ट्रॅजेडी क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मीना कुमारी यांनी त्यांचा बॉलीवूडमधील प्रवास अगदी लहान वयातच सुरू केला होता. त्यांनी बालकलाकार म्हणून काही चित्रपटांमध्ये काम केले. १९५९ ला प्रदर्शित झालेल्या बैजू बावरा, परिणीता, चांदणी चौक, चार दिल चार राहें या सिनेमांतून अभिनेत्रीला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली.
प्रसिद्धी मिळाल्यानंतरही मीना कुमारी यांनी नवीन कलाकारांबरोबर मोठ्या प्रमाणात काम केले. चिराग कहाँ रोशनी कहाँ या सिनेमात त्यांनी राजेंद्र कुमार यांच्याबरोबर काम केले. एक ही रास्ता सिनेमात सुनील दत्त, तसेच धर्मेंद्र यांच्याबरोबरही त्यांनी काम केले. नवीन कलाकारांना मदत करण्याबरोबरच मीना कुमारी त्यांच्या नातेवाइकांबरोबर, निर्माते, दिग्दर्शक यांच्याबरोबरही प्रेमळपणे वागत असत.
कमल अमरोही मीना कुमारींना मारत….
मीना कुमारी त्यांच्या काळातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्री होत्या. लग्नाआधी त्यांचे आर्थिक व्यवहार त्यांचे वडील बघत असत; पण कमल अमरोही यांच्याबरोबर लग्न झाल्यानंतर त्यांनी अभिनेत्रीचे आर्थिक व्यवहार पाहण्यास सुरुवात केली. पुढे त्यांच्यात मोठी भांडणे झाली. मीना कुमारींच्या मोठ्या बहिणीने सांगितल्याप्रमाणे कमल अमरोही मीना कुमारींना मारत असत, त्यांना जेवणही देत नसत. तरीही त्यांनी प्रकृती खालावली असताना पाकिजा या चित्रपटात विनामोबदला काम केले.
मीना कुमारी अनेकांना उदार मनाने मदत करीत असत. मात्र, त्यांच्यावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून असणाऱ्या नातेवाइकांनी त्यांना दिवाळखोर बनवले. काही रिपोर्टनुसार, आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्यांच्याकडे दवाखान्याची बिले भरण्यासाठी ३,५०० रुपयेही नव्हते. शेवटच्या वेळी त्या जेव्हा दवाखान्यात गेल्या, त्याआधी घरातून निघताना त्यांनी १० हजार रुपयांची तडजोड केली. त्यातील पाच हजार रुपये त्यांनी मोठी बहीण खुर्शीद यांना दिले आणि पाच हजार रुपये डॉक्टरला दिले.
जेव्हा त्यांचे निधन झाले, तेव्हा दवाखान्याचे ३,५०० रुपयांचे बिल भरून त्यांचे पार्थिव घेण्यासाठी कोणीही आले नाही. कमल अमरोहीदेखील आले नाहीत. त्यावेळी मीना यांच्या डॉक्टरांनी त्यांच्या पतीला दवाखान्याच्या बिलासंदर्भात तातडीचा संदेश पाठवला गेला आणि शेवटी पैसे जमवून, ते बिल भरले गेले. असेही म्हटले जाते की, काही काळानंतर कमल अमरोही यांनी मीना यांच्या डॉक्टरांना पैसे दिले.
कमल अमरोही यांच्यापासून वेगळे झाल्यानंतर अभिनेत्रीला दारूचे व्यसन लागले होते. मीना कुमारींनी मोठ्या प्रमाणात दारू पिणे सुरू केले होते. असे असले तरी शेवटपर्यंत मीना कुमारी त्यांच्या कामाप्रति समर्पित राहिल्या. जरी त्या दारूच्या नशेत असल्या, पाऊस पडत असला, त्या आजारी असल्या तरीही त्या त्यांच्या कामावर वेळेतच पोहोचत असत. सेटवर गेल्यानंतरही त्या कोणतेही ‘नखरे’ करीत नसत.
वयाच्या अवघ्या ३८व्या वर्षी, यकृताच्या सिरॉसिस (cirrhosis of Liver) या आजारामुळे अभिनेत्रीचे निधन झाले. रेहमतबाद दफनभूमीत त्यांचे पार्थिव दफन करण्यात आले. विनोद मेहता यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेय, “मी खूप काळानंतर रेहमतबाद येथे गेलो. माझ्या हिरॉईनची कबर पाहिली. त्यांची अवस्था अत्यंत दयनीय होती. भारताची महान ट्रॅजेडियन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मीना कुमारींचा शेवट असा होईल, यावर विश्वास बसत नव्हता. आजूबाजूला उगवलेलं गवत, दगडी जमीन, तिथे सगळं काही अत्यंत दुर्लक्षित दिसत होतं”, असे लिहीत त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या.
