Milind Soman shares experience of Intermittent Fasting: आपण निरोगी असावे, तंदुरुस्त असावे, असे प्रत्येकाला वाटत असते. अनेक जण वजन कमी करण्यासाठी किंवा वाढविण्यासाठी विविध उपाय करीत असतात. निरोगी आरोग्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, डाएट, व्यायाम आणि जीवनशैलीमध्ये बदल करता येतात.

अभिनेते व मॉडेल मिलिंद सोमण हे त्यांच्या फिटनेससाठीदेखील ओळखले जातात. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी इंटरमिटेंट फास्टिंग (Intermittent fasting)बद्दल वक्तव्य केले.

“नेमका काय परिणाम…”

मिलिंद सोमण यांनी नुकतीच एफपीए शोबिझला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी ५९ व्या वर्षी इंटरमिटेंट फास्टिंग केले होते. त्याचा काय अनुभव आला, त्याचे काय परिणाम दिसले यावर वक्तव्य केले. ते म्हणाले, “मी तो प्रयोग केला होता. मी १६:८ हे इंटरमिटेंट फास्टिंग केले. नेमका काय परिणाम होतो, नेमकं काय वाटतं, हे पाहण्यासाठी मी हा उपवास केला होता. मला खूप छान वाटले.”

हा उपवास केल्याने त्यांना त्यांच्या शरीरात काय बदल पाहायला मिळाले? यावर ते म्हणाले, “माझे ६-७ किलो वजन कमी झाले. मी नेहमी हा विचार करायचो की, मी परफेक्ट आहे. मला सगळे जण हेच सांगायचे की, मी परफेक्ट आहे. पण, माझे ६ किलो वजन कमी झाल्यामुळे मला जास्त ऊर्जादायी वाटत आहे. मी जास्त सतर्क असल्यासारखे मला वाटत आहे. हा खूप सकारात्मक अनुभव होता.”

इंटरमिटेंट फास्टिंग बंद का केले, याचे कारण सांगत मिलिंद सोमण म्हणाले, “मी हाफ आयर्नमॅन मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होणार होतो. त्यामुळे मी इंटरमिटेंट फास्टिंग बंद केले. कारण- त्यावेळी तुम्हाला जे मिळेल, ते खावे लागते. मग मी ते पुन्हा सुरू केले नाही. कारण- मी आता फुल आर्यनमॅन स्पर्धेत भाग घेणार आहे. “

मिलिंद सोमण यांनी असेही सांगितले की, जलतरणमध्ये ते २३ व्या वर्षापर्यंत भारताचे प्रतिनिधित्व करीत होते. त्यावेळी ते रोज रात्री ९ वाजता झोपायचे. त्यामुळे ते नैसर्गिकरीत्या हा १४ तासांचा उपवास होत असतो. तसेच घरीच संतुलित आहार घेत असत.

इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे काय?

इंटरमिटेंट फास्टिंग ही एक आहार पद्धती आहे, ज्यामध्ये काही तासांसाठी अन्न खाल्ले जात नाही आणि उर्वरित वेळेत निरोगी अन्न खाल्ले जाते. त्यामध्ये प्रामुख्याने खाण्याचा आणि उपवासाचा कालावधी निश्चित केला जातो. १६ : ८ इंटरमिटेंट फास्टिंगमध्ये १६ तास उपवास केला जातो आणि ८ तासांच्या आत अन्न खाल्ले जाते.