Megha Dhade Daughter Sakshi Pavaskar Bollywood debut : कोरिओग्राफर आणि चित्रपट निर्माते गणेश आचार्य यांच्या जीवनावर आधारित ‘गणेश: डस्ट टू स्टारडस्ट’ (Ganesh: Dust to Stardust) सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यामध्ये गणेश यांचा संघर्ष, मेहनत आणि बॉलीवूडपर्यंत येण्याचा प्रवास मांडला आहे. यामध्ये आणखी एक विशेष बाब म्हणजे, ‘बिग बॉस’फेम मराठमोळी अभिनेत्री मेघा धाडेच्या मुलीने या सिनेमातून सिनेविश्वामध्ये पदार्पण केले आहे.
बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनची विजेती मेघा धाडेच्या मुलीने सिनेमांमध्ये काम करण्यास सुरुवात केली आहे. मेघाची मुलगी साक्षी पावसकरने बॉलीवूड सिनेमातून पदार्पण केले आहे. ‘गणेश: डस्ट टू स्टारडस्ट’ या सिनेमामध्ये ती झळकणार असून सिनेमाच्या ट्रेलरमध्ये तिची झलक दिसून आली आहे. मुलीच्या या पदार्पणासाठी आईने खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे.
मेघा धाडेने मुलीसाठी व्यक्त केल्या भावना
मेघा धाडेने सोशल मीडियावर ‘गणेश: डस्ट टू स्टारडस्ट’ या सिनेमाचा ट्रेलर शेअर करत लिहिले, “लाडक्या लेकीचं रुपेरी पडद्यावर पहिलं पाऊल पडतंय आशीर्वाद असू द्या…आई अंबाबाईच्या नावानं चांगभलं” मेघा धाडेच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री शिवानी सुर्वेने सुकू असे लिहीत रेड हार्ट कमेंट केल्या आहेत; तर अभिनेत्री प्राप्ती रेडकर, सारिका नवाथे, शुभांगी अत्रे यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.
‘गणेश: डस्ट टू स्टारडस्ट’ या सिनेमाचे लेखन व दिग्दर्शन गणेश आचार्य यांनीच केले आहे. चित्रपटात त्यांच्या संघर्षाची, त्यागाची आणि स्वप्न पूर्ण करण्याची गाथा मांडली आहे. अगदी सामान्य कुटुंबातील मुलाने या ग्लॅमरच्या दुनियेत आपल्या कलेच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केलेला हा प्रेरणादायी प्रवास मांडला आहे. यावेळी त्यांना आलेली आव्हाने, संकटं आणि त्यावर मात करून आयुष्यात मिळवलेले यश, याचे अंगावर काटा आणणारे चित्रण ट्रेलरमध्ये दिसून आले आहे. यामधून गणेश आचार्य यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याची झलक पाहायला मिळाली आहे.
यामध्ये साक्षी पावसकरसह शिवांशू सोनी, आलोक शॉ, सुकन्या कलान, जयवंत वाडकर, विद्या जोशी, नीशांत साथियानारायण, दिशा पंड्या, रुद्रांश पवार यांनी भूमिका साकारल्या आहेत. ‘गणेश: डस्ट टू स्टारडस्ट’ हा सिनेमा येत्या ११ डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
