Milind Soman swims from Europe to Africa: अभिनय व मॉडलिंग क्षेत्रात मिलिंद सोमण यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. याबरोबरच, मिलिंद सोमण हे त्यांच्या फिटनेससाठी ओळखले जातात. त्यांची व्यायामाप्रतिची आवड, फिटनेस या सर्व गोष्टी लक्ष वेधून घेतात. सोशल मीडियावरही ते अनेक गोष्टी शेअर करतात.

६० वर्षीय मिलिंद सोमण युरोपातून आफ्रिकेत पोहत गेले

मिलिंद सोमण यांचे वय ६० वर्षे इतके आहे. मात्र, आजही ते एकदम फिट आहेत. अनेकदा ते धावण्याच्या शर्यतीत भाग घेतात. आता मात्र, ते वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी पोहण्याच्या बाबतीत एक विक्रम केला आहे. त्यांनी युरोप ते आफ्रिका हे अंतर पोहत पार केले आहे. त्यांनी स्वत: याबद्दल माहिती शेअर केली आहे.

मिलिंद सोमण यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, “१ मेला मी पोहत युरोपमधून आफ्रिकेत गेलो. जिब्राल्टरची सामुद्रधुनी ओलांडली. स्पेनमधील टारिफा(Tarifa) ते मोरोक्कोचा समुद्रकिनारा यांच्यात १५ किलोमीटरचे अंतर आहे. पोहण्याचा हा अनुभव खूपच सुंदर व अप्रतिम होता. याबद्दल लवकरच सविस्तर पोस्ट शेअर करेन.”

याबरोबरच, त्यांनी काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करेन. एका फोटोत त्यांनी दोन्ही हातात भारताचा ध्वज पकडला असल्याचे दिसत आहे. दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये ते समुद्रात पोहोत असल्याचे पाहायला मिळत आहे. आणखी एका फोटोत ते त्यांच्या पत्नीबरोबर दिसत आहेत.

नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “मी तुमचा खूप मोठा चाहता आहे”, आणखी एकाने लिहिले, “भारत आणि नागपूरला तुमचा अभिमान आहे”, दुसऱ्या एकाने लिहिले, “प्रेरणादायी”, एकाने लिहिले, “तुम्ही हिरो आहात आणि अनेकांसाठी प्रेरणादायी आहात”, एकाने लिहिले, “तुमचा अभिमान आहे”, आणखी एकाने लिहिले, “तुम्ही अनेकांसाठी प्रेरणादायी आहात”, एकाने लिहिले, “तुम्हाला खूप प्रेम”, दुसऱ्याने लिहिले, “अभिनंदन”, आणखी एकाने लिहिले, “मी तुम्हाला ओळखते, याचा मला अभिमान आहे”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत. तसेच, अनेकांनी हार्ट इमोजी शेअर करत प्रेम व्यक्त केले आहे.

मिलिंद सोमण हे फिटनेसबद्दल जागरुक आहेत. ते त्यासाठी विविध पद्धतीने प्रयत्न करतात. ५९ व्या वर्षी त्यांनी इंटरमिटेंट फास्टिंग करत सहा ते सात किलो वजन कमी केले होते. त्याबद्दल ते म्हणाले होते, ““मी तो प्रयोग केला होता. मी १६:८ हे इंटरमिटेंट फास्टिंग केले. नेमका काय परिणाम होतो, नेमकं काय वाटतं, हे पाहण्यासाठी मी हा उपवास केला होता. मला खूप छान वाटले. माझे ६-७ किलो वजन कमी झाले. मी नेहमी हा विचार करायचो की, मी परफेक्ट आहे. मला सगळे जण हेच सांगायचे की, मी परफेक्ट आहे. पण, माझे ६ किलो वजन कमी झाल्यामुळे मला जास्त ऊर्जादायी वाटत आहे. मी जास्त सतर्क असल्यासारखे मला वाटत आहे. हा खूप सकारात्मक अनुभव होता.”