बॉलीवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी कपल आहेत ज्यांनी आंतरधर्मीय लग्न केलं असून ते गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र सुखाचा संसार करत आहेत. परंतु अनेकदा यामुळेच या जोडप्यांचं नातं अनेकांच्या चर्चेचा विषय बनतं. यापैकीच एक म्हणजे लोकप्रिय दिग्दर्शक कबीर खान व लोकप्रिय अभिनेत्री आणि निवेदिका मिनी माथुर. अशातच मिनी माथुरने नुकतंच तिच्या आंतरधर्मीय लग्नाबद्दल सांगितलं आहे. यावेळी तिने तिच्या सारच्या मंडळींबद्दलही सांगितलं आहे.
मिनी माथुर व कबीर खान यांचं लव्ह मॅरेज असून नुकत्याच फिल्मी ग्यानला दिलेल्या मुलाखतीत तिने याबद्दल सांगितलं आहे. या मुलाखतीत मिनीने तिच्या कारकिर्दीबद्दल, सूत्रसंचालन करण्याबद्दलही सांगितलं आहे. आपला प्रवास सांगत असताना तिला काही फोटो दाखवण्यात आले आणि त्यामागच्या आठवणींबद्दल विचारल्यानंतर तिने त्याही सांगितल्या आहेत.
कबीरचं कुटुंब फार धार्मिक नव्हतं – मिनी माथुर
या मुलाखतीत तिला तिच्या लग्नाच्यावेळचा तिचे पती कबीर खान यांच्याबरोबरचा फोटो दाखवल्यानंतर मिनी म्हणाली, “२७ वर्षांपूर्वीचा माझ्या लग्नातील फोटो आहे. सूर्यास्ताच्या वेळी काढलेला फोटो आहे. माझ्या आयुष्यातील सगळ्यात सुखद काळ आहे. मी माझ्या प्रियकराबरोबर लग्न केलं. त्यावेळी समाजातील वातावरण फार वेगळं होतं. हे आंतरधर्मीय लग्न होतं. मी माथुर समजातून येते जिथे माथुर फक्त माथुरबरोबरच लग्न करतात पण तरी माझ्या भोवतीचं जग खूपच वेगळं होतं. प्रत्येक जण नवीन संस्कृतीचा स्वीकार करत होते आणि कबीरचं कुटुंब, माझ्या सासरचे लोक फार धार्मिक नव्हते पण माझ्या कुटुंबात आणि त्याच्या कुटुंबात खूप साम्य होतं. तो माझ्या आयुष्यातील खूप सुखद काळ होता कारण मी माझ्या बॉयफ्रेंडबरोबर लग्न केलं”.
मिनी माथुरला पुढे ती कबीर यांना भेटली तेव्हा वेगळी होती आणि भेटल्यानंतर तिच्यामध्ये काही बदल झाले का असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “एक स्त्री म्हणून तुमच्यामध्ये वेगवेगळे बदल होत असतात. तुम्ही आई असता, करिअरही करत असता आणि सगळ्या गोष्टी सावरत त्यात समतोल साधायचा असतो. त्यामुळे मधल्या काळात कदाचित मी माझा सयंम गमावला असेल पण मला असं वाटतं की प्रत्येक स्त्री यामधून जातं असते आणि यावेळी तिला समजून घेणाऱ्या पुरुषाची तिला गरज असते”.
दरम्यान, मिनी माथुरबद्दल बोलायचं झालं तर तिने ‘इंडियन आयडॉल’, ‘तोल मोल के बोल’ यांसारख्या लोकप्रिय कार्यक्रमांचं सूत्रसंचालन केलं. मिनी माथुरने ‘माइंड द मल्होत्रा’ या सीरिजमध्ये शेफाली मल्होत्राची प्रमुख भूमिका साकारली. तसेच ‘कॉल मी बे’ मध्येही तिने काम केलं आहे. अलीकडेच ती ‘अलायन्स’ या रिअॅलिटी शोमध्ये झळकली होती आणि ती या शोच्या पहिल्या सीझनची विजेतीसुद्धा झाली. कबीर खान यांच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर बॉलीवूडमधील ते लोकप्रिय दिग्दर्शक आहेत. त्यांनी ‘एक था टायगर’, ‘बजरंगी भाईजान’, ‘चंदू चॅम्पियन’ सारख्या हिट चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे.
