८० आणि ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री आता चित्रपटांपासून दूर आहेत. पण ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. मीनाक्षी आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर नेहमीच खास पोस्ट शेअर करत असते. सध्या तिने शेअर केलेल्या व्हिडीओने लक्ष वेधून घेतले आहे. मीनाक्षी शेषाद्रीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर मुलगा जोश मैसूरबरोबरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये माय-लेकाचे अनेक फोटो पाहायला मिळत आहेत.
मीनाक्षी शेषाद्रीचा मुलगा जोश मैसूरने ‘हार्वर्ड युनिव्हर्सिटी’मधून (Harvard University) आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले. या व्हिडीओमध्ये जोश ग्रॅज्युएशनचा आनंद साजरा करताना दिसत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये मीनाक्षी शेषाद्रीने मुलाला खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टनंतर चाहत्यांनी जोशवर कौतुकाचा वर्षाव केला असून अनेकांनी म्हटलं की जोश बॉलीवूड हिरोपेक्षाही जास्त हँडसम दिसतो.
मीनाक्षीने कॅप्शनमध्ये लिहिलं, “मी तुला शाळेत उत्तम कामगिरी करताना पाहिलंय आणि आता तू ‘हार्वर्ड’मधून ग्रॅज्युएट झाला आहेस. तुझे मनःपूर्वक अभिनंदन. आम्हाला केवळ तुझ्या यशाचाच नाही, तर तू एक अत्यंत उत्तम व्यक्ती म्हणून जो घडला आहेस, याचाही खूप अभिमान आहे. ही तुझ्या आयुष्यातील प्रवासाच्या एका नवीन अध्यायाची सुरुवात आहे. तुला पुढील आयुष्यासाठी खूप ताकद आणि आनंद मिळो, याच सदिच्छा.
प्रिय जोश, तुझ्यामध्ये नेहमीच असाच ‘जोश’ (उत्साह) कायम राहो!!”
पाहा जौश मैसूरचा व्हिडीओ
जोश मैसूरने जगातील आघाडीच्या युनिव्हर्सिटीतून त्याचं शिक्षण पूर्ण केलंय. त्याचा लूक व त्याच्या आईबरोबरचे फोटो पाहून नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक केलं आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया युजर्सनी कमेंट्समध्ये लिहिलं, ‘हा तर कोणत्याही चित्रपट स्टारपेक्षाही जास्त हँडसम आहे’, ‘बॉलीवूडमध्ये एन्ट्री कर’, ‘आईसारखाच टॅलेंटेड दिसतोय’. काही चाहत्यांनी तर थेट प्रश्नच विचारला की, जोश चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहेत का?
मीनाक्षी शेषाद्रीचे लग्न व मुलं
८० आणि ९० च्या दशकातील प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री हिने लग्नानंतर चित्रपटसृष्टी सोडून आपले कुटुंब आणि वैयक्तिक आयुष्याला प्राधान्य दिले. मीनाक्षी शेषाद्रीने १९९५ मध्ये हरीश मैसूर यांच्याशी लग्न केलं. हरीश मैसूर हे अमेरिकेत इन्व्हेस्टमेंट बँकर आहेत. लग्नानंतर मीनाक्षी अमेरिकेतील टेक्सास राज्यातील डॅलस शहरात स्थायिक झाली. मीनाक्षी आणि हरीश मैसूर यांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. केंद्रा ही त्यांची मोठी मुलगी आहे. तिने आपले उच्च शिक्षण पूर्ण केले असून ती ग्लॅमर जगतापासून दूर कॉर्पोरेट क्षेत्रात काम करतेय. तर, जोश हा त्यांचा लहान मुलगा आहे. त्याने अमेरिकेतच त्याचे शिक्षण पूर्ण केले.
लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झाल्यावर मीनाक्षीने तिथे ‘चर्निश अकॅडमी ऑफ डान्स’ नावाची स्वतःची डान्स स्कूल सुरू केली, जिथे ती मुलांना भरतनाट्यम, कथक आणि ओडिसी सारखे भारतीय शास्त्रीय नृत्य शिकवते. आता काही काळापूर्वी ती पुन्हा भारतात परतली असून विविध शोमध्ये पाहुणी म्हणून हजेरी लावताना दिसते.
मीनाक्षी शेषाद्रीचे करिअर
मीनाक्षी शेषाद्रीने अवघ्या १७ व्या वर्षी (१९८१ साली) ‘मिस इंडिया’चा किताब जिंकला होता. तिने १९८३ मध्ये मनोज कुमार निर्मित ‘पेंटर बाबू’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. पदार्पणानंतर त्याच वर्षी (१९८३ मध्ये) रिलीज झालेल्या सुभाष घई दिग्दर्शित ‘हीरो’ (Hero) या चित्रपटाने तिला अफाट लोकप्रियता मिळवून दिली. जॅकी श्रॉफसोबतचा हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आणि मीनाक्षी बॉलीवूडमध्ये रातोरात स्टार झाली. ८० आणि ९० च्या दशकात त्यांनी श्रीदेवी, माधुरी दीक्षित, काजोल आणि जुही चावला यांसारख्या आघाडीच्या अभिनेत्रींना तगडी टक्कर दिली. दामिनी, घायल, घातक, ‘मेरी जंग’, ‘शहेनशाह’ ‘जुर्म’, ‘घर हो तो ऐसा’, ‘स्वाती’ आणि ‘आवारगी’ या चित्रपटांमध्ये तिने दमदार भूमिका साकारल्या.
