Child Actor who bought Home At 6: चित्रपट, मालिकांमधील अनेक बालकलाकार हे कायमच लक्ष वेधून घेताना दिसतात. मात्र, हे बालकलाकार पुढे चित्रपटसृष्टीतच काम करतीलच असे नाही. ते करिअरचे विविध मार्ग निवडताना दिसतात. मात्र, काही बालकलाकार भविष्यातदेखील अभिनयाकडे वळताना दिसतात.
आज आपण अशाच एका अभिनेत्याबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने बालकलाकार म्हणून मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवली. मात्र, मोठे झाल्यानंतर त्यांनी जेव्हा करिअर म्हणून अभिनय निवडला. तेव्हा त्यांना ते यश पाहता आले नाही.
मास्टर राजू असे या अभिनेत्याचे नाव आहे. एक काळ असा होता की अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा मास्टर राजू यांच्याकडे जास्त काम असे.लहानपणी मास्टर राजू यांचे नाव फहीम अजानी असे होते. ते मुंबईतील डोंगरी येथे राहत असत. त्यांच्या कुटुंबातील कोणीही चित्रपटसृष्टीत काम करत नसे. त्यांनी एकदा गुलजार यांच्या परिचय या चित्रपटासाठी ऑडिशन दिले होते. पण, त्यातून त्यांची निवड झाली नाही. त्यामुळे ते खूप रडले होते. त्यावेळी ते फक्त पाच वर्षांचे होते. मात्र, त्यानंतर त्यांना चित्रपटात काम मिळाले आणि ते लोकप्रिय ठरले. त्यानंतर त्यांना चित्रपटसृष्टीत राजू श्रेष्ठ या नावाने ओळखले जाऊ लागले.
मास्टर राजू यांनी अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, संजीव कुमार, धर्मेंद्र, अनिल कपूर, जीतेंद्र अशा अनेक लोकप्रिय कलाकारांबरोबर काम केले आहे.
संजीव कुमार यांच्यामुळे बदलले नाव
रेडिफला दिलेल्या एका मुलाखतीत मास्टर राजू यांनी त्यांच्या नावाचा किस्सा सांगितला होता. ते म्हणाले होते की संजीव कुमार यांच्याबरोबर मी परिचय या चित्रपटात पहिल्यांदा काम केले. त्यावेळी शूटिंगच्या दरम्यान संजीव कुमार मला मास्टर राजू असे म्हणत असत. तेथील काही लोक मला लड्डू या नावानेदेखील हाक मारत असत. पण, संजीव कुमार म्हणाले होते की मास्टर राजू हे जास्त चांगले नाव आहे. त्यामुळे मी मास्टर राजू या नावाने लोकप्रिय झालो.
गुलजार नंतर, मास्टर राजू यांनी एस. चोप्रा, हृषिकेश मुखर्जी आणि बासू चॅटर्जी सारख्या प्रसिद्ध दिग्दर्शकांबरोबरही काम केले. ‘अमर प्रेम’, ‘दाग – द पोएम ऑफ लव्ह’, ‘दीवार’, ‘इंकार’, ‘खुद्दार’ आणि ‘वो सात दिन’ हे त्यांचे चित्रपट सुपरहिट ठरले. त्यांनी एकदा एका मुलाखतीत सांगितले होते की त्यांना इतक्या चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या होत्या की ते एकाच वेळी तीन चित्रपटांचे शूटिंग करत असत. ते म्हणाले होते, “माझे शूटिंगचे वेळापत्रक खूप व्यग्र होते. मी एकाच वेळी जवळजवळ दोन चित्रपटांचे शूटिंग करायचो आणि तीन वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करायचो. मला कधीही असे वाटले नाही की माझे शोषण होत आहे.”
१९७६ च्या चितचोर चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट बाल कलाकार म्हणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. ते खुलासा करत म्हणाले होते की त्यांच्या पहिल्या चित्रपटानंतर त्यांना प्रत्येक चित्रपटासाठी १०,००० रुपये फी मिळाली. पण चार वर्षांनी त्यांचे काम उत्कृष्ट झाले आणि ती रक्कम १००,००० रुपयांपर्यंत वाढली. “१९७७ मध्ये जेव्हा मी खूप प्रसिद्ध झालो तेव्हा मला १००,००० रुपयांपेक्षा जास्त फी मिळू लागली.” एक काळ असा होता की त्यांच्यापेक्षा अमिताभ बच्चन यांना कमी काम मिळत असे.
मी वांद्रे येथे ११ लाख रुपयांना घर खरेदी केले. माझ्या वडिलांनी योग्य ठिकाणी गुंतवणूक केली. ज्याचे फायदे आजही मिळत आहेत. मला कधी काम मिळाले नाही, असे झाले नाही.
९वीमध्ये असताना त्यांनी अभिनयातून ब्रेक घेतला. जेव्हा त्यांनी पुनरागमन केले, त्यावेळी त्यांनी ग्रे शेड असलेल्या भूमिका साकारल्या. मास्टर राजू यांनी कधीही प्रमुख भूमिका साकरल्या नाहीत. ते कायम सहाय्यक भूमिकांमध्येच दिसले. १९९० ला प्रदर्शित झालेल्या बागी चित्रपटात मित्रांची भूमिका साकारली होती.याबरोबरच, अनाडी, बलवान, साजन चले ससुराल, दिलजले अशा चित्रपटांमध्ये दिसले.त्यांनी टीव्ही मालिका जय हनुमानमध्ये नारद ही भूमिका साकारली होती.

