गायक मिका सिंग दिल्लीतील एका १०० एकरच्या फार्महाऊसचा मालक आहे. विशेष म्हणजे या फार्महाऊसमध्ये पोहोचण्यासाठी विमान, कार, बोट आणि घोडा अशी प्रवासाची चार वेगवेगळी साधनं वापरावी लागतात. पण या विस्तीर्ण फार्महाऊसची सुरुवात फक्त दोन एकर जमिनीपासून सुरू झाली होती. टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत मिका सिंगने हे फार्महाऊस कसं खरेदी केलं आणि त्याचा विस्तार कसा केला ते सांगितलं.

मिकाला या फार्महाऊसच्या प्रवासाबद्दल विचारण्यात आलं. यावर मिका म्हणाला, “या सगळ्यामागचं कारण असं आहे की माझ्या सगळ्या श्रीमंत मित्रांकडे मेबॅक आणि रोल्स-रॉयससारख्या गाड्या आहेत, पण त्यांच्यापैकी कोणाकडेही घोडे किंवा बोटी नाहीत. मी विचार केला की मी त्यांना या साध्या बोटीत बसवीन.”

या फार्महाऊसच्या सुरुवातीबद्दल मिका म्हणाला, “जेव्हा ही जागा अगदी जंगलासारखी होती, तेव्हा मी ती पाहायला आलो होतो. सुरुवातीला मी फक्त दोन एकर जमीन खरेदी केली होती. मी तिथे अधूनमधून ब्रेक घेण्यासाठी, आवडतं जेवण बनवण्यासाठी जंगलात तंबूमध्ये राहायला यायचो.”

Mika Singh Delhi Farmhouse
मिका सिंगच्या फार्महाऊसमधील किचन (फोटो- फराह खान युट्यूब)

मिकाच्या ओळखीच्या एका व्यक्तीने त्याला सांगितलं की या भागाचा पुढे विस्तार होईल. “मी विचार करायचो की इथे कोण येणार? पण त्यांनी मला आणखी जमीन खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. मी जागा घेतली आणि तुमचा विश्वास बसणार नाही, माझ्या फार्महाऊसच्या अगदी समोर ‘ताज विवांता’ हॉटेल आहे. आणि आता तिथे अनेक हॉटेल्स सुरू झाली आहेत,” असे तो म्हणाला.

Mika Singh Delhi Farmhouse
मिका सिंगचे फार्महाऊस (फोटो- फराह खान युट्यूब)

मिका कधीकाळी एका १-बीएचके घरात राहायचा, आता ९९ मालमत्तांचा मालक

मिकाने त्याच्या ९९ मालमत्तांबद्दल सांगितलं. “पूर्वी माझ्याकडे काहीच नव्हतं, तरीही मी आनंदी होतो. मी कधीही कोणाकडे किंवा देवाकडे तक्रार केली नाही. आमचं १-बीएचके घर होतं, त्यात आम्ही पाच भावंडे राहायचो. तेव्हाही आम्ही खूप आनंदी होतो. त्यामुळे जर आम्ही अशा ठिकाणी राहिलो असू, तर आता जे काही आहे तो देवाचा आशीर्वादच आहे,” असं मिका म्हणाला.

मिकाने सांगितलं की, त्याच्या ९९ मालमत्तांपैकी प्रत्येक ठिकाणी कमीत कमी दोन लोक राहतात, जेणेकरून त्याची देखभाल करता येईल. यापैकीच एक त्याचं १-बीएचके घर आहे, जिथे त्याचं बालपण गेलं. “ते घर दिल्लीतील तिलक विहारजवळ आहे. मी पंजाबमधून पहिल्यांदा तिलक विहारमध्येच आलो होतो. ते घर अजूनही माझ्याकडे आहे. तेच घर दलेर मेहंदी यांचंही घर होतं.”

mika-singh-delhi-100-acre-farmhouse-99-properties-journey-wealth
मिका सिंगच्या फार्महाऊसमधील घोडे (फोटो- फराह खान युट्यूब)

मिका सिंगच्या फार्महाऊसमध्ये काय आहे?

मिका सिंगने यापूर्वी कोरिओग्राफर फराह खानला त्याच्या फार्महाऊसची सफर घडवून आणली होती. या भव्य आणि विस्तीर्ण फार्महाऊसमध्ये घोडे, ट्रॅक्टर, उंट, शेतजमीन आणि हेलिपॅड देखील आहे. तसेच तिथे मंदिरे आणि गुरुद्वारा यांसारखी प्रार्थनास्थळे आहेत, असं त्याने सांगितलं होतं.

या फार्महाऊसमध्ये एक खासगी ‘म्युझिक स्टुडिओ’ देखील आहे. तसेच या फार्महाऊसमध्ये २०० लोक काम करतात. त्यापैकी सुमारे ५० लोक तिथेच कायमस्वरूपी राहतात. त्याच्या या फार्महाऊसवर पारंपरिक खाट असलेला ‘ढाबा-स्टाईल’ कॅफे देखील आहे.