Mika Singh On Pakistan : लोकप्रिय पंजाबी-बॉलीवूड गायक मिका सिंग हा त्याच्या गाण्यांसह त्याच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. यापूर्वी त्याने २०१९ मध्ये कराचीमध्ये परफॉर्मन्स केल्याने तो वादात अडकला होता. यानंतर आता मिकाने पाकिस्तानमधील लोकांबाबत वक्तव्य केले आहे. पाकिस्तानमध्ये राहणारे मुस्लीम आणि दुबईमधील राहणारे मुस्लीम यांच्यामध्ये केला जाणारा भेदभाव याबद्दल त्याने मत व्यक्त केले असून पाकिस्तानमधील लोक वाईट नसल्याचे सांगितले.

‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मिका सिंगने त्याचे पाकिस्तानबाबत विचार मांडले. तो म्हणाला, “पाकिस्तान वाईट नाहीये किंवा पाकिस्तानचे लोकही वाईट नाहीयेत. मला माहीत नाही का, पण आपल्याला पाकिस्तानचे मु्स्लीम वाईट वाटतात. पण, हेच जर दुबईचा विचार केला तर दुबईचे मुस्लीम आपल्याला खूप चांगले वाटतात. हे असे का आहे हे मला आजपर्यंत लक्षात आलेले नाही.”

मिका सिंगचा काय आहे पाकिस्तानशी भावनिक संबंध?

पुढे तो म्हणाला, “मला पाकिस्तानशी का जोडलेले वाटते, याबद्दल एक भावनिक संबंध आहे. पाकिस्तानमध्ये गुरु नानक देवजी यांचा गुरुद्वारा आहे. पाकिस्तानमध्ये तीन मोठे गुरुद्वारा आहेत. जेव्हा पण पाकिस्तानमध्ये गाण्याचे आमंत्रण मिळत होते, तेव्हा मला गुरुद्वारातून आमंत्रण आल्याप्रमाणे वाटत होते. आशीर्वाद घेण्यासाठी बोलावले असल्याचे वाटत होते, त्यामुळे माझ्या मनात पैशांबाबत लालसा नाही, तर या पाकिस्तानमधील कार्यक्रमाच्या माध्यमातून मला गुरुद्वारामध्ये जाण्याची संधी मिळते.”

मिका सिंग
गायक मिका सिंग

पाकिस्तानच्या गुरुद्वारामध्ये मुस्लीम बांधव करतात सेवा – मिका सिंग

पुढे तो म्हणाला, “जेव्हा मी पाकिस्तानमध्ये गेलो होतो, तेव्हा तिथे गुरुद्वारामध्ये अनेक मुस्लीम बांधव होते. तिथे आमचे मुस्लीम बांधव गुरुद्वारांमध्ये सेवा करत होते आणि साफसफाईत मदत करत होते.”