Meenakshi Sheshadri Comeback: बॉलीवूडमधील ८० ते ९० च्या दशकाचा काळ गाजवणारी एक अभिनेत्री तब्बल ३० वर्षांनंतर सिनेविश्वामध्ये पुनरागमन करणार आहे. दमदार अभिनय आणि निखळ सौंदर्य यांमुळे प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या या अभिनेत्रीने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. मात्र, लग्नानंतर तब्बल ३० वर्षे अमेरिकेमध्ये वास्तव्य करणाऱ्या या अभिनेत्रीने आता दमदार पुनरागमन केले आहे आणि ती अभिनेत्री म्हणजे ‘दामिनी’ फेम मीनाक्षी शेषाद्री. प्राइम व्हिडीओवरील एका सीरिजमधून मीनाक्षी पुनरागमन करणार असून, यावेळी त्या जॅकी श्रॉफसह स्क्रीन शेअर करणार आहेत.
दोन महिन्यांपूर्वी मीनाक्षी शेषाद्री मुंबईत परत वास्तव्यास आल्या असून, त्यानंतर त्या सोशल मीडियावरही सक्रिय झाल्या आहेत. रील्सच्या माध्यमातून त्यांनी भारतामध्ये राहायला आल्याचे आणि पुन्हा अभिनय क्षेत्रात काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. अखेर त्यांच्या चाहत्यांची ही प्रतीक्षा संपली असून, मीनाक्षी शेषाद्री अनेक वर्षांनंतर अभिनय क्षेत्रात पुनरागमन करीत आहेत. प्राइम व्हिडीओवरील ‘नानावती विरुद्ध नानावती’ (Nanavati vs Nanavati) या वेब सीरिजमध्ये त्या महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. त्या वेब सीरिजचं दिग्दर्शन विपुल शाह यांनी केले असून, मीनाक्षी या कोर्टरूम ड्रामामध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत.
मीनाक्षी शेषाद्री व जॅकी श्रॉफ यांची जोडी पुन्हा गाजणार
विशेष म्हणजे, या मालिकेच्या निमित्ताने मीनाक्षी शेषाद्री आणि अभिनेते जॅकी श्रॉफ यांची जोडी तब्बल ४० वर्षांनंतर पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करणार आहेत. १९८३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हीरो’ या सुपरहिट चित्रपटातील त्यांची जोडी प्रचंड गाजली होती आणि आता ते पुन्हा एकत्र झळकणार आहेत. त्याचबरोबर ‘नानावती विरुद्ध नानावती’ या सीरिजमध्ये बॉलीवूडमधील अनेक लोकप्रिय कलाकार महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. त्यामध्ये भाग्यश्री, राम कपूर व अनुप्रिया गोयंका यांच्याही मुख्य भूमिका आहेत. बॉलीवूड गाजवणाऱ्या कलाकारांची तगडी स्टार कास्ट असलेल्या या ओटीटी सीरिजबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
‘मिड-डे’च्या रिपोर्टनुसार, विपुल शाह दिग्दर्शित ‘नानावती विरुद्ध नानावती’ ही सीरिज आठ एपिसोडची असून, अद्याप त्याचे शूटिंग सुरू आहे. अंधेरी पश्चिम येथील ‘बार स्टॉक एक्स्चेंज’मध्ये या सीरिजचे चित्रीकरण सुरू असून, हा एक कोर्टरूम ड्रामा असणार आहे. भाग्यश्री आणि राम कपूर यांची जोडी पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहे. मात्र, सध्या राम कपूर हे अलायन्स या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाल्याने त्यांचे शूटिंग नंतर केले जाणार आहे. या वेब सीरिजचे मुख्य शूटिंग हे मुंबईतील पवई परिसरात होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मीनाक्षी यांनी गाजवले होते बॉलीवूड
मीनाक्षी शेषाद्री यांनी १९८३ साली पेंटर बहू या चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर जॅकी श्रॉफ यांच्यासह आलेल्या ‘हीरो’ या चित्रपटामुळे त्या रातोरात स्टार झाल्या. त्यानंतर त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. घायाळ, घातक, शहेनशाह व मेरी जंग या सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी मुख्य भूमिका साकारल्या. त्यांचे सौंदर्य, अभिनय व नृत्य प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. मीनाक्षी यांची सर्वांत जास्त भूमिका गाजली ती म्हणजे दामिनी. त्यामध्ये मीनाक्षी यांनी ऋषी कपूर आणि सनी देओल यांच्यासह स्क्रीन शेअर केली होती. मात्र, त्या दोन हिरोंपेक्षा मीनाक्षी यांच्याच अभिनयाची चर्चा सर्वत्र रंगली होती.
