Mehmood Ali Death reason : बॉलीवूडचे असे एक अभिनेते ज्यांनी प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करीत त्यांना खळखळून हसवले आणि ते म्हणजे मेहमूद अली. त्यांनी सिनेविश्वामध्ये प्रभावी भूमिका साकारत हिंदी सिनेमातील विनोदी शैलीला वेगळ्या उंचीवर नेले होते. पण, त्यांचे अचानक हे जग सोडून जाणे प्रत्येकाच्या मनाला चटका लावून गेले होते.
मेहमूद अली यांच्या निधनाला दोन दशकांहून अधिक काळ लोटला असला तरी त्यांनी साकारलेल्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. ‘मेहमूद’ या नावानेच प्रसिद्ध असलेल्या या अभिनेत्याने ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. आपल्या दमदार विनोदी अभिनयाद्वारे त्यांनी बॉलीवूडमध्ये लोकप्रिय विनोदी अभिनेता म्हणून वेगळी ओळख निर्माण केली. अमेरिकेमध्ये उपचारासाठी गेलेल्या मेहमूद यांचा झोपेतच मृत्यू झाला.
अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया येथे घेतला अखेरचा श्वास
मेहमूद यांच्या निधनाच्या काही वर्षांपूर्वीपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. बरीच वर्षे ते आजारपणाशी झुंज देत होते. हृदयाशी संबंधित आजारावर उपचार घेण्यासाठी मेहमूद अमेरिकेत गेले होते. बराच काळ सुरू असलेली आजारपणाशी झुंज आणि उपचार यादरम्यान त्यांनी अमेरिकेत शेवटचा श्वास घेतला. २३ जुलै २००४ रोजी अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया येथे त्यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले. उपचारासाठी परदेशात गेलेल्या मेहमूद यांचा झोपेतच मृत्यू झाला.
मेहमूद यांच्या मृत्यूचे नेमके वैद्यकीय कारण त्यावेळी सविस्तरपणे समोर आले नव्हते. त्यांच्या कुटुंबीयांनी ते झोपेतच गेल्याची माहिती दिली होती. त्यानंतर त्यांचे पार्थिव मुंबईत आणण्यात आले. सिनेविश्वातील कलाकार आणि चाहत्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेत, त्यांना अखेरचा निरोप दिला होता. मुंबईनंतर मेहमूद यांचे पार्थिव बंगळुरूला नेण्यात आले. येलहंका येथील त्यांच्या ‘अली इस्टेट’ या फार्महाऊसमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वडील आणि मुलगा मगदूम यांच्या कबरीजवळच त्यांच्या मृतदेह दफन करण्यात आला होता.

मेहमूद यांच्या सिनेमांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते. त्यांच्या ‘पडोसन’मधील ‘एक चतुर नार’ हे गाणे आजही तितकेच लोकप्रिय आहे. त्यांचे ‘पडोसन’, ‘बॉम्बे टू गोवा’, ‘गुमनाम’, ‘कुंवारा बाप’, ‘भूत बंगला’ व ‘प्यार किये जा’ असे अनेक सिनेमे गाजले होते. अभिनय, निर्मिती व दिग्दर्शन अशा सर्वच क्षेत्रांमध्ये त्यांनी यशस्वी कारकीर्द घडवली होती. आजही बॉलीवूडमधील प्रभावी विनोदी कलाकारांमध्ये मेहमूद अली यांचे नाव आवर्जून घेतले जाते.
