एमटीव्हीच्या लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘रोडीज’मधील परीक्षक म्हणून ओळखला जाणारा रघु राम ‘टू गर्ल्स अँड टू कप्स’ या पॉडकास्टमधील एका वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. महिलाच पुरुषांच्या शारीरिक आणि मानसिक आजारांचं मुख्य कारण’ असल्याचं विधान त्यानं केलं आहे. पॉडकास्टमध्ये केलेल्या वक्तव्यानुसार, रघु रामच्या मते, पुरुषांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यापेक्षा हृदयविकाराचा झटका किंवा बायपास सर्जरी करणं जास्त सोपं वाटतं.
या पॉडकास्टमध्ये रघु असं म्हणाला, “मुली म्हणतात की, त्यांना भावनिक आणि संवेदनशील पुरुष आवडतात; पण खरं सांगायचं, तर त्यांना तसे पुरुष नको असतात. जेव्हा एखादा पुरुष भावनिक होतो, तेव्हा त्या म्हणतात ‘तू तर मुलीसारखा वागतोयस’. त्यामुळेच पुरुष काहीही शेअर करीत नाहीत. आम्हाला ६० व्या वर्षी हार्ट अटॅक आला तरी चालेल; पण आम्ही भावना व्यक्त करणार नाही.”
पुढे त्यानं म्हटलं, “हृदयविकाराच्या झटक्यामुळे मरणारे बहुतेक पुरुषच असतात. कारण- महिलांना आमची भावनिक बाजू स्वीकारता येत नाही. आम्हाला काही पर्यायच राहत नाही. मग काय होणार? हार्ट अटॅक आला तर चालेल. आम्ही बायपास सर्जरी करू; पण एखाद्या स्त्रीसमोर आम्ही आमच्या भावना व्यक्त करणार नाही. कारण- जेव्हा पुरुष असं काही बोलतात, तेव्हा स्त्रिया ते त्यांच्याच विरोधात वापरतात.”
त्यानंतर त्यानं आपल्या ‘रघु बॉक्स’ या यूट्यूब शोमधील एका प्रसंगाचा उल्लेख केला. त्यात एका स्पर्धक मुलीनं सांगितलं होतं की, ‘ती अशा पुरुषांचा आदर करीत नाही जे कमावत नाहीत.’ त्यावर रघु म्हणाला, “जर आम्ही असं म्हटलं की, ज्या मुली सुंदर नाहीत, त्या आमच्या प्रेमास पात्र नाहीत, तर? वयानुसार आम्ही अधिक कमाई करू लागतो; पण तुमचं सौंदर्य कमी होतं. मग काय? आम्ही कधी अशी अट घातली आहे का?”
त्यानंतर त्यानं ‘रोडीज’च्या काळातील अनुभव सांगताना असं म्हटलं, “मी अशा अनेक मुली पाहिल्या आहेत, ज्या मुलांपेक्षा जास्त आक्रमक होत्या. अनेक मुलींच्या आवाजाचा टोन, राग – असं सगळं काही तीव्र असायचं. पुरुष भांडतात तेव्हा एक मर्यादा असते; पण महिलांमध्ये ती मर्यादा नसते. त्या इतक्या जास्त व्यक्त होतात की, आम्ही खरोखर घाबरतो.”
‘रोडीज’ फेम रघु रामची इन्स्टाग्राम पोस्ट
दरम्यान, रघु रामच्या या वक्तव्याची आता सर्वत्र चर्चा सुरू आहे. रघु रामबद्दल सांगायचं झाल्यास, त्यानं करिअरची सुरुवात ‘एमटीव्ही रोडीज’ आणि ‘एमटीव्ही स्प्लिट्सव्हिला’ या रिअॅलिटी शोजपासून केली. यानंतर त्यानं अनेक टीव्ही कार्यक्रमांचं सूत्रसंचालनही केलं. त्याशिवाय त्यानं ‘झूठा ही सही’ या हिंदी रोमँटिक कॉमेडीमधून चित्रपट क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर तो ‘डॉक्टर’ या तमीळ आणि ‘कीडा कोला’ या तेलुगू चित्रपटांमध्येही पाहायला मिळाला.
