मिलिंद सोमण यांनी त्यांची बायको अंकिता कोंवरचा वाढदिवस सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत साजरा केला. अभिनेते आणि फिटनेसप्रेमी मिलिंद यांनी दोघांचा एकत्र फोटो शेअर करत अंकितासाठी एक भावनिक आणि मोठी वाढदिवसाची पोस्ट लिहिली आहे.

मिलिंद सोमण यांनी त्यांनी आणि अंकिता कोंवरने आतापर्यंत एकत्र अनुभवलेल्या अनेक खास क्षणांबद्दलही भाष्य केलं. आयुष्यात अंकिता असल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आणि तिच्यासोबत अशाच आणखी सुंदर आठवणी निर्माण करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं सांगितलं.

मिलिंद सोमन यांची बायकोसाठी पोस्ट

“माझ्याकडे अशा अनेक गोष्टी आहेत ज्यासाठी मी कृतज्ञ आहे, पण जेव्हा मला तू भेटलीस, तेव्हा या विश्वाने माझ्यावर काहीतरी विशेषच कृपा केली. तुझ्याबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण प्रेम, सौंदर्य आणि आनंदाची भेट आहे. तुझ्याबरोबर असणं खूप खास आहे आणि आपल्यात इतकं काही साम्य आहे, ही गोष्ट माझ्यासाठी खूप खास आहे. तुला ज्या-ज्या गोष्टी हव्या आहेत, त्या सगळ्या तुला मिळाव्यात, अशी माझी इच्छा आहे. कारण मला माहीत आहे की आपल्या दोघांसाठी तू नेहमीच योग्य आणि चांगले निर्णय घेशील. यावर्षी तुझ्याबरोबर येणाऱ्या प्रत्येक नव्या अनुभवाची मी आतुरतेने वाट पाहत आहे. माझं आयुष्य उजळून टाकणाऱ्या व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”.

मिलिंद सोमण व अंकिता दोघे लोकप्रिय सेलिब्रिटी कपलपैकी एक आहे. हे दोघे अनेकदा त्यांच्या आयुष्यातील घडामोडींबद्दलचे, कामासंदर्भातील तसेच एकमेकांबरोबरचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात. दोघांनाही फिटनेसची प्रचंड आवड आहे. त्यामुळे अनेकदा दोघे त्यासंदर्भातील फोटोही पोस्ट करत असतात.

दरम्यान, मिलिंद सोमन यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर अलीकडेच त्यांचा ‘मुथु एंगिरा काट्टान’ हा तमिळ भाषेतील थ्रिलर चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटात त्यांनी दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपतीबरोबर काम केलं आहे. अभिनयासह मिलिंद सोमन त्यांच्या फिटनेसमुळेही चर्चेत असतात. फिटनेससह त्यांना पोहण्याचीही विशेष आवड आहे.