Bollywood’s Tragedy Queen Life Story : हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी एक अभिनेत्री होत्या. पडद्यावरच्या दुःखी आणि हृदयस्पर्शी भूमिकांमुळे त्यांना ‘ट्रॅजेडी क्वीन’ म्हणून संबोधलं जायचं. त्यांचं नाव होतं मीना कुमारी. मीना कुमारी या हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय आणि दिग्गज अभिनेत्रींपैकी एक होत्या.

१९५० आणि ६० च्या दशकात त्या प्रचंड लोकप्रिय होत्या. ‘बैजू बावरा’, ‘साहिब बीबी और गुलाम’, ‘काजल’ आणि ‘पाकीजा’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकांनी अनेकांचं लक्ष वेधलं. त्यांच्या अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आणि अनेकांकडून त्यांचं कौतुक झालं. मात्र, पदरी यश असूनही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात एकटेपणा आणि अनेक अडचणी होत्या. त्या वेदना त्यांच्या अभिनयातही दिसून येत असत.

बॉलीवूडच्या ट्रेजडी क्वीनचं ३८व्या वर्षी झालेलं निधन

१९७२ मध्ये वयाच्या अवघ्या ३८व्या वर्षी त्यांचं निधन झालं. पण आजही त्यांचा वारसा हिंदी चित्रपटसृष्टीत कायम आहे. ‘न्यूज १८’च्या वृत्तानुसार मीना कुमारी यांच खरं नाव महजबीन बानो होतं. त्यांचा जन्म १९३३ मध्ये झाला. त्यांच्या वडिलांकडे प्रसूती करणाऱ्या डॉक्टरांना देण्यासाठीही पैसे नव्हते, त्यामुळे त्यांनी मीना यांना अनाथाश्रमाबाहेर सोडलं आणि नंतर परत येऊन त्यांना घरी नेलं. अवघ्या नऊव्या वर्षी त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी चित्रपटांत काम करू लागल्या. वीसाव्या वर्षातच त्या बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या स्टार बनल्या. त्यांनी चार फिल्मफेअर पुरस्कार जिंकले, जवळपास ९० चित्रपट केले आणि प्रत्येक मोठ्या अभिनेत्याला त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा असायची.

चित्रपटसृष्टीत मीना यांना ‘ट्रॅजेडी क्वीन’ म्हटलं जात होतं, पण पुढे हे नाव त्यांच्या आयुष्याशी इतकं जुळणारं ठरेल याची कुणालाही कल्पना नव्हती. अवघ्या १८व्या वर्षी मीना कमाल अमरोही यांच्या प्रेमात पडल्या. ते मीना यांच्यापेक्षा दुप्पट वयाचे होते आणि आधीच विवाहित असून त्यांना तीन मुलं होती. १९५२ मध्ये दोघांनी गुपचूप निकाह केला आणि अनेक महिने हे लग्न लपवून ठेवल्याचं म्हटलं जातं.

पतीने घातलेली बंदी

लग्नाची बातमी समोर येताच नात्यात लवकरच तणाव निर्माण झाला. त्यांनी मीना यांना नवीन चित्रपट साइन करण्यास बंदी घातली, मेकअप रूममध्ये कुणालाही येऊ दिलं नाही आणि संध्याकाळी ६ वाजेपर्यंत घरी परतण्याची अट घातली. त्या बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्री होत्या, पण त्यांना अंधार पडल्यानंतर घराबाहेर पडण्याचीही मुभा नव्हती.

विभक्त झाल्यानंतर निद्रानाशाच्या( insomnia) त्रासासाठी डॉक्टरांनी त्यांना थोड्या प्रमाणात ब्रँडी घेण्याचा सल्ला दिला. सुरुवातीला त्याने आराम मिळाला, पण हळूहळू तिच गोष्ट त्यांचा आधार झाली. त्यानंतर त्यांना लिव्हर सिरोसिस झाल्याचं निदान झालं. त्यांचं शरीर साथ सोडत होतं. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं की, आणखी एक पेगही जीवघेणा ठरू शकतो. तरीही मीना यांनी मद्यपान सुरूच ठेवलं. त्यावेली त्या वांद्र्यात एकट्या राहू लागल्या, रात्री उर्दू कविता लिहायच्या आणि सकाळी वेळेवर शूटिंगलाही पोहोचायच्या.

‘पाकीजा’ चित्रपटाला बनायला अनेक वर्षे लागली. चित्रपटाचे दिग्दर्शक कमाल अमरोही यांच्याबरोबरचं त्यांचं लग्न मोडल्यानंतर हा प्रोजेक्ट थांबला होता. १९६९ मध्ये कमल अमरोही यांनी त्यांना पत्र लिहून पुन्हा येऊन चित्रपट पूर्ण करण्याची विनंती केली. पण, त्या खूप घाबरल्या होत्या. त्यांचं लिव्हर निकामी होत होतं, आजारामुळे चेहऱ्यात बदल झाले होते आणि पडद्यावर आपण पूर्वीसारखी दिसू का, याची त्यांना शंका होती.

सुनील दत्त आणि नर्गीस यांसारख्या मित्रांनी त्यांना परत जाण्यासाठी समजावलं. त्यांनी आजारी अवस्थेत, शरीर सुजलेलं असतानाही एक-एक सीन शूट करत चित्रपट पूर्ण केला. फेब्रुवारी १९७२ मध्ये प्रीमियरच्या वेळी त्या थिएटरमध्ये कमल अमरोही यांच्या शेजारी बसल्या होत्या, पडद्यावर स्वतःला पाहिल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झालेले. त्या म्हणाल्या होत्या की पडद्यावर त्या इतक्या सुंदर दिसतील यावरच विश्वास बसत नाही. कदाचित स्वतःला अशा रूपात पाहण्याची ही शेवटची वेळ आहे, याची त्यांना जाणीव झाली होती.

‘पाकीजा’ प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या तीन आठवड्यांत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मीना यांचं लिव्हर पूर्णपणे निकामी झालं होतं. ३१ मार्च १९७२ रोजी वयाच्या फक्त ३८व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांचं पार्थिव नर्सिंग होममध्ये ठेवण्यात आलं होतं, पण रुग्णालयाचे बिल भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे ते ताब्यात देता येत नव्हतं. शेवटी त्यांच्या डॉक्टरांनी स्वतःच्या खिशातून पैसे भरल्याचं म्हटलं जातं.

दरम्यान, ‘पाकीजा’मुळे मोठी कमाई करणारे कमल अमरोही कुठेच दिसले नाहीत. मीना यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर २१ वर्षांनी, १९९३ मध्ये कमल अमरोही यांचं निधन झालं. त्यांची शेवटची इच्छा होती की, त्यांना मीना यांच्या शेजारी दफन करण्यात यावं. अखेर तसंच करण्यात आलं.