मास्टर राजू (राजू श्रेष्ठा) आणि सुपरस्टार सलमान खान हे दोघे बालपणीचे मित्र आहेत. विशेष म्हणजे त्यांची मैत्री अजुनही कायम आहे. मुंबईतील वांद्रे भागात राजू व सलमान यांनी एकत्र बालपण घालवलं. सलमान मोकळ्या मनाचा आहे, असं राजूने म्हटलं. तसेच सलमान त्याच्या मनाचं ऐकतो, असं म्हणत त्याने सलमानच्या आक्रमक स्वभावाचे अनेक किस्सेही सांगितले.
सिद्धार्थ कन्ननशी बोलताना राजूने कबूल केलं की तो सलमान खानला १९७२ च्या ‘बागी’ चित्रपटाच्या आधीपासून ओळखत होता. तो म्हणाला, “मी सलमान खानला ‘बागी’च्या खूप आधीपासून ओळखतो. आम्ही दोघे वांद्रे या एकाच परिसरातून आलो आहोत. आम्ही एकत्र सायकलिंग करायचो. तो ‘पत्थर के फूल’ चित्रपट करत होता, तेव्हा शूटिंगपूर्वी तो बँडस्टँडवर स्केटिंगचा सराव करायचा. मी सायकलिंग करायचो आणि तो कॅरियरला धरून स्केटिंग करायचा.”
सलमान खान व मास्टर राजू बालपणीचे मित्र
राजूने बालकलाकार म्हणून चित्रपटांमध्ये काम केलं. तर सलमानने त्यानंतर बऱ्याच वर्षांनी पदार्पण केलं. “मी आणि सलमान तेव्हापासून मित्र आहोत जेव्हा लोक म्हणायचे की पाहा मास्टर राजू कोणत्यातरी मुलाबरोबर उभा आहे. सलमान काहीच नव्हता, तेव्हापासून माझी त्याची मैत्री आहे. तो खूप चांगला आणि प्रेमळ आहे. त्याच्याबद्दल खूप गैरसमज झाले आहेत. त्याने मला बागीमध्ये भूमिका दिली. आम्ही उटीमध्ये चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेलो आणि त्यानंतर अनेक वर्षांनी आम्ही एकत्र ‘चल मेरे भाई’ चित्रपट केला,” असं राजू म्हणाला.
सलमान खान स्टार झाल्यावर काय बदललं?
राजू म्हणाला, “जेव्हा सलमान खान सलमान खान झाला आणि त्यानंतर जेव्हा मी त्याला भेटायचो… पूर्वी मी त्याला ‘सलमान तू’ म्हणायचो आणि नंतर मी त्याला ‘भाई आप’ म्हणू लागलो. मी त्याला लोकांसमोर ‘भाई आप’ म्हणायचो आणि सलमान मला विचारायचा, ‘तू मला अशी हाक का मारतोस?’ मी त्याला म्हणायचो ‘तू मोठा स्टार झाला आहेस आणि जर मी तुला ‘सलमान तू’ म्हटलं तर तू शेराला म्हणशील की पुढच्या वेळी याला आत नको येऊ देऊ नको आणि खोलीतून हाकलून लाव कारण तुला वाटेल की मी तुझा अपमान करतोय’.”
आम्ही एकत्र नग्न आंघोळ करायचो – मास्टर राजू
राजूने त्याच्या व सलमान खानच्या बदललेल्या जीवनशैलीबद्दल सांगितलं. “आम्ही कोणत्याही गोष्टीबद्दल एकमेकांशी बोलायचो. सलमान आणि मी एकत्र नग्न आंघोळ केली आहे. पण आता तसं नाही, कारण आता तो एक मोठा स्टार आहे. जर मी आता त्याच्या सेटवर आणि त्याच्या घरात जास्त वेळ राहिलो तर लोक मला त्याचा चमचा म्हणतील,” असं मास्टर राजूने नमूद केलं.
राजूने सलमानला ‘हॅपी गो लकी’ म्हटलं. “तो मस्तीखोर होता, तो कधीही काहीही बोलण्यापूर्वी विचार करायचा नाही. मैत्री करण्यापूर्वीही विचार करायचा नाही. तो स्वच्छ मनाचा आहे. तो तुलना करणारा किंवा लोकांची मतं तयार करणारा नाही. तो खूप साधा माणूस आहे, त्यामुळे तो अनेकदा वादात अडकला,” असं राजूला वाटतं.
सलमान खान गर्लफ्रेंडच्या इमारतीखाली ओरडायचा
सलमानने त्याच्या आयुष्यात महिलांशी गैरवर्तन केलंय, हे राजूने मान्य केलं, पण तरीही मित्राची बाजू घेतली. “सलमानचं कधीही त्याच्या भावनांवर नियंत्रण नव्हतं. कधीकधी तो एखाद्याच्या इमारतीखाली उभा राहून शिवीगाळ करायचा. तो त्याच्या एक्स गर्लफ्रेंडच्या इमारतीखाली उभा राहून ओरडायचा, तो एखाद्याला मारहाण करायचा, कारण तो त्याच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नव्हता. तो खूप गोड माणूस आहे,” असं मास्टर राजू म्हणाला. पण तो कोणत्या घटनेचा उल्लेख करत होता हे राजूने स्पष्ट केलं नाही. मात्र २००२ मध्ये सलमानने ऐश्वर्याशी ब्रेकअप झाल्यावर तिच्या घराबाहेर असाच काहीसा प्रकार केला होता.

