गेले काही दिवस गणेशोत्सवानिमित्त सगळीकडे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. दरवर्षी अनेक कलाकार मुंबईतील मोठ्या गणपती मंडळांना भेट देत असतात. लालबागचा राजा हा मुंबईतील असा गणपती आहे. लालबागच्या राजाच्या चरणी दरवर्षी अनेक कलाकार नतमस्तक होत असतात. विश्वसुंदरी मानुषी छिल्लर हिने नुकतंच लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं.
यावर्षी शाहरुख खान, विकी कौशल, आयुष्मान खुराना, श्रेयस तळपदे, कार्तिक आर्यन अशा अनेक लोकप्रिय सेलिब्रिटींनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. या प्रत्येकाला रांगेत उभं न ठेवता गर्दीतून वाट काढत व्हीआयपी ट्रीटमेंट देत बाप्पाच्या दर्शनासाठी नेण्यात आलं. पण मिस वर्ल्ड हा किताब पटकावणारी मानुषी छिल्लर ही सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच रांगेत उभे राहून बाप्पाच्या चरणी नतमस्तक होण्याची वाट पाहताना दिसली.
आणखी वाचा : विश्वसुंदरी मानुषी छिल्लर प्रसिद्ध व्यावसायिकाला करतेय डेट, कोण आहे तो? घ्या जाणून
लालबागचा राजाच्या येथील मानुषीचा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. त्यामध्ये मानुषी व्हीआयपी रांगेतून नाही तर सर्वसामान्य भक्तांच्या रांगेमध्ये उभी राहून बाप्पाचं दर्शन मिळावं यासाठी वाट बघताना दिसत आहे. त्या ठिकाणी प्रचंड गर्दी आहे. तरीही ती त्या गर्दीमध्ये कुठलीही चिडचिड न करता, चेहऱ्यावर प्रसन्नता आणि भक्तीभाव ठेवत संयमाने उभी असलेली दिसत आहे.
तर आता तिचा हा साधेपणा सर्वांनाच खूप भावला आहे. या व्हिडिओवर कमेंट करत नेटकरी तिचं खूप कौतुक करत आहेत. एकाने लिहिलं, “म्हणून आम्हाला तुझा अभिमान वाटतो.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “या सेलिब्रेटी भक्तांनी हिच्याकडून काहीतरी शिकलं पाहिजे.” तिसऱ्याने लिहिलं, “तिने अजिबात व्हीआयपी ट्रीटमेंट घेतली नाही..ग्रेट.” तर आणखी एक जण म्हणाला, “हिच्या नम्रपणाचं खरंच खूप कौतुक आहे.” त्यामुळे आता मनुषीचा हा व्हिडिओ खूप चर्चेत आला आहे.