरात जेव्हा अम्मा जाते तो प्रसंगही उत्तम जमला आहे. तसंच चित्रपट मनोरंजन करतो आणि डोळ्यांत अंजन घालण्याचंही काम करतो. चित्रपटातले शेवटचे शिवानीच्या तोंडी असलेले संवाद लक्षात राहतात. मर्दानी 3 चित्रपट चांगला आहे पाहण्यास हरकत नाही यात शंकाच नाही.

