Meenakshi Seshadri Dance Video: बॉलीवूडचे अनेक कलाकार सोशल मीडियावर सक्रिय असतात. ते त्यांचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात. अनेक जण विनोदी रील्स शेअर करीत चाहत्यांचे मनोरंजन करतात. काही जण गाण्याचे, डान्सचे व्हिडीओ शेअर करतात. तर अनेक जण शूटिंगदरम्यानचे फोटो, व्हिडीओ शेअर करताना दिसतात.

या कलाकारांमध्ये भाग्यश्री, रितेश देशमुख-जिनिलीया देशमुख तसेच मीनाक्षी शेषाद्री यांचा समावेश आहे. मीनाक्षी शेषाद्री यांनी नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांच्या या व्हिडीओची चर्चा होताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहते मीनाक्षी शेषाद्री यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

मीनाक्षी शेषाद्रींनी ३८ वर्षांपूर्वीच्या स्वत:च्याच गाण्यावर केला डान्स

मीनाक्षी शेषाद्री यांनी शहेनशहा चित्रपटातील हे यू या गाण्यावर डान्स केला आहे. १९८८ साली प्रदर्शित झालेल्या शहेनशहा सिनेमात अमिताभ बच्चन यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे या सिनेमात मीनाक्षी शेषाद्री प्रमुख भूमिकेत दिसल्या होत्या. आता त्यांनी ३८ वर्षांनंतर त्यांच्या स्वत:च्या गाणे रिक्रिएट केले आहे.

Award Banner

मीनाक्षी शेषाद्री यांनी सुंदर लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. त्यांच्या डान्स स्टेप्स, चेहऱ्यावरील हावभाव, तसेच त्यांचे हसू या सगळ्यामुळे चाहत्यांना त्यांच्या ८० च्या दशकातील त्यांच्या भूमिकांची, गाण्यांची आठवण येत असल्याचे कमेंट्समध्ये पाहायला मिळत आहेत.

हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी लिहिले, “हे यू, हे माझ्या कारकि‍र्दीच्या सुरुवातीच्या काही गाण्यांपैकी एक आहे. शहेनशहा चित्रपटामुळे मला पहिल्यांदाच अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली होती. हे गाणे आशा भोसले यांनी गायले आहे. या चित्रपटाचा सेट उत्तम होता. कपडेही छान होते आणि कमल मास्टर यांची कोरिओग्राफी तर कमाल होती.”

अभिनेत्रीने पुढे असेही लिहिले, “ही रील आम्ही पुण्यात मुसळधार पावसात शूट केली आहे. आजही हे गाणे तितकेच सुंदर वाटते.”

नेटकरी म्हणाले…

या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे; तर काहींनी ट्रोलदेखील केले. “तुम्ही आजही तितक्याच सुंदर दिसता”, “खूप सुंदर”, “सर्वोत्तम अभिनेत्री”, “मॅडम तुमच्या वयाचा आदर करा”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, मीनाक्षी शेषाद्री चित्रपटांपासून दूर असल्या तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या प्रेक्षकांच्या भेटीला येतात.