अभिनेत्री नीना गुप्ता ४० वर्षांहून अधिक काळापासून फिल्म इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. अभिनय करिअरपेक्षा क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्सबरोबरचं त्यांचं नातं आणि मुलगी मसाबा गुप्ताचा जन्म हे त्यांच्या आयुष्यातील प्रसंग चर्चेत राहिले. अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत, मसाबाने तिच्या आईच्या आयुष्यातील मीडिया कव्हरेजचा तिच्या बालपणावर कसा परिणाम झाला याबद्दल सांगितलं.
मोजो स्टोरी या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत मसाबा गुप्ताने रुग्णालयातून तिचा जन्म दाखला कसा चोरीला गेला होता ते सांगितलं. तसेच ती अनौरस आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याचा वापर कसा केला गेला याबद्दल बोलली. ती म्हणाली, “मी ज्या रुग्णालयात जन्मले, तिथून माझा जन्म दाखला चोरीला गेला आणि नंतर तो प्रेसमध्ये लीक झाला. तो एका वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर होता, कारण कोणीतरी मी अनौरस मूल आहे हे सिद्ध करू इच्छित होतं.”
आईसाठी खूप वाईट वाटत होतं – मसाबा गुप्ता
हे सगळं खूपच भयंकर व क्रूर होतं, याचा आई नीना गुप्तावर नकारात्मक परिणाम झाला, असं स्पष्ट मत मसाबाने मांडलं. “मला वाटतं की मी ९-१० वर्षांची होते, तेव्हा मला हे सगळं समजलं. मला फार गोष्टी समजायच्या नाहीत. पण ते का केलं होतं, हे मी समजलं नाही. ते क्रूर, विचित्र आणि खासकरून माझ्या आईसाठी खूप वाईट होतं. मी इथे बसून त्याबद्दल दुःखी होऊ शकते, पण तिने ही परिस्थिती कशी सांभाळली मला खरंच माहित नाही. ‘शोबिझ असंच असतं’ हे मी ऐकलं होतं, पण हे जे घडलं ते प्रचंड वाईट होतं,” असं मसाबा म्हणाली.
मसाबाला जन्म दिल्यानंतर नीना गुप्ता यांनी सिंगल मदर म्हणून तिला वाढवण्याचा निर्णय घेतला. पण नीना स्वतःला ‘सिंगल मदर’ मानत नाही, कारण मुलीच्या जन्मानंतर त्यांच्या कुटुंबाने खूप पाठिंबा दिला. पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत नीना म्हणालेल्या, “मी कदाचित दोन वर्षे सिंगल मदर होते. नंतर माझे वडील आले. त्यांनी माझ्यासाठी सगळं काही सोडून दिलं… माझे वडील आले आणि ते माझ्याबरोबर राहिले. त्यांनी माझ्या घराची, माझी आणि माझ्या मुलीची काळजी घेतली. तेच माझ्या आयुष्यातील महत्त्वाचे पुरुष होते.”
विवियन रिचर्ड्सबरोबरच्या नात्याबद्दल नीना गुप्ता काय म्हणाल्या होत्या?
नीना गुप्ता यांनी त्यांच्या ‘सच कहू तो’ या आत्मचरित्रात विवियन रिचर्ड्सबरोबरच्या नात्याबद्दल लिहिलं होतं. “विवियन आणि माझे प्रेमसंबंध होते आणि मी गरोदर राहिले. जेव्हा मला हे कळले तेव्हा तो घरी परत निघून गेला होता. त्यामुळे काही लोकांनी मला गर्भपात करण्याचा सल्ला दिला. तर काहींनी त्या काळी एकल माता म्हणून बाळ सांभाळणं किती अवघड आहे हे सांगून सावध केलं. मी सर्वांचं म्हणणं ऐकलं. कारण सर्वजण खूप चिंतेत होते. पण एकदा मी घरी परतले आणि स्वतःला विचारलं, तुला काय वाटतं? गरोदर असणं तुला कसं वाटतंय? आणि माझं उत्तर होतं, मी आनंदी आहे,” असं नीना गुप्ता यांनी लिहिलंय. यानंतर नीना यांनी विवियन रिचर्ड्स यांच्याशी बोलून बाळाला जन्म द्यायचा, असा निर्णय घेतला होता.
विवियन रिचर्ड्स तेव्हा विवाहित होते, “मुलीच्या जन्मानंतरही आम्ही संपर्कात होतो, नात्यात होतो. या प्रवासात चांगले, वाईट क्षण होते. कारण दोघे लाँग डिस्टन्समध्ये होतो. आमचं नातं खूप वेगळं होतं,” असं नीना गुप्ता यांनी म्हटलंय.
