Mirzapur The Movie Trailer Farhan Akhtar Reaction: ‘मिर्झापूर : द मूव्ही’चा ट्रेलर रिलीज झाला असून प्रेक्षकांमध्ये या सिनेमाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. ओटीटीवर या सीरिजने धुमाकूळ घातल्यानंतर आता बॉक्स ऑफिस गाजवण्यासाठी या कहाणीवर आधारित सिनेमा तयार करण्यात आला. ‘मिर्झापूर’ या लोकप्रिय वेब सीरिजमधील कालीन भय्या, गुड्डू पंडित आणि मुन्ना त्रिपाठी यांसारख्या लोकप्रिय भूमिकांना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या सिनेमाचा निर्माता फरहान अख्तरने मिर्झापूर सिनेमाबद्दल त्याचे मत व्यक्त केले आहे.

‘मिर्झापूर : द मूव्ही’ची निर्मिती फरहान अख्तर व रितेश सिधवानी यांच्या एक्सेल एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली करण्यात आली आहे. ‘मिर्झापूर : द मूव्ही’चा ट्रेलर लॉन्च झाला असून यावेळी निर्मात्यांनी चित्रपटाबद्दल प्रेम व्यक्त केले. या सिनेमासाठी प्रेक्षक हेच खरी प्रेरणा असल्याचे मत फरहान अख्तरने व्यक्त केले. तो म्हणाला, “या ओटीटी शोला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला असून शोचा मोठा चाहतावर्ग आहे, त्यांच्याच प्रेमामुळे आता हा सिनेमा बनला आहे.”

प्रेक्षकांनीच केलेली सिनेमाची मागणी – फरहान अख्तर

तो पुढे म्हणाला, “‘मिर्झापूर’ सीरिजच्या पहिल्या सीझनपासून प्रेक्षकांनी अमाप प्रेम दिलं असून अॅमेझॉनने हा शो जगभर पोहोचवला. लोक वेगवेगळ्या चित्रपटांबद्दल व सिक्वेलबद्दल विचारतात, पण मी जिथं जातो तिथं लोक मला नेहमी ‘मिर्झापूर:द मूव्ही’ कधी येणार असं विचारतात. या सिनेमाची मागणी प्रेक्षकांनीच केली होती. सिनेमाची घोषणा झाल्यापासून तो कधी प्रदर्शित होणार याची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे. सीरिजमधील मूळ कलाकार आणि अप्रतिम नव्या कलाकारांबरोबर हा चित्रपट तयार करता आला, याचा मला खूप आनंद आहे.”

फरहानने चित्रपटाचे लेखक पुनीत कृष्णा आणि दिग्दर्शक गुरमीत सिंह यांचेही कौतुक केले. मोठ्या पडद्यावर ‘मिर्झापूर’ची कथा मांडण्याचं श्रेय त्याने लेखक व दिग्दर्शकांना दिलं. पुनीत कृष्णा पहिल्यांदा टीमकडे आले, तेव्हाचा किस्सा सांगत फरहान म्हणाला, “पुनीत पहिल्यांदा आमच्याकडे आला, तेव्हा आमची पहिली प्रतिक्रिया जरा वेगळी होती. त्याला मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जावसं वाटतं होतं, पण नंतर गुरु आणि पुनीत हे या शोचे खरे हिरो ठरले.

निर्माते रितेश सिधवानी म्हणाले, “ही सीरिज पाहिलेली नाही असे लोक शोधणं जरा अवघडच आहे. पण, ज्यांनी ओटीटीवर पाहिली नसेल त्यांनाही ती सिनेमाच्या स्वरूपामध्ये गोष्ट लक्षात येणार आहे. पुनीतने ज्या प्रकारचं लेखन केलंय आणि गुरूने ते प्रभावीपणे पडद्यावर मांडलंय, त्यामुळे प्रेक्षकांना वेगळाच अनुभव मिळणार आहे. कदाचित हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्ही ती मालिका पाहायला सुरुवात कराल.”

मिर्झापूर सीरिजनंतर आता सिनेमा गाजणार

२०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मिर्झापूर’ने उत्तर प्रदेशातील गुन्हेगारी, राजकारण आणि सत्तासंघर्षाचे वास्तवदर्शी चित्रण मांडले होते. यानंतर या सीरिजचे दोन सीझन रिलीज झाले असून प्रेक्षकांनी या सीरिजला भरभरून प्रतिसाद दिला. यामध्ये कालीन भय्याची भूमिका साकारणारे पंकज त्रिपाठी हे या मालिकेतील महत्त्वाचे आकर्षण ठरले. त्याचबरोबर गुड्डू पंडित साकारणारा अली फजल, मुन्ना त्रिपाठीची भूमिका करणारा दिव्येंदु शर्मा आणि गोलू गुप्ता साकारणारी श्वेता त्रिपाठी शर्मा यांच्या भूमिकांना प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिलं. आता हीच ओटीटीवर गाजलेली कथा मोठ्या पडद्यावर ‘मिर्झापूर : द मूव्ही’च्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. येत्या ४ सप्टेंबर रोजी ‘मिर्झापूर : द मूव्ही’ प्रदर्शित होणार आहे.