Meghna Gulzar Gulzar Parenting Secrets : प्रसिद्ध गीतकार व लेखक गुलजार यांच्या लेखनाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. वडिलांच्या लाभलेल्या या जादुई लेखणीमुळे त्यांची मुलगी मेघना गुलजारचे बालपणही तितकेच खास ठरले. लहानपणीच्या काही आठवणी सांगताना, मेघना यांनी वडिलांबरोबरचा एक खास किस्सा सांगितला. वयाच्या १३ व्या वर्षापर्यंत गुलजार दरवर्षी मुलीसाठी खास पुस्तक लिहून देत होते. मेघनाची ही आठवण ऐकून करीना कपूरही थक्क झाली.
मेघना गुलजार या ‘दायरा’ सिनेमासह प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून, त्यामध्ये करीना कपूर व पृथ्वीराज सुकुमारन यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या सिनेमाच्या प्रमोशनवेळी ‘व्ही आर युवा’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मेघना यांनी संवाद साधला. यावेळी मेघना यांना, वडिलांकडून अशी कोणती शिकवण मिळाली, जी आजही तुमच्याबरोबर आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सिनेमांपेक्षा मुलांच्या संगोपनाबद्दल जास्त शिकल्याचे नमूद केले.
दरवर्षी वाढदिवस लिहायचे एक पुस्तक अन् पत्र
मेघना म्हणाल्या, “मी माझ्या वडिलांकडून ‘फिल्ममेकिंग’पेक्षा पालकत्वाबद्दल जास्त शिकले. ते माझ्या वयाच्या १३ व्या वर्षापर्यंत प्रत्येक वाढदिवशी माझ्यासाठी एक पुस्तक लिहायचे. ती पुस्तके प्रकाशितही व्हायची आणि मी शाळेतील मुलांना वाटायचे. त्या पुस्तकांचे विषयही हटके असायचे. प्रत्येक पुस्तकात माझ्यासाठी एक पत्र असायचं, जे त्या त्या वयाच्या मेघनाशी संवाद साधायचं.”
‘तेव्हा मीही एक वर्षाचा बाबा होतो…’
मेघना यांनी पुढे सांगितलं, “माझ्या वडिलांनी मला अशा प्रकारे मोठं केलं आहे. ते मला म्हणाले, ‘जेव्हा तू एक वर्षाची होतीस, तेव्हा मीही एक वर्षाचा बाबा होतो. लहान मुलांशी कधी ते फार लहान आहेत किंवा त्यांना काहीच समज नाही, अशा प्रकारे बोलणं चुकीचं आहे, हे समजून घेतलं पाहिजे. जर एखादा मुलगा १४ वर्षांचा असेल, तर त्याचे वडील म्हणून तुम्हीही त्यांच्याशी समान पातळीवर संवाद साधला पाहिजे. असे विचार हे समानतेच्या भावनेतून येतात.’ “
गुलजार व राखी यांची एकुलती एक मुलगी
मेघना गुलजार या दिग्दर्शक, लेखक व गीतकार गुलजार आणि अभिनेत्री राखी यांचे एकमेव अपत्य आहे. १९७३ मध्ये गुलजार व राखी यांनी लग्न केलं होतं; मात्र त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. परस्पर मतभेदांमुळे लग्नाच्या एका वर्षाच्या आतच दोघे वेगळे झाले. दरम्यान, मेघना गुलजार यांनी दिग्दर्शित केलेला ‘दायरा’ सिनेमा १८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
