Meenakshi Seshadri relocated in mumbai : चित्रपटसृष्टीमध्ये ८० ते ९० चे दशक गाजवणारी अभिनेत्री आता पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये काम करण्यासाठी उत्सुक आहे. दमदार अभिनय आणि निखळ सौंदर्यामुळे प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या या अभिनेत्रीने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. मात्र, लग्नानंतर तब्बल ३० वर्षे अमेरिकेमध्ये वास्तव्य करणाऱ्या अभिनेत्रीला पुन्हा एकदा अभिनयाचे क्षेत्र खुणावू लागले आहे. ती अभिनेत्री म्हणजे ‘दामिनी’फेम मीनाक्षी शेषाद्री. सिनेविश्वाचा एक काळ गाजवलेली आणि माधुरी दीक्षित यांची प्रतिस्पर्धी मानली जाणाऱ्या मीनाक्षी शेषाद्री यांनी मुंबईमध्ये राहण्यास सुरुवात केली आहे. तसेच अभिनय क्षेत्रात पुनरागमन करण्याची इच्छा व्यक्त करीत कोणत्याही चांगल्या प्रकल्पामध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
काही दिवसांपासून अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री सोशल मीडियावर विशेष सक्रिय झाल्या आहेत. ९० च्या दशकातील त्यांच्याच गाजलेल्या गाण्यांवर त्या रील्स शेअर करीत आहेत. आजही प्रेक्षक मीनाक्षीचा अभिनय आणि त्यांचे सौंदर्य विसरलेले नाहीत. अनेकांनी त्यांना पुन्हा बॉलीवूडमध्ये पुनरागमन करण्याचे सुचवले होते. इन्स्टाग्रामवर मीनाक्षी शेषाद्री यांच्या फॉलोअर्सची संख्या वाढली असून, त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
या सर्व प्रेमाबद्दल मीनाक्षी यांनी फॉलोअर्सचे धन्यवाद मानले आहेत. तसेच अभिनय करण्यासाठी उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. चित्रपट किंवा ओटीटीवर कोणतीही भूमिका चालेल, असेदेखील मीनाक्षी यांनी स्पष्ट केले आहे.
सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करीत मीनाक्षी यांनी म्हटले की, मी ३० वर्षांनंतर माझी कर्मभूमी अर्थात मुंबईमध्ये परतले आहे. मी पूर्ण प्रयत्नांनी पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये येण्याचा विचार करीत आहे. मी चांगल्या आणि प्रभावी भूमिकांची वाट पाहत आहे. भूमिका छोटी असो किंवा मुख्य, मला फक्त चांगलं काम करायचं आहे. भूमिका मुख्य आहे की सहायक, यापेक्षा ती भूमिका प्रभावी असणं माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. कलाकार म्हणून मला वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारायच्या आहेत. थिएटरमध्ये प्रदर्शित होणारे चित्रपट असो किंवा ओटीटी चित्रपट, मला काम करायचं आहे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.
‘हीरो’ या चित्रपटामुळे रातोरात स्टार
तसेच हे सगळं मी स्वतःच सांभाळत असून, कोणत्याही एजन्सीची मदत घेतलेली नाही. त्यामुळे कामासाठी थेट माझ्याशी संपर्क साधावा आणि कलेला न्याय देता येईल अशा भूमिका द्याव्यात, असे आवाहन अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री यांनी केले आहे. काही दिवसांपासून मीनाक्षी पुन्हा एकदा चर्चेमध्ये आल्या असून, प्रेक्षकांनादेखील त्यांच्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. मीनाक्षी शेषाद्री यांनी १९८३ साली पेंटर बहू या चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर जॅकी श्रॉफ यांच्यासह आलेल्या ‘हीरो’ या चित्रपटामुळे त्या रातोरात स्टार झाल्या. त्यानंतर त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले.
मिनाक्षींच्या भूमिकांची रंगली चर्चा
घायाळ, घातक, शहेनशाह व मेरी जंग या सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी मुख्य भूमिका साकारल्या. त्यांचे सौंदर्य, अभिनय व नृत्य प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. मीनाक्षी यांची सर्वांत जास्त भूमिका गाजली ती म्हणजे दामिनी. त्यामध्ये मीनाक्षी यांनी ऋषी कपूर आणि सनी देओल यांच्यासह स्क्रीन शेअर केली होती. मात्र, त्या दोन हिरोंपेक्षा मीनाक्षी यांच्या अभिनयाची चर्चा सर्वत्र रंगली होती.
