Meghna Gulzar on failure: गुलजार हे कवी, गीतकार व दिग्दर्शक म्हणून लोकप्रिय आहेत. त्यांच्या अनेक कविता, शायरी प्रसिद्ध आहेत. त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांच्या पत्नी राखी यांनीही बॉलीवूडमध्ये विविध सिनेमांतून काम केले आहे. त्यांच्या अनेक भूमिका लोकप्रिय ठरल्या आहेत. त्यांची मुलगी मेघना गुलजारदेखील अभिनय क्षेत्रात काम करत आहे.
मेघना गुलजारने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले, त्यावेळी गुलजार यांना सात राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. १९९९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हू तू तू’ या सिनेमानंतर त्यांनी दिग्दर्शनातून निवृत्ती घेतली. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी मेघनाने सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले होते.
‘हू तू तू’बरोबरच ‘माचिस’ या सिनेमातही मेघनाने सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. या सिनेमाने राष्ट्रीय पुरस्कार मिळवले होते. मेघनाने ज्येष्ठ दिग्दर्शक सईद अख्तर मिर्झा यांच्याबरोबरही काम केले आहे. त्यांनी न्यूयॉर्क विद्यापीठातून फिल्ममेकिंगचे शिक्षण घेतले आहे. इतक्या अनुभवानंतरही त्यांना दिग्दर्शक म्हणून पहिल्याच प्रयत्नात यश मिळू शकले नाही. २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फिलहाल’ या सिनेमातून त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. तब्बू व शिल्पा शेट्टी या लोकप्रिय अभिनेत्री प्रमुख भूमिकांत असूनही हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला.
“माझ्या करिअरमध्ये असा एक टप्पा आला होता, जेव्हा…”
‘फिलहाल’नंतर मेघनाने २००७ मध्ये ‘जस्ट मॅरिड’ हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट दिग्दर्शित केला. या चित्रपटात फरदीन खान आणि ईशा देओल मुख्य भूमिकांत होते. मात्र, हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही. मेघनाने नुकतीच ‘बॉलीवूड हंगामा’ला मुलाखत दिली.
या मुलाखतीत तिने तिच्या कारकिर्दीबद्दल सांगितले. ती म्हणाल्या, “माझ्या करिअरमध्ये असा एक टप्पा आला होता, जेव्हा माझे चित्रपट चालले नाहीत आणि अनेक वर्षं मला कामही मिळालं नाही. ‘तलवार’ सिनेमानंतर परिस्थिती बदलली. या सिनेमाचं दिग्दर्शन करतानाही मी स्वत:मध्ये किंवा चित्रपट बनवण्याच्या पद्धतीमध्ये कोणताही बदल केला नाही. मात्र, मी सांगत असलेल्या गोष्टीनं बदल घडवला.”
तलवार या सिनेमाआधी जो संघर्ष करावा लागला, त्याचा परिणाम पालकांवर जास्त झाला. त्या परिस्थितीला सामोरं जाणं त्यांच्यासाठी कठीण होतं, असेही मेघना म्हणाली, “माझे आई-वडील दोघेही याच इंडस्ट्रीमध्ये आपापल्या क्षेत्रात खूप यशस्वी होते. मी यशस्वी व्हावं म्हणून ते काही करू शकत नव्हते, ते हतबल झाले होते. त्यांनी मला त्यावेळी सांगितलं होतं की, तुझ्या संवेदनशीलतेशी आणि तुझ्या विचारांशी कधीही तडजोड करू नकोस. काम मिळायचं असेल, तर ते मिळेलच. तू फक्त तुझं काम करत राहा. त्या कामाच्या परिणामांची काळजी करू नकोस. तू तुझं काम प्रामाणिकपणे करत राहा.”
‘तलवार’च्या यशानंतर मेघनाने ‘राझी’ सिनेमाचे दिग्दर्शन केले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींहून अधिक कमाई केली. हा मेघना यांच्या करिअरमधील पहिला १०० कोटींहून अधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. त्यानंतर २०२० मध्ये तिने ‘छपाक’चे दिग्दर्शन केले. या चित्रपटालाही बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळाले नाही.
मेघनाने अलीकडेच दिग्दर्शित केलेला ‘सॅम बहादूर’ हा सिनेमाही चर्चेत राहिला. या सिनेमाला ‘सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म’चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. आता मेघना गुलजार ‘दायरा’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात करीना कपूर आणि पृथ्वीराज सुकुमारन मुख्य भूमिकांत दिसणार आहेत. ‘दायरा’ चित्रपट १८ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.
